दुपारी मला कंटाळा आला; तो केव्हाही येतो. जाम बोअर होत होतं, असं sad sad िवाटत होतं उगाचंच. दिला टाकून एक status message, “feeling sad” असा. काहींनी आस्थेनं ‘का, काय झाल?’ अशा अर्थाच्या comments टाकल्या तर काहींनी चक्क like केलं त्याही status ला. आणि काहींनी तत्त्वज्ञान पाजळलं, दु:खं म्हणजे नक्की काय वगैरे सांगणारं. काही वेळात मी ‘Happy again’ असा status message टाकला. (काहीच उद्योग नसल्यानं मी टी.व्ही.चे channels scroll करत बसले होते. अचानक एका channel वर मला माझा आवडता चित्रपट लागल्याचं दिसलं होतं आणि त्यावर माझी ही ‘happy reaction होती). याहीवेळी काही likes, आणि काही ‘का, कसं काय’ अर्थाच्या, तर काही ‘आनंद म्हणजे काय, आणि सुख हे कसं मानण्यावर असतं वगैरे आशयाच्या comments आल्या.
काही वेळाने notification आलं, एका मित्राने आपलं status update केल्याचं. त्याचं नवं status होतं तीन ठिपके.. यावर comment म्हणून दुसऱ्या एका मित्राने चार ठिपके, तिसऱ्याने पाच, असं करत करत साधारण ८-१० लोकांनी एक-दोन ठिपके वाढवून त्या comments च्या मालिकेत स्वत:ची अशी भर घातली होती. काही तासांनी पहिला ठिपका टाकणाऱ्याचीच comment आली, एक ठिपका (पूर्णविराम असा अर्थ असावा त्याचा.) शब्दाविण संवादू म्हणतात ते यालाच.
संध्याकाळी मी एका फोटोमध्ये tag झाल्याचं notification आलं. फोटोमध्ये मी नव्हते. पण ‘मी फोटो टाकला आहे, तो पहा’ असं सांगण्यासाठी, माझ्या एका मैत्रिणीने, मलाच नाही तर इतरही काही मित्र-मैत्रीणींना त्यात tag केलं होतं. थोडक्यात काय तर फोटो वरती नावं सगळ्यांची, पण चेहरा एकाचाही नाही अशी परिस्थिती होती. या Internet च्या जगात काही जण आपला चेहरा लपवतात, काही जण तो बदलतात, तर काही लोक आपला चेहराच हरवतात. असो.
एकदा बसने प्रवास करत होते. माझ्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे मला खिडकीतून बाहेर बघण्यात रस नव्हता. धावणारा रस्ता, पाळणारी झाडं असल्या गोष्टी पहायला अर्थातच माझ्याकडे वेळ नव्हता. माझं 3G on होतं आणि मी कोणी कुठे upload केलेली चित्र, update केलेले profiles, मला पाठवलेली पत्र, माझ्याशी share केलेले videos वगैरे पाहण्यात मग्न होते. काही unread messages उघडले तर त्यात २—३ विनोद होते, jokes हो. ते वाचून मी जोरात हसले, तसे आजूबाजूचे काही लोक माझ्याकडे अचंबित होऊन पाहू लागले, तर काहींना लक्षातही नाही आलं माझं हसणं. कारण तेही आपापल्या ‘smart’ जगात गर्क होते. आणि माझ्या लक्षात नाही आलं मी त्या २-३ पैकी नक्की कोणत्या विनोदावर हसले ते! त्यातला एखादा सांगितला असता आत्ता, पण एकही आठवत नाहीये.
दिसतं खूप काही, पण भिडत काहीच नाही, पाहून सगळं होतं; आपण पोचत कुठेच नाही. बोटांना मुंग्या येतात, डोळे थकतात, आपण कशावर काय प्रतिक्रिया देतोय कळत नाही. overburden झालेलं डोकं बधीर होतं आणि मग भावनांची सरमिसळ होते सगळी, आणि भाषेचीही. आपला फोन मिरवत असतो भली मोठी contacts’ list पण contacts असतात कमी; आपले mail आणि social networking accounts मिरवत असतात, लांब friends’ lists पण friends असतात कमी; आपण असतो खूप circles चा भाग, पण सहभाग असा नाही. या Internet च्या आभासी जगात खरंच का सगळंच असतं आभासी?
हे आत्ताचं वाक्य जर मी.. १०—१२ likes तरी नक्कीच मिळतील, नाही?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा