मला आणि माझ्या दोन्ही मुलांना कुत्री, मांजर, पक्षी, आसपासची लहान मुले प्रिय! आम्ही त्यांच्यात रमून जातो. सर्वसाधारण जगरहाटीप्रमाणे यांना या गोष्टी अगदीच अप्रिय! शेजारपाजारी लहान मुले खेळायला आली की, चला, पळा नंतर या असे म्हणून गेट लावून घेण्याची त्यांना घाई असते. माझी मुले अगदी लहान असताना मला वाटे की, आपल्या मुलांनाही हे ‘चला, पळा, नंतर या’ म्हणतात की काय! तर माझ्या व मुलांच्या आग्रहामुळे, बरेच दिवसांच्या चर्चेनंतर कुत्र्याच्या नावावर अनेक कारणांनी फुली मारली गेली आणि त्यातल्या त्यात मांजर बरे असा निष्कर्ष निघून मांजराचे पिल्लू आणायचे ठरले. धाकटय़ा मुलाने त्याच्या मित्राकडून छानसे, गुबगुबीत बिस्किट कलरचे पिलू आणले. आमचे कौतुक आणि यांचे हुसकावणे या दोन्ही गोष्टींची सवय करून घेऊन ते छान रुळले. आमच्या मुलांबरोबरच आसपासच्या मुलांशी मनीची दोस्ती झाली. हे मात्र तिला सारखे बाहेर हुसकावीत. मध्यंतरी त्यांनी पाळीव प्राणी व त्यांच्यावर माया करण्याने कमी होणारा रक्तदाब अशा आशयाचे व्याख्यान ऐकले. त्यानंतर दोन दिवस मने, मने, करून मनीला प्रेमाने जवळ घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मनीलाही आश्चर्य वाटले असावे. मात्र हे प्रेम दोन दिवसांतच ओरसरले. ते पुन्हा मनीला हुसकावू लागले. मनीलाही हुश्श झाले बहुधा! मला मांजरे आवडत नसती तर मी काय केले असते कोण जाणे, कदाचित हुसकावण्याबरोबर बडबडही केली असती!
अशी आमची मनी मोठी होऊ लागली. छान खेळणारी, पायात घोटाळणारी मनी अचानक एक दिवस म्याँव म्याँव करत घरभर अस्वस्थपणे फिरू लागली. घरात घेतले तरी ओरडत राही, बाहेर सोडले तरी तेच! दूध जेमतेम दोन-तीन जिभल्या चाटे व पुन्हा ओरडे! आम्हाला तिच्या ओरडण्याचे कारण कळेना, त्यामुळे उपाय सापडेना. बेडरूमच्या खिडकीत बसून सारखी म्याँव म्याँव करत राही. खिडकीला आतून जाळी बसवल्याने तिला खिडकीतून आत येता येत नसे. दार उघडून आत घेतले तरी तेच! मी आणि मुले बेचैन झालो, काय करावे सुचेना! मनीला जवळ घेतले की ओरडायची थांबे, पण अस्वस्थ असे! हे हुसकावून हुसकावून कंटाळले! आणखी एखादा दिवस थांबून डॉक्टरांकडे न्यावे असे ठरले.
दोन दिवसांनी मुलांची सहल जाणार होती. थंडीचे दिवस होते. मुलांना नको असले तरी स्वेटर्स दणे आवश्यक होते. यांच्या कपाटात खालच्या कप्प्यात स्वेटर्स होते. मी कपाट उघडले. बेडरूमच्या खिडकीत बसलेली मनी आणखीनच ओरडू लागली. आत येण्यासाठी धडपडू लागली. खिडकीत लावलेल्या जाळीमुळे तिला आत येता येईना. कपाट तसेच उघडे ठेवून दार उघडून मी मनीला आत घेतले. मनी तिरासारखी कपाटात घुसली. मनी कपाटात शिरताच आतून अगदी बारीक आवजातले म्याँव म्याँव ऐकू आले. आतले दृश्य पाहून आम्ही थक्क झालो. मनी कपाटात खालच्या कप्प्यात बाळंत झाली होती.
मुलांनी हळूहळू खालच्या कप्प्यातल्या जुन्या कॉटनच्या साडय़ा, कपडे बाहेर काढले. आतमध्ये पार्ले बिस्कीटच्या रंगाची तीन पिल्ले होती. तिघांना एका जुन्या साडीवर ठेवले. मनीने मोठा नि:श्वास सोडला. दोन दिवस ओरडून थकलेला जीव आता शांत झाला होता. नशीब, पिल्ले जिवंत होती.
त्याचे असे झाले असावे, यांना कपाट उघडे ठेवून, पासबुके, पावत्या, कागदपत्रे असे सगळे घेऊन कॉटवर खूप वेळ बसण्याची सवय आहे. त्यातून कुणाचा फोन आला तर ते डोळे मिटून घेऊन फोनवर बोलत राहतात. शेअर्ससंबंधी फोन असेल तर त्यांची समाधीच लागते. बहुधा या समाधीकाळात मनी कपाटात जाऊन बाळंत होऊन बाहेर आली असावी. मनी जेव्हा घरात येई तेव्हा कपाट बंद असे. कपाट उघडल्यावर आवाजाने ती बाहेर अस्वस्थ होऊन ओरडू लागे. आत घेतले की तोवर कपाट बंद झालेले असे. आज कपाट उघडे असायला आणि मनी आत यायला एकच गाठ पडली म्हणून बरे झाले, नाही तर काय झाले असते कोण जाणे! तेव्हापासून मनीला आम्ही ‘सर्किट’ म्हणू लागलो. आता पिल्ले मोठी झाली आहेत. मनी फक्त शेपटी हलवून तीनही पिल्लांना खेळवतही असते आणि डोळे मिटून आरामही करत असते. कुत्र्यांची चाहूल लागताच सगळी फलटण झाडावर चढते. झाडावरून झोपाळ्याच्या कौलांवर येतात. मनीचे हे पहिलेच बाळंतपण. पोटही अगदी थोडेच दिसत असल्याने आम्हाला काहीच कळले नाही. ती ओरडून सांगत होती, पण आम्ही कमी पडलो. आता मनीबरोबर तिची तीनही पिल्ले लाड करून आणि हुसकावून घेत आहेत.
रेवती गोडबोले