आज भाजी आणण्याचा टर्न माझा होता. मंडईत जाताना धक्काच बसला. म्हणजे नेहमी बसतात ते धक्के रस्ते नीट नसल्याने होते, पण हा धक्का नवीनच होता. आमच्या ऑफिससमोरचा रस्ता अगदी सिमेंट-काँक्रिटचा केलेला. गाडी झुमकन गेली पुढे. कुणीही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत नव्हतं आणि रस्ता एकदम स्वच्छ! कुणाचीही गुटख्याची पिंक नाही. रस्त्यात थुंकू नये अशा पाटय़ा लावलेल्याही नाहीत आणि पुढे तर चक्क एक पोलीस सुटाबुटातल्या पोराला अडवून पाचशे रुपये फाइन करत होता, रस्त्यात थुंकला म्हणून! वाटलं, पोलीसमामांना शिरसाष्टांग दंडवत घालावा. अगदी तसं केलं नाही, पण थँक्यूू मात्र म्हटलं. तोही अदबीने ‘वेलकम’ म्हणाला.
पुढे आझाद चौकातला साईबाबांच्या मंदिरासमोरचा उताराचा रस्ता, ओय होय! खड्डे गायब.. काय भारी वाटलं माहिताय का? चक्कशंभर फूट रस्ता मी एकाच वेगाने, कचाकच ब्रेक न लावता जाऊ शकले आणि समोरून वन-वे तोडत येणारा एकही हीरो नाही. क्या बात है, आज कुछ स्पेशल जरूर है! आनंदाने नाचतच (मनातल्या मनात) मंडई गाठली.
तिथे अजूनच धक्के, गाडी पार्किंग शिस्तीत, एक माणूस प्रत्येक गाडीवालीला (गाडीवाल्याला सुद्धा) अदबीने गाडीसाठी जागा दाखवत होता. रीतसर पावती देत होता. नेहमी वाट अडवणारे मुजोर रिक्षावालेही वाट करून देत होते. कसलाही गोंगाट नाही, भाजी विकणाऱ्या बायका यायला पुरेशी वाट ठेवून रांगेत बसलेल्या. गाजर कसं किलो विचारलं तर खाऊन तर बघा म्हणून ती गाजरवाली चक्क मला ऑफर करत होती. काही म्हणा, मूठभर मांस चढलं आणि मी नको असतानाही एक किलो गाजरं खरेदी केली. पुढे जायला मला एका बाईने स्वत:हून वाट दिली, हेही आश्चर्यच. भेंडी, मटार, पालक, कांदे-बटाटे, पुदीना, कोथिंबीर सगळी म्हणजे सगळी भाजी कुठलाही त्रास न होता मला घेता आली. तेही मी पिशवी विसरले असताना भाजीवाल्याकडून दिल्या गेलेल्या कॅरी बॅगची किंमत डिस्काऊंट म्हणून देऊन. खूष होऊन मी पावशेर चक्का घ्यायला गेले. दर विचारला. थोडा वेळ विचार केला, खरंच हवाय का आपल्याला आणि एवढा वेळ (म्हणजे दोन मिनिटं) मी तिथे नुसती थांबूनही दुकानदार विचारीत होता, ‘देऊ का मॅडम?’ नेहमी तो ‘बाई, हवंय का सांगा पटकन, दुसरी पण कस्टमर असतात,’ असा दम द्यायचा हो!
नेहमी मंडईतून बाहेर पडताना हाश्शहुश्श करीत बाहेर पडणारी मी अगदी शांतपणे गाडीपाशी आले. आता मात्र एवढे धक्के पचवल्यावर मी नीट निरीक्षण करत चालले होते. रस्ता एकदम कागदविरहित, कुठे पुडय़ा खाऊन टाकणे नाही, रस्त्यावर तिरक्या गाडया लावून गप्पा मारणारी टोळकी नाहीत. अहो गर्दीच्या रस्त्याचे सिग्नलसुद्धा चालू होते, आता बोला!
रस्त्यातून जाणाऱ्या-येणाऱ्यांकडे आता माझं लक्ष गेलं. एकही तरुण गाडी चालवत असताना मान वाकडी करून मोबाइलवर बोलताना आढळला नाही. नेहमी अशा फारच बिझी माणसांपासून जरा जपूनच गाडी चालवावी लागते. कहर म्हणजे एकाची मोबाइलची रिंग वाजली. तर तो रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून बोलला. बहोत खूब राजे! मी त्याला मनातून शाबासकी दिली.
घरी आले. पोस्ट बॉक्स पाहिला. माझ्या कोकणातल्या भाचीचं पत्र मिळालं. तारीख पाहिली. आज ती वाचता आली. नाहीतर पोस्टाचे शिक्के हे वाचता न येण्यासाठीच असतात ना, अरे, याच आठवडय़ात पोस्ट केलेलं दिसतंय. म्हणजे कोकणातलं पत्र पाच-सहा दिवसांत आम्हाला मिळालं. महिना महिना पत्र मिळत नाहीत असाच शिरस्ता, तिथे हे अघटितच होतं. म्हणजे पोस्ट खातंही बदललंय. आणखी एक सुखद धक्का. घरात येऊन टीव्ही ऑन केला, तर अँकर जोरजोरात आनंदाने सांगत होता. सर्वोच्च न्यायालयाचा अभूतपूर्व निकाल, भ्रष्टाचार करताना पकडले गेलेले अनेक कॅबिनेट मंत्री कायमस्वरूपी निलंबित केले आहेत आणि या निर्णयाची अंमलबजावणी अगदी आज, आत्ता, ताबडतोब होत आहे. हे भगवान, मुझे संभालो, इतनी खूशी की आदत नही है मुझे!
सगळं कसं मनास सुखविणारं घडताना पाहात होते, अनुभवत होते, का कुणास ठाऊक, शाळेतली परेड आठवली, मनापासून अभिमानाने एक सॅल्यूट ठोकला आपल्या तिरंगी झेंडय़ाला. ओय ओय ओय!!! माझा हात जोरात आपटला भिंतीला.
मी घरातच होते. पहाटे स्वप्न पाहिलं होतं मी! म्हणजे हे सगळं खरं नव्हतंच. काय हे? मला वाटलं होतं, या स्वातंत्र्य दिनापासून हा बदल घडला असावा, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे असेल कदाचित. पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात म्हणे, असाही आशावाद डोकावला मनात.
ब्लॉगर्स कट्टा : ‘मनो’गत !
आज भाजी आणण्याचा टर्न माझा होता. मंडईत जाताना धक्काच बसला. म्हणजे नेहमी बसतात ते धक्के रस्ते नीट नसल्याने होते, पण हा धक्का नवीनच होता.
आणखी वाचा
First published on: 19-09-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व ब्लॉगर्स कॉर्नर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog