चलनाचा संबंध असतो तो त्या त्या देशाच्या सार्वभौमत्वाशी, समाजाच्या अस्मितेशी. पण अलीकडच्या काळात चर्चेत आलेले बिटकॉइन हे चलन ना कुठल्या समाजाचं आहे, ना कुठल्या देशाचं! इंटरनेटच्या आभासी जगातून विकसित झालेलं हे चलनही तितकंच आभासी आहे. नुकताच रिझव्र्ह बँके नेही या चलनाच्या वापरासंदर्भात सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. त्या पाश्र्वभूमीवर बिटकॉइन्स म्हणजे नेमकं काय आहे, केवळ चलन की गुंतवणुकीचा पर्याय, आपल्या अर्थव्यवस्थेवर याचा काही परिणाम होईल का, देशातील विविध यंत्रणा याकडे कसे पाहतात या सर्वाचा ऊहापोह-
चलन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो खणखणीत बंदा रुपया.. किंवा अमेरिकी डॉलर किंवा ब्रिटिश पौंड.. अख्ख्या युरोपचा युरो.. गेलाबाजार जपानी येन.. थायी बाथ.. आणखीही वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी चलनं! त्या त्या देशाच्या चलनांना त्या त्या देशाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संदर्भ असतात. साहजिकच आर्थव्यवस्थेबरोबर त्या त्या देशाची अस्मिता त्या चलनाशी जोडलेली असते. सगळ्या युरोपने युरो हे चलन स्वीकारलं, पण इंग्लंडने आपला पौंड सोडला नाही, हे त्यामुळेच. सगळ्या आशियाचं एक चलन असावं ही कल्पनाही म्हणूनच अजूनही प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही.
हजारो वर्षांच्या व्यवहारांमधून ही वेगवेगळी चलनं विकसित होत गेली आहेत. पण गेल्या शंभरेक वर्षांत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग यापूर्वी कधीही आलं नाही एवढय़ा वेगाने जवळ आलं. इंटरनेटमुळे तर संपर्कक्रांतीच झाली. जागतिकीकरणामुळे या सगळ्या परिस्थितीला आणखी वेगळे आयाम मिळाले. या सगळ्या पाश्र्वभूमीवर अपरिहार्यपणे काही समांतर घडामोडी घडत गेल्या. बिटकॉइनचा उदय ही त्यातलीच एक घटना.
गेले काही दिवस बिटकॉइनबद्दल सातत्याने बातम्या, लेख छापून येत आहेत. बिटकॉइन हे इंटरनेटवर वापरले जाणारे एक आभासी चलन आहे, यापलीकडे सर्वसामान्य माणसाला त्याबद्दल फारसं काही माहीत नाही. हे चलन कुणी निर्माण केलं, का निर्माण केलं, त्यामुळे आपल्या वापरात असलेल्या चलनाचं काय होणार, त्याच्यावर बिटकॉइनचा काही परिणाम होईल का, बिटकॉइनचा आपल्याला काही फायदा आहे की त्यापासून आपल्याला धोका आहे, असे अनेक प्रश्न अनेकांना पडत आहेत. मुळात इतकी चलनं, त्यांच्या त्यांच्या आर्थिक व्यवस्था असताना आणखी चलनाची गरज कुणाला आणि का भासली, हाही प्रश्न आहेच. हे सगळं समजून घ्यायचं तर आधी बिटकॉइन्स म्हणजे काय ते समजून घ्यायला हवं.
बिटकॉइन्सविषयी जाणून घेण्यापूर्वी दोन उदाहरणं पाहणं सयुक्तिक ठरेल.
पहिलं उदाहरण व्हिडीओ गेम्सचं. संगणकाच्या पडद्यावर दिसणारी अनेक पात्रं, गाडय़ा आणि त्याबरोबर एक करमणुकीचं किंवा वेळ घालवायचं साधन म्हणून सुरू असणारा खेळ. म्हटलं तर लुटुपुटुची लढाई, स्पर्धा, पण अत्यंत डोकेबाजपणे मांडलेली. अर्थात कोणातरी आभासी स्पर्धकाबरोबर सुरू असलेली स्पर्धा. खेळातील प्रत्येक हालचालीबरोबर गुणदेखील मिळणार. तेदेखील आभासीच. मिळालेल्या गुणांच्या आधारे खेळातील नवीन साधनंदेखील मिळवता येऊ लागली. इंटरनेटच्या वाढत्या पसाऱ्यात आभासी स्पर्धक जाऊन त्याजागी खरेखुरे स्पर्धक आले. त्यातून प्रोफेशनल गेमर्स तयार झाले. खेळाचा आवाका वाढला, त्यातदेखील गुण मिळत गेले, पण वास्तवात याची किंमत काय, तर शून्य. शेवटी सारंच कृत्रिमरीत्या तयार केलेलं आभासी जग.
दुसरं उदाहरण- जेम्स बॉण्ड अथवा तत्सम हॉलीवूड चित्रपट. त्यामध्ये असणारं खलनायकाचं अतिशय सणकी, काही वेळा विकृत वाटणारं पण बुद्धिमान व्यक्तिमत्त्व. ज्याला प्रस्थापित व्यवस्था नको आहे असा खलनायक. स्वत:च्या जोरावर काही तरी अफलातून कल्पना काढून एक वेगळे विश्व तयार करतो. त्याची स्वत:ची अशी एक व्यवस्था जन्माला घालतो. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध. स्वत:चे नियम तयार करतो आणि एक खेळ मांडतो; त्यासाठी त्याला तसेच साथीदारदेखील मिळतात.
आता या दोन उदाहरणांतील दोन गोष्टी एकत्र आणू या. व्हिडीओ गेममधील आभासी जग आणि अतिशय बुद्धिमान तंत्रज्ञ. सध्या सारं जग बिटकॉइन्सचा जनक म्हणून ओळखते त्या साकोशी नाकातोमीला (हे व्यक्तिमत्त्व अजूनही जगासमोर आलेलं नाही) प्रस्थापित चलनव्यवस्था खुपत असते. कोणत्याही नियंत्रणाशिवाय एक वेगळं अस्तित्व असणारी व्यवस्था, समांतर चलन व्यवस्था त्याला उभी करायची असते. त्यातूनच त्याच्या डोक्यातून एक अतिशय भन्नाट मात्र तितकीच घातक व्यवस्था जन्माला येते. व्हिडीओ गेमच्या जागी येतो त्याने तयार केला किचकट संगणकीय प्रोग्राम. त्यातील संगणकीय गणिती प्रणाली (अल्गोरिदम) सोडवल्यावर मिळणाऱ्या गुणांना तो आभासी चलनाचे नाव देतो, बिटकॉइन. हा सारा खेळ त्याला एकटय़ाने खेळायचा नसतो. त्याला हवी असते साऱ्या जगातील संगणकांची साथ. अनेकांना सामावून घ्यायचे असते. अर्थात त्यासाठी काहीतरी आमिष हवं. तेदेखील त्या प्रोग्राममध्येच दडलेलं असतं. तो किचकट प्रोग्रॅम आपल्या संगणकावर डाऊनलोड करून सुरू करायचा, त्यातील किचकट गणित सोडवायचं आणि गुण मिळवायचे. यालाच तो मायनिंग असं संबोधतो. आणि हे गुण म्हणजे काय, तर बिटकॉइन अर्थात आभासी चलन.
प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध जाण्याचं आकर्षण अनेकांना असतं. त्यामुळेच त्याच्या या खेळातील गुणांना त्यानं दिलेलं आभासी चलन हे संबोधन सर्वाच्याच पथ्यावर पडतं. न दिसणारं असं हे चलन तयार होण्याच्या प्रक्रियेतच त्याच्या विस्ताराची सोय करून ठेवलेली आहे. विकेंद्रीकरण हाच त्यांचा मूलभूत पाया असतो. हे सारं पुन्हा त्या प्रोग्राममध्येच मांडलेलं. सुरुवातीस वैयक्तिक संगणकावर विनासायास वापरता येणारा हा प्रोग्राम सुरू ठेवण्यास कालांतराने अफाट ताकदीच्या संगणकांची गरज भासू लागते. एकाच्या जागी १००-२०० संगणक, वाढती यंत्रसामुग्री, पाहता पाहता हा पसारा वाढतच जातो. जगभरातील हजारो संगणक एकमेकांना जोडले गेले. प्रत्येकाला पुन्हा तेच गुणांचं आमिष. आणि एका समांतर चलनव्यवस्थेचा जन्म होतो.
गुणांची आणि ते मिळविणाऱ्यांची संख्या वाढत जाते. लोकांचं आकर्षण वाढत जातं. निर्मात्याच्या डोक्यात मात्र काही वेगळंच असतं. त्याला या आभासी व्यवस्थेचा दबदबा वाढवायचा असतो. अशी व्यवस्था तो प्रोग्रामच्या सुरुवातीसच करून ठेवतो. एकूण किती बिटकॉइन्स तयार करायचे आहेत, त्यांपैकी प्रत्येक टप्प्यावर त्या एका विवक्षित कालखंडात किती बिटकॉइन्स निर्माण होतील हे सारं त्या किचकट प्रोग्राममध्ये मांडलेलं असतं. त्या व्यवस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर तो हे गुण म्हणजे बिटकॉइन निम्म्याने कमी करीत जाणार. म्हणजेच लोकप्रिय होत जाणाऱ्या उत्पादनाची टंचाई निर्माण करणार.
त्यातूनच या आभासी जगाचं त्यातील मायनर्सचं त्यांचं म्हणून एक कोंडाळं तयार होतं. कोणाचंही नियंत्रण नसणारं, कोठेही चालणारं पर्यायी चलन हवं हा सामायिक धागा. पर्यायी चलन, कोठेही वापरा, कसेही वापरा हेच घोषवाक्य. त्याचं स्वरूप आभासी, पण वापरणारं कोंडाळं मात्र वास्तवातलं. मग हे वास्तवातील कोंडाळं या आभासी चलनाला वास्तवातील घटनांशी जोडू लागतं. एक व्यवस्था तयार होत जाते. त्यांच्या संघटनादेखील तयार होऊ लागतात. आभासी चलनांचे वास्तवाशी निगडित व्यवहार सुरू होतात.
इतकं होईपर्यंत गुण मिळविणाऱ्यांची संख्या आणि आभासी चलनाला वास्तवात आलेली किंमत पाहता, इतका वेळ केवळ हा खेळ लांबून पाहणाऱ्यांना देखील खुमखुमी येते. त्यांना किचकट प्रक्रियेतून मिळणाऱ्या गुण स्वरूपातील बिटकॉइन्समध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना हवे असतात ते थेट बिटकॉइन्स. त्यासाठी हवे तसे पैसे मोजायला ते तयार असतात. मग सुरू होतो केवळ व्यापार. कालपर्यंत आभासी असणाऱ्या वस्तूला किंमत येते ती मात्र व्यवस्थेतील अधिकृत चलनाच्या विनिमयाने.
आता गुणांची रक्कम मात्र कमी झालेली असते. कारण दुसऱ्या टप्प्यात तयार होणारं गुणरूपी चलन पहिल्या टप्प्याच्या निम्म्याने असते. त्याचबरोबर ही यंत्रणा इतकी किचकट बनलेली असते की त्यातील संगणकीय गणिती प्रणालीची सोडवणूक करण्यासाठी संगणकीय ताकददेखील वाढवावी लागते. म्हणजेच वास्तवातील यंत्रणा वाढणार पण आभासी चलन कमी होणार. मग सुरू होते ती एक घमासान लढाई, जास्तीत जास्त आभासी चलन मिळविण्याची, ती मात्र वास्तवातील जगात असते. मग त्याला वास्तवातील जगातील बाजारपेठेची सारी परिमाणं लागू होऊ लागतात. पुरवठा कमी, मागणी जास्त परिणामी किंमत जास्त. मग जे मायनिंगमध्ये प्रत्यक्ष नसतात पण त्यांच्याकडे पैसा असतो त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. स्वत:जवळचा साठा कसा वाढेल आणि त्यावर आणखी ट्रेडिंग कसं करता येईल यावर त्यांचा भर.
२००९ साली पहिल्या बिटकॉइनच्या निर्मितीपासून ते आजवरचा प्रवास हा असा आहे. आज या साऱ्या खेळातून जगात तब्बल १२ मिलियन बिटकॉइन्स अस्तित्वात आली आहेत. मुख्यत: या व्यवस्थेच्या सुरुवातीच्या चार वर्षांत निर्माण झाली आहेत. एकेकाळी सुरुवातीस केवळ मजा म्हणून या खेळात सामील झालेल्यांनी अगदी किरकोळ संगणकीय यंत्रणेच्या आधारे बहुतांश बिटकॉइन्स जमवलेले आहेत. काहींनी तर चक्क फुकट आपल्या मित्रांना भेट म्हणूनदेखील दिले आहेत. भारतातील ट्रेडर्सच्या माहितीनुसार भारतातील ५० टक्केबिटकॉइन्स ही अशा भेटीतूनच जमा झाली आहेत. भारतातील एक ट्रेडर गेमर होता, त्याला त्याच्या एका गेमर मित्राने याची ओळख करून काही बिटकॉइन्स दिली आहेत. आज हा ट्रेडर भारतातील आघाडीच्या ट्रेडर्सपैकी एक आहे. गेल्या एक-दोन वर्षांत बिटकॉइन्सची लोकप्रियता प्रचंड वाढलेली आहे. अनेक वेगवेगळ्या वेबसाइट्स, काही विमान कंपन्या, विद्यापीठाने बिटकॉइन्स स्वीकारायला सुरुवात केल्यावर सुरुवातीस किरकोळ किमतीस मिळणाऱ्या एका बिटकॉइनचा दर आज ८०५ डॉलरवर पोहोचला आहे. मायनिंग न करता केवळ एक्सचेंजवर व्यवहार करून बिटकॉइन्सची देवाणघेवाण वाढू लागली आहे. या आभासी चलनाने आता वास्तवात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. प्रोग्रामच्या नियमाप्रमाणे चालणाऱ्या व्यवस्थेत नव्याने तयार होणारे बिटकॉइन कमी होत आहेत. पण बिटकॉइन्सच्या आधारे जगात व्यवहार होत आहेत असे दिसल्यावर पैसे देऊन खरेदी-विक्री केली जाण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.
जगभरात बिटकॉइन्सची ही परिस्थिती पाहता भारतात काय चित्र आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आज भारतात सुमारे ३० हजार बिटकॉइन्सधारक आहेत. त्यांच्याकडे असलेल्या बिटकॉइन्सचे प्रमाण जगात वितरित झालेल्या १२ मिलियन्स बिटकॉइन्सच्या तुलनेत केवळ एक टक्का इतके असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी ‘लोकप्रभा’ला सांगीतले. बिटकॉइन्स एक्सचेंज चालविणारे विशाल गुप्ता यांच्या मते यातील ५० टक्के बिटकॉइन्स ही सुरुवातीच्या काळात भेटस्वरूपात मिळाली आहेत. तर सध्या १५०० मायनर्स भारतात असल्याचे ते सांगतात. जगाच्या तुलनेत हे प्रमाण तसे कमीच आहे.
बिटकॉइन्सला मिळत चाललेली लोकप्रियता, भारतात त्यासंदर्भात होत असणारे ट्रेडिंग, अमेरिकेच्या एफबीआयने सिल्क रोडवर टाकलेल्या धाडीतून मोठय़ा प्रमाणात जप्त केलेले बिटकॉइन्स या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत आपल्या सरकारी यंत्रणा काही प्रमाणात कामाला लागल्या आहेत. डिसेंबरमध्ये अहमदाबाद येथील बायसेलबिटकॉइन्स या वेबसाइटच्या कार्यालयावर आणि बेंगलोर येथील एका ट्रेडरच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकल्या. २४ डिसेंबर २०१३ रोजी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने एक पत्रक प्रसिद्ध करून बिटकॉइन्स व तत्सम आभासी चलनाच्या माध्यमातून केले जाणारे व्यवहार हे मध्यवर्ती बँकेने अथवा मॉनेटरी ऑथॉरिटीने प्रमाणीत केले नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर भारतात सुरू असलेले बिटकॉइन्सच्या व्यापाराचे सर्व व्यवहार थंडावले आहेत.
आपल्या प्रसिद्धीपत्रकात रिझव्र्ह बँक सांगते की ‘‘बिटकॉइन्स व तत्सम आभासी चलनाच्या माध्यमातून केले जाणारे व्यवहार हे मध्यवर्ती बँकेने अथवा मॉनिटरी ऑथॉरिटीने प्रमाणित केलेले नाहीत. तसेच हे
रिझव्र्ह बँकेने उचललेले पाऊल स्तुत्य असले तरी या संदर्भात बँकेने ठोस भूमिका घेतल्याचे दिसत नाही. परिणामी हे चलन आहे का, उत्पादन आहे अशा अनेक विषयांवर संबंधित अंमलबजावणी यंत्रणादेखील संभ्रमात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या धाडी या विषयाची माहिती करून घेण्यासाठीच होत्या. यामध्ये कोणत्या कायद्याचे उल्लंघन होत नाही ना याची ती चाचपणी होती. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल हे दोन्ही विभाग या संदर्भात कोणतीही भूमिका मांडत नाहीत. जोपर्यंत धोरण ठरत नाही, तोपर्यंत या चलनाआधारे व्यवहार होत नाही, कोणताही गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत कोणतेही भाष्य करायला हे विभाग तयार नाहीत. थोडक्यात काय तर जोपर्यंत रिझव्र्ह बँक आपली भूमिका स्पष्ट करीत नाही तोपर्यंत इतर यंत्रणांनादेखील कोणताही ठोस निर्णय घेता येत नाही.
जर असे असेल तर काही मूलभूत प्रश्न येथे उपस्थित होतात. बिटकॉइन्सचा प्रोग्राम पारदर्शी आहे, त्याद्वारे फसवणूक होण्याचा संभव नाही, असा जरी बिटकॉइन संबंधितांकडून दावा केला जात असला तरी आज जगातील कोणत्याही बिटकॉइन्सधारकाची प्रचलित व्यवस्थेतील अधिकृत ओळख पटवून देणारी सोय या यंत्रणेत नाही. लॉगइन आणि अत्यंत किचकट पण गुप्त अशा पासवर्डच्या आधारे बिटकॉइन्सचे सारे व्यवहार चालतात. त्यामुळे नेमकी कोणती व्यक्ती बिटकॉइन्स होल्डर आहे हे कळणे अवघड आहे. बिटकॉइन्स होल्डर हा जगाच्या पाठीवरून कोठूनही व्यवहार करीत असला तरी त्याचा आयपी अॅड्रेस सोडला तर इतर कोणतीच माहिती मिळत नाही.
आभासी जगात खेळ मांडला! पण, सावध ऐका पुढल्या हाका
<span style="color: #ff0000;">कव्हरस्टोरी</span><br />चलनाचा संबंध असतो तो त्या त्या देशाच्या सार्वभौमत्वाशी, समाजाच्या अस्मितेशी. पण अलीकडच्या काळात चर्चेत आलेले बिटकॉइन हे चलन ना कुठल्या समाजाचं आहे, ना कुठल्या देशाचं! इंटरनेटच्या आभासी जगातून विकसित झालेलं हे चलनही...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-01-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bitcoin