पिवळ्या पट्टय़ाचे देखणे कोबाल्ट ब्लू शूज आणि नाजूक पांढऱ्या पट्टीचे डायजिन गुलाबी शूज एकमेकांना भेटले त्याला एक वर्ष झालं.

’ ’ ’
दोन शूज एकमेकांच्या प्रेमात पडले त्यालाही एक वर्ष झालं.
दोन लाल जिम बॉल्सवर टणाटण उडय़ा मारताना ते एकमेकांत हरवले किंवा एकमेकांना सापडले त्यालाही एक वर्ष झालं.
’ ’ ’
त्या वेळी ‘दिल से कभी न उतरेना हँगओवर तेरी यादों का’ हे महान सुमधूर गीत चालू होते.
जिमच्या एलईडी टीव्हीवर भरपूर गळा अधिक जास्त उघडी पाठ टाकलेली निळीकाळी साडी नेसली बाई रजया विकत होती. बाळासारखी गुलाबी रजईची गुंडाळी ती कुशीत घेऊन लाडंलाडं शब्द फेकीत होती.
ती तीच साडी नेसून कधी बचाबच चपट जाड रोटय़ा करणारं यंत्र विकते तेव्हा ती वखवखलेली दुष्काळी उपाशी दिसते. कधी कधी बटबटीत निरुपयोगी व्हॅम्पस्टाईल ज्वेलरी सेट विकते.
कधी कधी जुन्या बाजार टाइप ड्रेस मटेरिअल (एक दमात सात) विकते.
सगळ्याच वस्तू सारख्याच निर्विकार आनंदाने ती विकते तेव्हा वाटतं की, ती विकत नसून दयाभावाने फुकट वाटतेच आहे.
’ ’ ’
तिच्याकडे बघण्यापेक्षा कोबाल्ट ब्लू आणि डायजिन गुलाबी एकमेकांना बघत बसले.
त्यांच्या स्वतंत्र जीवनाचा तेवढा एकच तास तर असे.
तो ते आपापल्या जिभा बाहेर काढून प्रेमाची हवा खात बसू लागले.
तसं तर इतर कामसू रोजच्या शूजपेक्षा तुलनेने त्यांचं आयुष्य मस्त होतं. पण त्या एकदीड तासातच भरपूर राबावं लागे दोघांना. ही दुष्ट माणसांची प्रचंड ओझी नशिबानेच लादलेली त्यांच्यावर.
’ ’ ’
उंटासारखं तोंड असलेल्या मुलीचे कडक कोरे पांढरे शूज या दोघांना तुच्छतेने बघत.
धिरडय़ा गालांची पन्नाशीच्या तरुणीचे काळे हिरवे गुलाबी पट्टय़ाचे शूज अहंकारी तुच्छतेने बघत.
जाडय़ा गर्दन सोनेरी टोळीवाल्याचे जाडजूड ब्रॅण्डेड काळे शू गुलाबीवर लाइन मारत. त्याचे विचकते दात तिला भयंकरच वाटत.
तुपकट वळ्यावाल्या शेटचे हिरवट शू बधिरशा नजरेने निरखत बसत.
वखवखलेल्या सद्गृहस्थाचे घाण पिवळ्या रंगाचे शू तशाच घाण नजरेने तिच्याकडे बघत, तेव्हा गुलाबीला मागच्या जन्मात तिने चिरडलेल्या अळीची आणि त्यातून बाहेर आलेल्या गिळगिळीत हिरवट द्रवाची आठवण येई.
जिमकाकूचे तृप्त लालबूंद शूज दोघांना हेवामिश्रित कौतुकाने न्याहाळत.
खेरीज एरोबिक इन्स्ट्रक्टरचे अ‍ॅक्वा ब्लू शूज इनडिफरन्ट होते.
अजून एक देखणे जांभळे शू गुलाबीला इनसिक्युअर करीत.
अजून एक फ्लुरोसंट ग्रीन आणि ऑरेंज शू कोबाल्ट ब्लूला थोडेसे चिडवत, डिवचत पण ते तेवढंच होतं.
’ ’ ’
शूजचं आयुष्य होतं पराधीनच.
कायम मानवाच्या टाचेखाली जगणं.
जगण्यावरती कायमचीच टाच आलेली.
कधी मालकाला कंटाळा येईल आणि कधी तो फेकून देईल सांगता येत नाही.
’ ’ ’
दोघं शूज एकमेकांना बघत, कधी त्यांच्या घट्ट बांधल्या लेस आपोआप सूटत आणि एकमेकांत गुंतत तेव्हा त्यांना विलक्षण एकरूपतेचा सुरक्षित आनंद मिळे.
ट्रेडमिल तुडवताना, स्पिनिंग सायकलचे भरमसाट श्रम मग दोघांना जाणवत नसत.
अ‍ॅब्जनंतर दोघं मालक रिलॅक्स करीत तेव्हा कोबाल्ट ब्लू डायजिन गुलाबीला जिमच्या काचेच्या भिंतीपल्याडचा चंद्र दाखवीत असे आणि आवडती गजल गुणगुणे ‘आहिस्ता आहिस्ता’.
डायजिन गुलाबी लाजून चूर होत असे, तेव्हा आनंदाने कोबाल्ट ब्लूच्या लेस ताठ उभ्याच राहात असत.
’ ’ ’
डायजिन गुलाबी शूची मालकीण त्या दिवशी त्या नव्या मॉलमध्ये गेली आणि तिथेच दोन्ही शूजची ताटातूट झाली.
फिफ्टी पर्सेट ऑफवर देखणे ब्रॅण्डेड मंद जांभळे शूज आले.
डायजिन गुलाबीला सत्वरी फेकून देण्यात आलं.
नाही तरी मालकिणीला त्यांचा कंटाळाच आलेला.
’ ’ ’
दुसऱ्या दिवशी जिममध्ये कोबाल्ट ब्लूला डायजिन गुलाबीच्या जागी वेगळीच कुणी घेतल्याचं बघून धक्काच बसला.
अचानक त्या धक्क्याने त्याने त्याच्या ‘सोल’चा त्यागच केला. असं करणारा तो काही पहिलाच शू नव्हता.
पण सोल निसटून त्याचा मालक दाणकन आपटला.
आणि चिडून मालकाने त्याला त्याच जिमच्या दारात शू रॅकवर सोडून दिलं.
माणसं अशीच बेश्टपैकी दुष्ट असतात हे कोबाल्ट ब्लूला माहिती होतंच.
पण त्याचाही नाइलाजच होता.
प्रेम नावाची सेल्फ डिस्ट्रक्टिव भावना माणसांच्या टाचेखाली राहूनच शूमध्ये आली असावी.
’ ’ ’
‘सोल’विहीन केविलवाणा बिनमालकाचा कोबाल्ट ब्लू शू तेव्हापासून त्याच्या डायजिन गुलाबी शूजची वाट बघत तिथेच पडून आहे. त्याच्यावर माणसाच्या दुर्लक्षाचे थरच्या थर साचलेत. तरीही, अजूनही जिमच्या काचेच्या भिंतीतून तो चंद्र बघतो आणि विरहाच्या आर्त गजल्स गुणगुणतो.
जुई कुलकर्णी

Story img Loader