आपण समाजात वावरत असतो तेव्हा नेहमीच प्रत्येकाला अनेक अनुभव येतात. त्यापैकी नावे ठेवणारे किंवा निंदक तर अगदी आजूबाजूलाच असतात. अशांचे बोलणे, नावे ठेवणे किती मनावर घ्यायचे हे आपणच ठरवायचे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येकाला दुसऱ्याने कौतुक करावे, मला चांगले म्हणावे असे वाटते, पण हे वाटणे अनेकदा इतके वाढते, की समोरच्याचे मन सावरताना स्वत:ला काय हवे आहे याचा विसर पडतो. आपल्याला कधीच कोणी नावं ठेवू नये, अशी इच्छा बाळगून अनेक लोक जगत असतात. त्यासाठी ते स्वत:च्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालतात; पण हे फार काळ टिकत नाही.
परवाच वयाने मोठी असलेली माझी एक मैत्रीण भेटली आणि काही तरुणी बाजूने पास झाल्या. त्यांच्याकडे पाहून काहीसे कमेंट पास करू लागली. मुलींनी असे कपडे घालू नयेत. म्हणजे मॉडर्न कपडे घालावेत, पण ते मुंबई-पुणेसारख्या शहरांतच, पण इतर छोटय़ा शहरात कशाला हवेत असे नखरे. पुरुषांची नजर वाईट असते. ते मुलींना नावे ठेवतात. नावं ठेवून घेण्यापेक्षा ‘असे’ कपडेच घालू नयेत.
पण माझे असे मत आहे, आपल्याला कोणी नावं ठेवेल म्हणून अजून किती दिवस मुलींनी अशी बंधनं घालून घ्यायची. मान्य आहे, की खरंच काही चुकत असेल तर अशा कमेंटचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे, पण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना आयुष्यातील ठरावीक गोष्टींचा प्राधान्यक्रम ठरवता आलाच पाहिजे.
रतन टाटा म्हणतात, की यशस्वी होताना प्रत्येकाला अनेक अडथळे येतातच. त्यांच्याशी लढत बसण्यापेक्षा त्यांना मागे टाकून पुढे जा. कारण तुम्ही जेव्हा यशाच्या शिखरावरून खाली पाहाल तर हे अडथळे तिथेच असतील. कारण त्यांचे कामच तुम्हाला अडवणे आहे.
मग या अडथळ्यांचा किती विचार करायचा? त्यासाठी किती बंधनं घालून घ्यायची हे ठरवता आले पाहिजे. नाही तर मग आयुष्याची गंमत कुठे तरी हरवल्यासारखे वाटू लागते.
तरुण पिढीचे ज्यांचे अशा विचारांशी काहीही देणेघेणे नाही आणि दुसरी म्हणजे जुन्या परंपरांमध्ये अजूनही रमलेली पिढी यांचे मस्त चालले आहे; पण या दोन पिढिचा मध्य साधणारी पालकांची पिढी आहे. त्यांचे जरा अवघड होते. कारण ही मंडळी यापैकी कोणत्याच पिढीला पूर्णपणे स्वीकारू शकत नाहीत. अशा या मधल्या स्थितीमध्ये समाज या शब्दाला फार महत्त्व निर्माण होते.
समाज म्हणजेच लोक काय म्हणतील? मग काय होईल? असे अनेक प्रश्न. जे फार महत्त्वाचे नसतात, पण आपण त्यांचा विचार करण्यात विनाकारण आपली ऊर्जा वापरतो.
मुळातच आपण माणूस आहोत आणि चुका होणारच. चुकलो तर नावं ठेवणारच. हे का मान्य होत नाही? प्रत्येकाने आपलं कौतुकच करावं असा अट्टहास का? याच अट्टहासामुळे लोक स्वत:वर, स्वत:च्या विचारांवर बंधनं घालून घेतात आणि माझ्या मैत्रिणीसारखे त्याच विचारात अडकून बसतात.
व्यक्ती तितक्या प्रकृती हे साधं गणित आहे. मग प्रत्येक व्यक्ती ही एकसारखी निरनिराळ्या स्वभावाची, गुणाची असणारच.
अमित माझा मित्र आहे. तो एका सो कॉल्ड कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतो, जिथे अजूनही महिला आणि पुरुष या नावाखाली विचित्र भेदभाव केले जातात; पण तो खूप खुल्या मनाने जगतो. सर्व सहकाऱ्यांशी मोकळ्या मनाने गप्पा मारतो. त्याच्या या स्वभावावर साहजिकच टोमणे बसत होते. म्हणून त्याच्या वरिष्ठांनी त्याला ऐकविले. तर बिचारा अमित खूप काळजी करू लागला. पर्यायी याचा परिणाम त्याच्या कामावर झाला. पण अशा वेळी त्याने वरिष्ठांचा मान राखून पण स्वत:च्या स्वभावानुसार काही योग्य निर्णय घेतले असते तर कदाचित त्याला कमी त्रास झाला असता.
प्रत्येक ऑफिसमध्ये असे किमान दोन ते चार सहकारी असतातच, जे कामापेक्षा इतर गोष्टींना खूप महत्त्व देतात आणि स्वत:चेच नुकसान करून घेतात.
म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे काही ठोकताळे ठरवून घ्यावेत. त्यामुळे त्यांना भविष्यात अनेक गोष्टी सहज होतील; पण मला कोणी नावंच नाही ठेवली पाहिजे, माझे कौतुकच झाले पाहिजे, अशा अपेक्षा चुकीच्या ठरतील. काही ठरावीक गोष्टींना इग्नोअरन्स योग्य ठरतो, पण एखादी सुधारणा गरजेची असेल तर नक्की करा.
माणूस हा त्याच्या कार्याने मोठा झाला पाहिजे. जेव्हा त्याचे कार्य जगापुढे येते, तेव्हा त्याच्या आयुष्यातील अनेक छोटय़ामोठय़ा बाबी इग्नोरंट ठरतात.
समोरच्याने माझे कौतुक करावे म्हणून स्वत:वर बंधनं घालत राहिलात, तर कदाचित तुमच्यात दडलेला एखादा गुणही त्या बंधनात अडकून राहील.
पूजा मराठे

मराठीतील सर्व ब्लॉगर्स कट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blogger