जशा आठवणी सुळभुकीशी व मांडोळीशी जुळलेल्या आहेत, तशाच आठवणी सायकलीच्या हट्टाशीही जोडलेल्या आहेत. सायकल म्हटली की, लगेच नशिराबाद आठवते. तिथल्या सायकलीच्याही आठवणी समोर येतात. सायकलीसाठीचा हट्टही समोर फिरू लागतो डोळ्यांसमोर. सायकल, नवी सायकल समोर दिसली की लगेच आमचा हट्ट मला खूपच आठवत असतो, त्या आठवणी सांगतो.
आम्ही नशिराबाद (जि. जळगाव) येथे होतो. तेव्हा मी पाचवीला किंवा सहावीत असेन. माझे वडील एका ओळखीच्या सायकल मार्टमधून भाडय़ाने आमच्यासाठी सायकल घेऊन येत. सायकलचे भाडे ५० पैसे अर्धा तास व एक तासाचा एक रुपया होता. माझे वडील ओळखी असल्यामुळे ४-५ दिवस सायकल आमच्यासाठी घेऊन येत. वडील ओळखीचे असल्यामुळे सायकल मार्टवाले पैसे घेत नसत. वडील त्यांना जबरदस्तीने पैसे द्यायचे, पण ते घ्यायचेच नाहीत.
मला सायकलचे इतके वेड होते की सायकलच डोळ्यासमोर फिरत असे. मनात सायकल, सायकल आणि सायकलच होती. मला त्या वेळेस सायकल येतच नव्हती पण, मी लंगडी चालवण्याचा प्रयत्न करायचो. खूप वेळा पडलो, धडपडलो. हात सोलून घेतले, पण मी शेवटी ठरवलेच होते की, सायकल शिकायचीच आहे. शेवटी सायकल दांडी न चालवता लंगडी चालवण्यास अगोदर शिकलो. मग भाडय़ाने एक रुपया तासाने छोटी सायकल काढण्यास सुरुवात केली व त्यावर रपेट मारण्यास सुरुवात केली.
मी वायरब्रेकची सायकल नेहमी काढायचो. कारण, ती सायकल मला खूपच आवडत असे. त्यातील स्पोक नसलेल्या प्लास्टिकच्या चकत्यावर टायर बसवले होते. म्हणून ती सायकल खूपच आकर्षक दिसायची. तिचे वाकडे हँडल खूपच मस्त, खूपच छान वाटायचे. दर रविवारी माझी सायकलची इच्छा पूर्ण व्हायची. मी सुट्टी असल्यामुळे भाडय़ाने सायकल काढायचो व पूर्ण एक रुपयात एक तास संपूर्ण गाव डवरून यायचो. आम्ही कधी कधी सायकलची शर्यतही लावायचो.
मी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शिकायचो. मी माझ्या वरच्या वर्गात असणाऱ्या म्हणजे सातव्या वर्गात शिकत असणाऱ्या एका मुलाशी चांगलीच मैत्री जमवली होती. त्याची लाल रंगाच्या वायरब्रेकच्या (रेंजर) सायकलचे मला खूपच आकर्षण होते. त्याच्या सायकलचा चेरीसारखा लाल रंग मला खूपच आवडायचा. म्हणून मी शाळा सुटल्यावर त्याच्या सायकलच्या एखाद-दोन चक्कर होत असत, पण जर त्याने एखाद्या दिवशी सायकल नाही आणली तर मात्र माझा हिरमोड व्हायचा.
सायकलची खरी मजा सुटय़ांमध्येच जास्त यायची. वडील उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत ओळखीच्या दुकानातून साताठ दिवस सायकल काढून आणायचे. ती आमच्याकडेच राहात असे. दिवसभर सायकल फिरवून रात्री आम्ही ओटय़ावर सायकल लावत असू व नंतरच्या दिवशीही लवकर तयार होऊन आम्ही सायकल चालवायला काढत असू, मंदार, (कै.) अविनाश, त्याचा भाऊ ललित वैभव खाचणे असे आम्ही मित्र सायकल फिरवायला जात असायचो.
कधी नशिराबादला जर गेलो तर त्या सायकलीच्या आठवणी मला खूप येतात. मस्त होते ते सायकलीचे वेडेपणाचे दिवस. वडिलांनी आमच्यासाठी एक २२ इंची सायकल आणली होती. एक मुलगा नवी कोरी सायकल फिरवत होता. त्याकडे बघूनच या साऱ्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या.
नीलेश पाटील – response.lokprabha@expressindia.com