‘बिग बॉस’ हा शो म्हणजे हमखास चर्चेचा विषय. या शोच्या एका टीजरवरूनच प्रेक्षकांमध्ये आगामी सीझनची चर्चा सुरू झाली आहे. या शोचे प्रोमो सुरू झाल्यावर या चर्चेला आणखी उधाण येईल. येणाऱ्या ‘बिग बॉस’च्या घराचे काही तर्कवितर्क.

नाच-गाण्याचे रिअ‍ॅलिटी शोज आल्यानंतर काही परदेशी रिअ‍ॅलिटी शोजचं भारतात पेव फुटलं. त्यामध्ये प्रामुख्याने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’, ‘कौन बनेगा करोडपती’ या शोजचा समावेश होतो. यात विशेष उल्लेख करावा असा एक शो म्हणजे ‘बिग बॉस’. गॉसिप, स्पर्धकांचा ड्रामा, भांडणं, पॉलिटिक्स असं सगळं काही खच्चून भरलेला हा शो अनेकदा टीआरपीच्या रांगेत पुढे असतो. ‘बिग ब्रदर’ या परदेशी शोवर आधारित ‘बिग बॉस’ हा शो सुरू झाला. हा वेगळ्या प्रकारचा शो असल्यामुळे प्रेक्षकांना काही तरी वेगळं बघायला मिळालं. वादग्रस्त स्पर्धक, परदेशी सेलिब्रेटींचा भरणा आणि नवनवीन कल्पना अशांमुळे हा शो आजवर गाजत आलाय. या शोला ग्लॅमरस रूप मिळालं ते सलमान या शोचं अँकरिंग करायला लागला तेव्हा. मग आणखी एकेक नवनवीन बदल होत गेले. कोणत्याही शो किंवा सिनेमाची चर्चा व्हायला लागते ती त्याच्या प्रोमोजपासून. तसंच ‘बिग बॉस’ंचं आहे. नेहमीपेक्षा यंदा काय वेगळं असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. विमानात बसलेला सलमान असा टीजर सध्या टीव्हीवर दाखवला जातोय. या टीजरवरून अनेकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली आहे. टीजरवरूनच इतकी चर्चा तर पिक्चर तो अभी बाकी है मेरे ोस्तो..!
या वेळचा सीझन धमाकेदार असणार यात शंका नाही. याचं कारण म्हणजे, मागच्या सीझनला मिळालेला प्रतिसाद, उतरलेला टीआरपी, स्पर्धकांची भांडणं, स्पर्धकांच्या एंट्री-एक्झिटचा खेळ. अशा सगळ्यामुळे शोचा मागचा सीझन आपटला. सुरुवातीला ‘स्वर्ग’ आणि ‘नरक’ असे घराचे दोन भाग करण्याच्या त्या क्रिएटिव्हिटीला प्रतिसाद मिळाला नाही. काही एपिसोडनंतर लगेच त्या दोन भागांचं एक घर झालं. त्यामुळे ‘इस बार कुछ हट के करेंगे’ म्हणत शोचे प्रोमो दमदार असणार आहेत. याचे प्रोमोज काही दिवसांतच टीव्हीवर झळकतील. त्यावरून पुन्हा शक्यतांना उधाण येईल. यातला एक प्रोमो असा आहे :-
सलमान म्हणतो-
वेलकम टू माय विमान
जिसमें सेलिब्रेटीज को मान सन्मान के साथ ले जाऊंगा आसमान
पर उतरूंगा कहा, डोंट आस्क सलमान!
या प्रोमोमधून असं वाटतंय की, यंदाचा घराचा सेटअप हा विमानाचा असेल. म्हणजे विमानातच राहणं, खाणं, पिणं, वावरणं हे सगळं करता येईल. इतकंच नाही तर, विमानाच्या बाहेरचा सीनही खऱ्याखुऱ्या विमानात बसल्यावर जसा दिसेल तसा दाखवला जाऊ शकतो. तसंच एरवी घराचा कॅप्टन असतो त्याप्रमाणे या विमानाचा कॅप्टन निवडला जाईल. आणि मग विमान कुठच्या दिशेने न्यायचं हे तो ठरवेल असंही असू शकतं. विमानाचा सेट केला तर नेहमीसारखं प्रशस्त घर दिसणार नाही अशी शक्यता आहे. तसंच घराबाहेरचा बागेचा परिसर, स्विमिंग पूलही याही गोष्टींवर यंदा काट मारली जाईल की काय अशी शंका व्यक्त होते. याआधी बिग बॉसच्या घरात स्वर्ग-नरक, जेल, गाव असे अनेक प्रकार करून झालेत. तसंच एक स्पर्धक कपल, तेरा महिलांसह एकच पुरुष स्पर्धक, परदेशी सेलिब्रेटी, क्रीडा क्षेत्रातली मंडळी, वाइल्ड कार्ड एंट्री, सिक्रेट रूम, रिएंट्री, धार्मिक-सामाजिक क्षेत्रांतील लोकांचा सहभाग असे वेगवेगळे प्रकार याआधी शोमध्ये बघायला मिळाले. त्यामुळे यंदा काय वेगळं केलं जाईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाच्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतलीच तर हे विमान कुठे थांबवणार, तो स्पर्धक ज्या ठिकाणाहून आहे तिथे थांबलेलं दाखवणार का, तिथे थांबवलं तर त्या दिवसापुरतं विमानाच्या बाहेरचा सीन त्या त्या शहरानुसार असणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शो सुरू झाल्यावर मिळतील.
दुसरा प्रोमो आहे तो असा :-
जिस जगह जाते है
सुटकेस उसी हिसाबसे भरते है
थंडी जगह.. गरम कपडे.
गरम जगह.. हलके कपडे.
और बीच हो तो कपडे साइड पर
लेकीन जब पताही ना हो जाना कहा है
तो तय्यारी क्या करेगो? खाक..
या प्रोमोवरून असं वाटतंय की या वेळी तापमानावर सगळा खेळ असेल. कारण कुठे जायचं हे माहीत नसेल तर तयारी कशी करणार, असं प्रोमोमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे स्पर्धकांना वेगवेगळ्या ठिकाणी नेणार असं दिसतंय. बिग बॉसचं घर प्रत्यक्षात असं ठिकठिकाणी फिरणं शक्य नाही. त्यामुळे तापमान कमी-जास्त करून वेगवेगळ्या ठिकाणाचा आभास निर्माण केला जाईल असं दिसतंय. त्यामुळे स्पर्धकांनी जर गरम हवेच्या ठिकाणचे कपडे घेतले नाहीत आणि बिग बॉसच्या घरात अशा ठिकाणाचं वातावरण झालं तर त्या वातावरणात स्वत:ला सामावून घेणं हा स्पर्धकांसाठी कठीण ठरू शकेल. आणि शोमध्ये खरी गंमत येईल. असंच थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावरही होऊ शकतं.
थोडक्यात काय, तर यंदाच्या सीझनचा आत्ता काही नेम सांगता येत नाही. या प्रोमोजवरून मांडलेले हे काही तर्कवितर्क. आता यात सहभाग घेणाऱ्यांनी यातून काही तरी क्लू घेऊन आपली बॅग भरावी आणि बिग बॉसच्या घराकडे एकेक पाऊल टाकावं. पण, एक महत्त्वाची शक्यता, घर परदेशीच बांधलं असेल तर..?

Story img Loader