साधारण १९८७ सालातली गोष्ट आहे ही. प्रणयने (माझा नवरा) दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या एक वितरक मित्राला घरी जेवायला बोलवले होते. मी फ्रुटसॅलड व पुरीचा स्वयंपाक केला. आमच्या फ्लॅटभोवती भरपूर झाडं त्यामुळे वातावरण गार व प्रसन्न असते. घरात खूप सामान नसल्याने घर मोकळे व नेटके दिसे. मी जेवणाची छान तयारी केली व आम्ही दोघे त्यांची वाट बघत बसलो. वितरक मित्र आले आणि वातावरणामुळे खूश झाले.

विविध विषयांवर गप्पा मारत हसत-खेळत जेवणं उरकली. पाहुण्यांनी स्वयंपाकाचे, घराचे, मुलींचे खूप कौतुक केले. आम्ही सगळे गप्पांमध्ये दंग असताना माझ्या मोठय़ा मुलीने, वृषालीने, कानात खाज आली म्हणून कॉटनबड घातले. पण काय झाले कोणास ठाऊक तिचा अचानक तोल गेला आणि ती सप्पकन जमिनीवर आपटली. ज्या कानात कॉटनबड होते त्याच बाजूला पडली आणि काही कळायच्या आत कानातून भळाभळा रक्त यायला लागले. ती प्रचंड घाबरली व रडायला लागली. मी क्षणभर गांगरले, पण लगेच सावरले. चटकन डिरेक्टरीत बघून ईएनटी स्पेश्ॉलिस्ट डॉ. चितळेंच्या हॉस्पिटलला फोन केला व ते आहेत याची खात्री करून घेतली. वॉचमनला सांगून रिक्शा बोलावली व प्रणयाला राधिकाकडे लक्ष ठेवण्यास सांगून पाहुण्यांचा निरोप घेऊन मी वृषालीला घेऊन हॉस्पिटल गाठले.
सुदैवाने कानाच्या पडद्याला काही झाली नव्हते. त्यांनी ड्रेसिंग करून काही औषधे लिहून दिली व आम्ही परतलो. पाहुणे मित्र अजून घरीच होते. वृषाली आता शांत झाली होती. झाला प्रकार बघून ते आमचे खूपच कौतुक करू लागले. ‘‘तुम्ही न घाबरता सिच्युएशन किती व्यवस्थित हॅण्डल केली. पटकन् निर्णय घेऊन मुलीला डॉक्टराकडे नेऊनदेखील आणले.’’ त्या साऱ्या कौतुकाने मला थोडे अवघडल्यासारखे झाले. मला कळेना की मी असे काय वेगळे केले की जेणेकरून हा माणूस माझी एवढी स्तुती करतो आहे? म्हटलं, जाऊ दे, असतो एखाद्याचा स्वभाव- अति कौतुकाचा!
सहा महिन्यांनंतर आम्ही नवीन गाडी घेतली. तिची डिलीव्हरी दिल्लीहून घ्यायची होती म्हणून आम्ही मुलींना घेऊन ट्रेनने दिल्लीला गेलो. दिल्लीच्या हॉटेलचे रिझर्वेशन या वितरक मित्रानेच केले आणि आम्हाला आग्रह करून घरी जेवायला बोलवले.
संध्याकाळी सात वाजता ते आम्हाला हॉटेलवर घ्यायला येणार होते. नऊ वाजले, त्यांचा पत्ताच नाही. त्या काळी मोबाइल्स नव्हते. प्रणयकडे फक्त ऑफिसचाच नंबर होता व तेथे कोणी फोन उचलत नव्हते. काय करावे कळेना. हॉटेलच्या रेस्टॉरंटमधून मुलींसाठी जेवण मागवले व त्यांना खाऊ घातले. त्यांचे खाणे आटपले आणि ते अवतरले. मला तर प्रचंड राग आलेला. पण संयम बाळगत त्यांच्या ‘सॉरी, सॉरी, भाभीजी देरी के लिये माफी चाहता हूँ’ ला हसून ‘इट्स ओके’ म्हणत आम्ही त्यांच्या गाडीत बसलो.
दहाच्या सुमारास आम्ही एका पॉश एरियातील आलिशान बंगल्यात पोहोचलो. बंगल्यात सगळी सामसूम! नोकराने दार उघडले, आम्ही हॉलमधल्या सोफ्यावर विराजमान झालो. खरं तर खूप थकलो होतो, मुली तर पेंगुळल्याच होत्या. मी या वितरक मित्राच्या मिसेसची वाट बघत होते. तेवढय़ात ते आतून बाहेर आले आणि म्हणाले, ‘या. मी तुम्हाला घर दाखवतो.’ मनात आलं बाबा रे आता जेवायला घाल. घर नंतर दाखव, पण तसे काही न दाखवत सगळे त्यांच्या पाठी घर बघायला गेलो. घर बरे होते. बाहेरून जेवढे पॉश वाटले तसे आत ठीकठाकच होते. अजूनही बाईचा पत्ता नव्हताच! बघत बघत आम्ही किचनमध्ये पोहोचलो. तिथे तर सगळी सामसूमच, सैंपाक किंवा त्याची तयारी, काहीसुद्धा नाही. मी तर हादरलेच. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत राहिलो. नक्की जेवायलाच बोलवले आहे ना असा आम्हा दोघांना प्रश्न पडला. तेवढय़ात ते म्हणाले, ‘चला येथून थोडय़ाच अंतरावर एक छान हॉटेल आहे, आपण तेथे जेवायला जाऊ.’ त्यांना विचारलं, ‘भाभीजी कहाँ है?’ तर म्हणाले, ‘बस वो आही रही है।’ तेवढय़ात जिन्यावरून एक बाई खाली उतरली. ते म्हणाले, ‘ये रही आपकी भाभीजी!’ तिने हसल्या-न हसल्यासारखे केले. काही बोलणे नाही, काही विचारणे नाही. आता पुढचे एक दोन-तास या बाईबरोबर कसे काढायचे ही चिंता वाटायला लागली.
आम्ही हॉटेलला पोहोचलो. मी काही बाही विचारून त्यांना बोलते करायला बघत होते. पण व्यर्थ. उत्तरं सगळी हो किंवा नाही अशीच. मुली तर खूपच कंटाळल्या. आम्ही जेवण ऑर्डर केले. वातावरण खूपच टेन्स झाले होते. प्रणय व या वितरक मित्राच्या धंद्याविषयीच्या थोडय़ा तरी गप्पा चालल्या होत्या, पण आम्ही दोघी मात्र गप्पच! तेवढय़ात जेवण आले आणि मला थोडे सुटल्यासारखे वाटले. जेवण जवळजवळ होतच आले होते. तेव्हढय़ात भाभीजी काही तरी अस्वस्थच हालचाली करू लागल्या. मी त्यांना काही विचारायच्या आत त्यांनी कसानुसा चेहरा केला आणि भडाभड उलटी केली. मला तर काही कळेचना, मुलीपण भेदरून गेल्या. वितरक मित्राचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता. मी पटकन् स्वत:ला सावरले. रुमाल घेऊन भाभीजींचे तोंड पुसले आणि त्यांना बाथरूममध्ये घेऊन गेले. एवढे सगळे होऊनसुद्धा त्या बाईच्या तोंडावरचा निर्विकार भाव काही बदलला नव्हता. मॅनेजरची माफी मागत ते आम्हा सगळ्यांना घेऊन निघाले. बायकोला घरी सोडले व आम्हाला आमच्या हॉटेलवर सोडण्यासाठी त्यांनी गाडी वळवली. एवढा वेळ धरून ठेवलेला बांध सुटल्यासारखे बोलू लागले. म्हणाले, ‘लहानपणी आई-वडिलांनी लग्न ठरविले. श्रीमंत बापाची काहीशी मंद मुलगी. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे नाही म्हटले नाही. पण आयुष्यात काही रामच उरला नाही.’ बराच वेळ बोलत होते. विमनस्कपणे आम्ही ऐकत होतो.
पुण्यात घरी ते आले तेव्हा त्यांच्या अति कौतुकाने मी अवघडून गेले होते, पण त्या अति कौतुकाच्या मागचे कारण मला आता कळत होते. घरातील बाईने हसतखेळत खंबीरपणे घर चालवलेले त्यांनी कधी बघितलेच नव्हते. झाल्या प्रकाराबद्दल परत परत माफी मागत त्यांनी आमचा निरोप घेतला तो कधीच न भेटण्यासाठी. त्यांनीही आमच्याशी काही संपर्क ठेवला नाही. हा अनुभव एवढी वर्षे जाऊनसुद्धा कालच घडल्यासारखा वाटतो.
अंजली प्रणय गुजर

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Success story of Pratiksha Tondwalkar who once worked as a sweeper and now holds the SBI AGM post
शौचालय साफ करून पूर्ण केलं शिक्षण, २० व्या वयातच सुटली नवऱ्याची साथ; वाचा SBI अधिकारी प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्षमय प्रवास
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
jayant patil
Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!
Story img Loader