गोष्ट २००३ सालची.
मे महिन्यातली. अकोल्यात अमोल सावंत आपल्या घरात संगणकावर काम करीत बसला होता. तेवढय़ात अंगणात काही तरी पडल्याचा आवाज आला. बघतो तर एक भारद्वाज पक्षी उष्माघाताने मरून पडलेला. त्याचा तो मृत्यू अमोलला चटका लावून गेला खरा, पण व्यर्थ नाही ठरला. कारण दुसऱ्याच दिवसापासून अमोलनं पक्ष्यांसाठी मातीच्या भांडय़ात पाणी भरून ठेवायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात कावळे-चिमण्या, कबुतरं, खारुताई यांनी पाणी प्यायला हजेरी लावायला सुरुवात केली. हळूहळू एक एक पक्षी त्या पाणवठय़ावर यायला लागला आणि गेल्या दहा वर्षांत अमोलचं अंगण म्हणजे पक्ष्यांचं अभयारण्यच झालं आहे. तिथे आता मैना, बुलबुल, ब्राह्मणी मैना, किंगफिशर, शिंपी, खाटीक, सोनपाठी सुतार, सुबग, मुनिया, वेडा राघू, रेडस्टार्ट, (काळा थिरथिरा) व्हाइटआय बर्ड (चश्मेवाला).बगळे, पोपट, कोकिळा, पाणकोंबडी, गव्हाणी घुबड, भारद्वाज, सातभाई, सनबर्ड, दयाळ, ख्रिस ब्लू, फ्लाय केचर, (निळा माशी मार पक्षी) शिकरा आणि गोल्डन ओरिअल, (हळद्या ) अशा जवळजवळ ४५ पक्ष्यांची किलबिल दररोज ऐकायला मिळते.
पर्यावरणपूरक अशी विविध फळझाडं आणि फुलझाडं हे अमोलच्या बागेचं आणखी एक वैशिष्टय़. या पक्ष्यांचा राबता असाच राहावा, वाढावा यासाठी त्याने घराभोवती बदाम, अशोक, उंबर, पेरू, रामफळ, बेलफळ अशी विविध झाडं लावली आहेत. यातली पपई, बेल, रामफळ, पेरू ही पक्ष्यांची विशेष आवडती झाडं आहेत. अनेक झाडं तर पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बियांमधून उगवली आहेत. या झाडांवरची फळं खात, मातीच्या भांडय़ांमधलं पाणी पीत पक्षी तिथे बागडत असतात. याशिवाय या बागेत असलेल्या गावठी गुलाब, मोगरा, रातराणी, चमेली, चाफा, लीली, तेरडा, काटेकोरंटा, कर्दळ, या फुलझाडांमुळे तिथे फुलपाखरांचीही मैफल भरलेली असते. अंगणातल्या उंबर, पेरू या झाडांवर तर पक्ष्यांची जणू पंगतीच बसलल्या असतात. या शिवाय या पक्ष्यांसाठी घेवडा, चवळी, दुधी भोपळा, पालक कोथिंबीर, चिवई, रताळी असा सेंद्रिय मेवाही असतो. अमोलच्या घरातून फळांची सालं, धान्यं असा खाऊही पक्ष्यांना मिळतो. असं सगळं खाऊन-पिऊन वर दगडीच्या बाथटबमध्ये मनसोक्त आंघोळ करणारे पक्षी बघून मन हरखून जातं.
संतोष विणके