अन् हा बघा माझ्या लेकीचा आणि जावयाचा फोटो.. अं? ते मधले? अंहं, काका, मामा नव्हेत ते मुलाचे.. मग कोण? अहो, ते आपले हे हो, खासदार आमदारांपैकी कुणी मंत्री आहेत हो.. हं, टोपी अन् पोटावरून वाटतंय ना?नाव? अहो, नाव अगदी तोंडापुढे आहे हो, पण.. तसंच काहीतरी जाधव, कांबळे किंवा काळेबेरे..
..कशाला म्हणजे? अहो, हुंडा न देता लग्न झालं हे म्हणून कौतुक करायला आले होते ते.. काय? भाषण? छे बाई, ते नाही ऐकलं मी काही, चहा-फराळाच्या गडबडीत कुठली फुरसत! पण आमचा संजू म्हणत होता, कुटुंब-कल्याण योजनेवर चार शब्द बोलले म्हणे.. का म्हणजे? पुढं कुठं तरी त्याच विषयावर त्यांचं भाषण द्यायला जाणार होते म्हणे.. आहेर? काय की, बाई! पण भावजी म्हणत होते, रुपयाच्या पाकिटातनं दिलं म्हणे काहीतरी.. हो ना, चांगलं जेवून ढेकरा देत गेले नं.
अहो, आमचे हे ते गेल्यावर म्हणत होते, ‘तरी बरं, आपली पाच-सहा बालकं नाही आणली जेवायला’, आणि बसले सगळे हसत यांच्या या बोलण्यावर.. नाहीतर काय! जबाबदारीचं गांभीर्यच नाही यांना. मी आपली लेक-जावयाचं व्यवस्थित चाललं आहेनं ते बघत फिरत होते सारखी..
.. मग आहेच माझी सुली तशी सुंदर, जरा काळासावळेपणा आड येत होता आतापर्यंत, जमलंच कुणाच्या मनी, तर हुंडय़ाच्या आकडय़ानं आमच्या मनात धस्स व्हायचं, म्हणून इतकी र्वष राहिलं हो लग्न.. काय? त्या दागिन्यांनी खुललीय म्हणता? आहेतच ते तसे घसघशीत! अंहं, ते तिचे नाहीत हो..मग कुणाचे म्हणजे? अहो, मला केलेत ते नुकतेच, आमच्या लग्नाच्या सत्ताविसाव्या वाढदिवसाला. हे काय, माझ्या हातात आहेत की गोठपाटल्या त्यांपैकी.. तिचं काय, उभं आयुष्य पडलंय अजून तिची हौस काय कधीही पुरी होईल, आज नाही उद्या नवरा मढवून टाकील सोन्यानं, मलाच काही केलं नव्हतं आजपर्यंत..
.. काय म्हणता? ..माझ्या लग्नाच्या वेळेला? छे हो! घरचं नाही अन् दारचं नाही. दोऱ्यात ओवलेलं मंगळसूत्र! किती दिवस ताणायचं! आता म्हटलं हे निमित्त साधायचंच.. हो नं! तेच आयत्या वेळेस सुलीच्या अंगावर ठेवले प्रसंग साजरा करायला.. हो ना? किती उठून दिसतीय लग्नात! .. हो नं, सगळ्यांनी कौतुक केलं आमच्या हौशीचं.. हं मग! तुम्हालाही वाटलं ना.. लग्न कसं अगदी थाटामाटात लावून दिलं की नाही?
.. हुंडा नाही घेतला म्हणून काय झालं! लग्नात काय कमी खर्च झाला म्हणता!.. अहो, एकानं काय होतंय.. साऱ्या गावाला कळलं असेल माझ्या लेकीचं लग्न. चांगले दोन दोन बॅण्ड आणले होते हो. बाहेर मांडव-बिंडव घातलेला मोठा. सारी ऐसपैस वावरती, फिरती.
.. हो, जिलबीशिवाय लग्नाचं जेवण कसं होणार हो! अगदी दोन-चार टाकून द्याव्यात पानात इतकी आग्रह करकरून वाढली हो प्रत्येकाला. पण मांडेही मागायची मंडळी आयत्या वेळी म्हणून ती एक तयारी करून ठेवली.. तेवढय़ानं काय होतंय! आयत्या वेळी जावईबापूंचा रुसवा काढायला चार-पाच हजारांचा सूट ठेवलेला तयार.. ते काही विचारू नका. संध्याकाळी आइस्क्रीमसह रिसेप्शन होतंच की. रात्री वरात तर अशी सजवली, गाजवली म्हणता.. हो तर, गणपतीची मखरात रोषणाईनं मढवलेली मिरवणूक झक मारील.. आख्खं गाव जागवेल अशी. फटाक्यांचा नुसता दणदणाट. कसली हौस म्हणून ठेवली नाही हो करायची.
.. परवा नं? हो. सुली अन् तिचा नवराच की हो.. अहो, काही विचारू नका! काय म्हणायचं या सुलीला! अहो, तोंड वर करून मुलगी लग्नाचा सारा हिशेब मागायला आली होती.. अंहं, मी म्हंटलं, ‘सुले, तू गं कशाला काळजी करतेस त्याची? आई-वडील जिवंत आहेत नं तुझे!.. मग काय विचारता? जावईबापूंनी तोंड उघडलं. पोपटासारखा चुरूचुरू बोलायला लागला, ‘तुमची दानत जिवंत आहे का नाही ते पाहायचंय’.. बघा म्हणजे झालं! ही कालची पोरं. परीक्षा घ्यायला निघाली आमची..
.. सुली? सुली त्याच्या वरताण, म्हणे, ‘फुटका मणीसुद्धा घातला नाहीस अंगावर; पाच वर्षांच्या माझ्या नोकरीतली कमाई तरी दे थोडी माझी मला.’.. अहो, तर काय? असा संताप आला होता. यांच्या जागी मी असते तर थोबाडलीच असती. पण राग गिळून म्हटलं, ‘घोडे, हे भिकेचे डोहाळे कसले गं तुला? काय कमी आहे तुला? अन् लग्नात ७५-८० हजार पैका खर्चला तो फुकापासरीच का गं?’.. मग काय विचारता? खाली मान घालून गेली. जावईबापू तर चहा न घेताच उठले; म्हटलं, जाऊ देत..
अहो, येसूवहिनी, तुम्हीच सांगा, यांनी कमी का तंगडतोड केली सुलीला नोकरी मिळवून देताना? आमचा जीव तुटायला लागला, हिचं नुसतं बसून खाणं पाहून. एवढी शिकवली.. काय म्हणता? सेकंड क्लास? सेकंड क्लास तर सेकंड क्लास! .. छे ! कसली मिळते सहजी! यांनी उपोषण करायचं ठरवलं होतं तिला नोकरी नं देणाऱ्यांविरुद्ध.. काय म्हणता? तिच्यापेक्षा एखाद्या मुलाला नोकरीची जास्त जरूर? त्याचं जीवन उभारायचं असतं? मग त्यात आमच्या मुलीनं काय घोडं मारलं? सर्वात मोठी मुलगी, तोच मुलगा असता तर नसती का करावी लागली नोकरी? जरा हातभार लावला पोरीनं घराला तर काय जातं लोकांचं?..
..मग? सांगते काय तर.. यांनी उपोषणाची धमकीच दिली तेव्हा कुठं हिला नोकरी लागली त्या बँकेत. पैसा मिळायला लागल्यावर वाटायला लागलं असेल तिला हे सगळं आपलंच.. अहो, कुठं नाही म्हणते मी? घेतला नं तिचा पैसा घरात. पण तिच्याच लग्नात मग खर्चला नं. मग आणखी त्याचा दावा कशाला आमच्याशी?.. काही म्हणा तुम्ही, पण आम्ही जे केलं ते यथाशक्ती अन् बरोबरच केलं.. अहो, असं वाजतगाजत लग्न करायला धाडस आलं ते तिच्याच बळावर नं? पण तिला काय त्याचं!.. हो तर काय! आजची पोरं अशीच. मुलगा असो मुलगी असो. पैसा कमवायची कुवत आली की अक्कल गहाण ठेवल्यासारखी वागतात..
.. म्हातारपणची काठी? अहो, हिचा जन्मच होऊ नये म्हणून कोण कारस्थानं झाली आमच्या घरात, पण मी पुरून उरले साऱ्यांना आणि हिचा जन्म झाला, त्याचे असे पांग फेडतीय मेली.. पहिली बेटी, धनाची पेटी? हो ते मात्र खरं झालं हो त्या वेळी.. कसं विचारता? अहो, यांचं एक पैसे खाल्ल्याचं प्रकरण मार्गी लागलं हो हिचा जन्म झाल्या झाल्या, मग बनली सगळ्यांच्या लाडाची मैना!
.. हो हो, आता येईल नं थोडय़ाच दिवसांत माहेरी. मग आम्ही दोघं जाणार आहोत.. यात्रा कंपनीबरोबर हो!.. मुलांचं? अहो, त्यांना करून घालील की सुली! माहेरवाशीण झाली तरी बाईच्या जातीला चूल का चुकलीय! आमचा अनुभव हाच आहे ना? मग तिला काय झालं!..
.. काय म्हणता? लग्नाचा एवढा खर्च आणि लगेच यात्रेचा? लग्नाचा खर्च आला हो एक ३०-३५ हजार रुपये, पण मुद्दामच आकडा फुगवून दाखवला; नाहीतर पुन्हा ही माणसं त्रास द्यायची हो माझ्या सुलीला.. यात्रेसाठी म्हणता होय? हो हो तिचे थोडे पैसे आहेत शिल्लक आमच्या गाठीला, त्यावर होईल थोडी देवाची सेवा! संधी चालून आलीय, लाथाडा कशाला!’’
श्रीपाद पु. कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा