पॅलेट ह्य गोष्टीचं मला लहानपणी फार आकर्षण होतं. एक मोठी तबकडी आणि त्याच्या बाजूने लहान तबकडय़ा लावलेल्या असाव्या अशी त्याची रचना. आणि अशा छोटय़ा-मोठय़ा कप्प्यांनी बनलेलं पॅलेट. सगळ्या रंगांना आपलं म्हणणारं, चित्रकारासाठी रंगांची प्रयोगशाळा बनणारं.
त्याच्या काही कप्प्यांमध्ये रंग फक्त ओतले जातात तर काहींमध्ये नवे रंग निर्माण होतात. अनेक रंगांचा, रंगछटांचा अनुभव घेतलेलं पॅलेट. त्याचा स्वत:चाही असा एक रंग असावा? की त्याला रंगच नसतो? असला तरी चित्रकारासाठी त्याच्या रंगापेक्षा महत्वाचं असतं त्याचा रिक्तपण. त्याचे रिकामे कप्पे, रंगांना घेण्यासाठी उत्सुक. ते रंगतं तेही त्या चित्रकारासाठी, स्वत:साठी नाही. चित्रकारासाठी हे त्याचं रंग-नसलेपण महत्त्वाचं. आपलं चित्र साकारण्यासाठी त्याला लागतंच, हे पॅलेट.
कधी गडद, कधी फिके, पण ‘ओले’ रंग अनुभवतं हे पॅलेट. त्याच्यामध्ये बनलेल्या काही छटा चित्रभर पसरतात, तर काही उरतात बिनुपयोगी. त्याच्या काही कप्प्यांत उमटतात चित्रकाराच्या कल्पनेतले रंग, तर काहींमध्ये पडतात काहीशा चुकलेल्या छटा. त्याच्या प्रत्येक कप्प्यातला रंग चित्रात उमटेलच असं नाही. पण त्याला नसते त्याची काळजी. ते आनंद घेत असतं, चित्रकाराच्या रंगामध्ये रंगण्याचा, त्यांच्या ओलेपणात भिजण्याचा. त्याच्यात बनलेले रंग कसे दिसले, ते चित्राचा भाग बनले का, चित्र जमले की नाही ह्याची चिंता नसते त्याला. प्रयोगशीलता, वैविध्य, प्रयत्न, काही क्षणांसाठीचं रंगणं, आणि पुन्हा रितं होणं, असे अनुभव घेत असतं ते, नेहमीच. किती अनुभवसंपन्न होत असेल नाही, ते लहानसं पॅलेट.
त्याला स्पर्श होतो कुंचल्यांचा, रंगांचा, कधी चित्रकाराच्या बोटांचा. ते जवळून पाहत असतं चित्रकाराचं कौशल्य, त्याचे प्रयत्न, चित्र रंगवण्याची त्याची धडपड. एखादी रंगछटा अचूक जमल्यावरचा चित्रकाराच्या चेहऱ्यावरचा आनंद ते अगदी जवळून बघत असतं, कधी चुकीचे रंग मिसळल्यामुळे होणारी नाराजी ह्य पॅलेटलाही जाणवत असते. पण कोणत्याही रंगाला आपणहून धरून ठेवणं, किंवा सोडून देणं हे त्याला माहीत नसतं. ते कधी अस्ताव्यस्त रंगतं, कधी नेटकं, कधी एकाच रंगात भिजतं, तर कधी अनेक. त्याला पत्ताही नसतो ते कसं दिसतंय ह्याचा, त्यात रंग असताना वा नसतानाही.
चित्र पूर्ण झालं की ते स्वच्छ, कोरडं आणि रंगशून्य होतं, पुन्हा एकदा रंगण्यासाठी. ते पुन्हा सज्ज होतं चित्रकाराच्या प्रतिभेमध्ये रंग भरण्यासाठी, कुंचल्याच्या स्पर्शाने मोहरण्यासाठी, नव्या एखाद्या कलाकृतीची निर्मिती अनुभवण्यासाठी. जगणंही असंच हवं ना, सगळ्या रंगांना सामावणारं, तरी अलिप्त!
मनाली ओक, पुणे – response.lokprabha@expressindia.com
पॅलेट
पॅलेट ह्य गोष्टीचं मला लहानपणी फार आकर्षण होतं. एक मोठी तबकडी आणि त्याच्या बाजूने लहान तबकडय़ा लावलेल्या असाव्या अशी त्याची रचना. आणि अशा छोटय़ा-मोठय़ा कप्प्यांनी बनलेलं पॅलेट.
First published on: 24-07-2015 at 01:13 IST
मराठीतील सर्व ब्लॉगर्स कट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog