एखाद्या दिवशी आपल्या मनात जे जे येतं तसंच्या तसं सगळं घडत जातं.. कशातही नाव काढायला जागा नसते.. असं खरंच झालं तर खुशाल समजा तुम्हीसुद्धा स्वप्नात आहात…
‘माझं काय चुकलं सांगा काका?’ समोर बसलेली अस्मिता विचारत होती. अस्मिता माझ्या मित्राची सून. तिला द्यायला थेट उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी मनातून गंभीरपणे पण वरकरणी हसत म्हणालो, ‘तुझं काही चुकलं नाही, हेच चुकलं.’ ‘म्हणजे?’ अस्मितानं गोंधळून माझ्याकडे पाहात विचारलं. ‘म्हणजे असं की, चुकणं हा मनुष्यस्वभाव आहे, आणि तुझं काहीच चुकलं नाही म्हणजे तुझं वागणं माणसासारखं नव्हतं, संगणकासारखं होतं.’ अस्मिता गप्प झाली. माझ्याशी वाद घालणं म्हणजे स्वत:चं डोकं फिरवून घेणं आहे, असं तिला वाटलं असावं.
गोष्ट अशी झाली की अस्मिताच्या सासूबाईंनी काल सकाळी सांगितलं, की त्यांच्या सासूबाईंची धाकटी बहीण संध्याकाळी राहायला येणार आहे. ती जुन्या पठडीतली असल्यामुळे नि सध्या चातुर्मास चालू असल्यामुळे अस्मिताच्या सासूबाईंना आजच्या दिवस तरी स्वैंपाकात कांदा, लसणीचा वापर नको होता. त्याप्रमाणे त्यांनी अस्मिताला सांगितलं. त्यावर थोडं थांबून नि आवाजात मृदूपणा आणून अस्मितानं सुचवलं, की तुमच्या मोठय़ा माणसांच्या भाज्या नि आमटी वेगळी काढून त्यात कांदा, लसूण घालू या नको. बाकीची आमच्यासाठी नेहमीप्रमाणे होऊ द्या. (आमच्यासाठी म्हणजे अस्मिता आणि तिच्या नवऱ्यासाठी!). नाही तर आम्ही दोघं आज बाहेर जेवायला जाऊ. एकाच पंक्तीत घरातल्या भेदाभेदाचं पाहुण्यांपुढे प्रदर्शन होणं कदाचित सासूबाईंना आवडणार नाही, या कल्पनेनं अस्मितानं पर्याय सुचवून निर्णय सासूबाईंवर सोपवला.
सासूबाईंना यातली कुठलीच तडजोड पसंत नव्हती. त्यांना सर्वानी एकत्र एकच जेवण जेवायला पाहिजे होतं नि तेही कांदा, लसणाशिवाय!
आईच्या चेहऱ्यावरची नापसंती बघून अस्मिताच्या नवऱ्याला तिची दया आली. तो अस्मिताला काहीशा विनवणीच्या सुरात म्हणाला, ‘आई म्हणते तसंच करू या ना! एखाद दिवस कांदा, लसूण नसली जेवणात तर काय मोठा फरक पडणार आहे?’ त्यावर उसळून अस्मिता त्याला म्हणाली, ‘मग मी जेवतच नाही. नाही एक वेळ जेवले तरी फरक पडणार नाहीये.’
शेवटी तिनं आपलंच खरं केलं. दोघांनी बाहेर जेवण्यासाठी नवऱ्याला तयार केलं. नशीब, यावेळेपर्यंत मावशी आल्या नव्हत्या!
जेवणं व्यवस्थित पार पडली. नातू नि नातसून यांची चौकशी मावशींनी केल्यावर अस्मिताच्या सासूनं दोघं एका मित्रानं ठरवलेल्या पार्टीसाठी गेल्याचं सांगितलं.
पण झालेला प्रकार सासूबाईंना आवडला नाही. त्यांना त्यांच्याबरोबर सुनेनं नि मुलांनी सुद्धा घरात जेवायला राहायला नि बिनकांदा, लसणाचं जेवण जेवायला हवं होतं.
दुसऱ्या दिवशी मावशी जाईपर्यंत सर्व काही जणू काही झालंच नाही अशा थाटात चाललं होतं. पण मावशी गेल्यावर अस्मिताच्या सासूबाईंचा अबोला आणि संवादातला तुटकपणा सुरू झाला. अस्मिताला ते जाणवलं नि तिला त्याचं कारणही माहीत होतं. पण तिच्या लेखी तो विषय संपला होता. ‘चला नेक्स्ट’ म्हणून तिनं सासूबाईंशी बोलण्याचा प्रयत्नही केला होता. पण व्यर्थ.
तसं पाह्य़लं तर शेवटची, मी जेवणारच नाही, ही टोकाची भूमिका घेईपर्यंत अस्मितानं कोणाच्याही स्वातंत्र्यावर गदा न येईल अशा रीतीनं समस्या सोडवली होती. त्यामुळे तिच्या दृष्टीनं तिनं त्यात सर्वाची काळजी घेतली होती. पण सासूबाईंना सुनेची तात्पुरती शरणागती हवी होती. आणि एखादवेळेस सुनेनं अशी तडजोड करायला काय हरकत आहे, असा त्यांचा सवाल होता. त्यांची त्यांच्या मावससासूबाईंसमोर ‘आज्ञाधारक बालक’ अशी अवस्था होती. त्यांना अधिकाराची जागा देऊन त्याची भरपाई करणं (त्यासाठी प्रसंगापुरतं स्वत:कडे बालकत्व घेणं) अस्मिताच्या हातात होतं. त्यातली सासूचं मन जिंकण्याची एक संधी तिला दिसली नाही.
प्रत्येक माणसात एक बालक असतं. ते दुखावलं तर त्या माणसाला दु:ख होतं नि सुखावलं तर त्याला आनंद होतो. समोरच्या माणसातल्या बालकाला बरं वाटेल असं वागलं, ते दुखावणार नाही याची काळजी घेतली, तर त्याचं मन सहज जिंकता येईल.