एक लाल तोंडाचे माकड काळे तोंड असलेल्या वानराला हसायचे आणि चिडवायचे. म्हणायचे, ‘मी बघ कसा मेकअप केल्यासारखा दिसतो. तू तुझा चेहरा एकदा पाण्यात बघ. अंधार पडल्यावर तर तू दिसणारच नाहीस आणि दिसलास तर माणसे घाबरतील,’ वानर त्या वात्रट माकडाशी भांडत नसे. फक्त दिसण्याला महत्त्व देणाऱ्या माकडाला भाव द्यावा असे त्याला वाटले नाही.
माकडांना पकडून नेणारा एक गाववाला रानात आला. त्याला माकडाचा खेळ दाखवण्यासाठी लाल तोंडाचे ‘मेकअप’वाले माकडच हवे होते. काळ्या तोंडाचे जंगली वानर वाचले आणि लाल तोंडाचे माकड मात्र पकडले गेले. बिचारे ते मेकअपवाले माकड माणसाचा गुलाम बनले. त्याने उडय़ा मारून दाखवल्या. खेळ करून पैसे मिळवून दिले तरच त्याला केळे, चणे फुटाणे बिस्किटे सगळे खायला मिळायचे. नाहीतर उपास घडायचा. एकदा तर अंगात ताप असताना ‘मेकअप’वाल्या माकडाला कसरतीचा खेळ करून दाखवावा लागला. तेव्हा तर माकडाला रडू येत होते, पण माणसासमोर ते रडणार कसे? या गुलामगिरीचा माकडाला फार राग आला होता. हल्ली मधूनच ते अंगावर धावायचे व संधी मिळाल्यास चावायचे. त्याबद्दल माालकाने त्याला मारही दिला होता.
एके दिवशी दुपारी अचानक लाल तोंडाच्या माकडासमोर ते रानातले काळ्या तोंडाचे वानर येऊन उभे राहिले. हुप् हुप्च्या भाषेत त्याने माकडाला सांगितले की, ‘मी तुला सोडवायला आलो आहे. घाबरू नकोस. तुझा मालक झोपलाय. ही संधी चांगली आहे. मी झाडावर बसून वाटच बघत होतो की, त्याला कधी झोप लागतेय. काळ्या वानराने या मेकअपवाल्या माकडाच्या पिंजऱ्याचे दार बाहेरून उघडले. लाल तोंडाच्या माकडाची सुटका केली. मग दोघेही जंगलाकडे पसार झाले.
मेकअपवाले माकड वानराला म्हणाले, ‘आजपासून मी तुला मोठा भाऊ मानेन. तुझी जात वेगळी असली म्हणून काय झाले? तूच मला आज सोडवलेस. मी तुला रंगावरून काही वाईट बोललो असेन तर मला क्षमा कर.’ आपल्या या मानलेल्या खोडकर भावाला वानराने जवळ घेतले आणि थोपटले. वानर म्हणाले, ‘विसरून जा ते जुने सगळे. आता आनंदाने रानात माझ्याबरोबर राहा.’
जगातली माणसे आता रानटीपणाने वागू लागली आहेत. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवरून भांडत बसतात. धमक्या देतात. लढाई करतात. चांगल्या लोकांना गोळ्या घालून मारतात. आपण प्राण्यांनी तसे करता कामा नये. एकमेकांशी भांडता कामा नये. लाल तोंडाच्या माकडाला वानराचे सगळे म्हणणे पटले. आता वानर आणि माकड अगदी सख्ख्या भावासारखे एकमेकांना सांभाळून आहेत. एकाच झाडावर दोघे राहतात. हे छान झाले ना?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा