आजच्या तिच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली होती. घरातील सगळी कामे आटोपून कॉलेजला जाणाऱ्या आपल्या मुलाचा टिफिन भरण्यासाठी तिची लगबग सुरू होती. तो बुटाची लेस बांधत असतानाच तिने त्याचा टिफिन बॅगेत भरायला घेतला तेवढय़ात बालराजेंचा प्रश्न, ‘आई, आज डब्यात काय गं?’ तिचे उत्तर ‘भेंडय़ाची भाजी.’ बस! आई-लेकामध्ये ठिणगी पडायला ‘भेंडय़ाची भाजी’ एवढं कारण पुरेसं होतं. झाले, बालराजेंनी आईवर भडिमार करत तणतणतच टिफिन न घेताच घरातून एक्झिट घेतली. तशी ती मनाने खूप हळवी. कोणीही जरासं बोललं तरी मनाला लावून घ्यायची तिची सवय आधीपासूनची. त्यामुळे आताही तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. तिच्या डोळ्यांतून पाणी यायला आणि ‘त्याची’ आठवण यायला तेवढं कारण पुरेसं होतं. डोळ्यांतून पाणी येणं ठीक, पण ‘त्याची’ आठवण का बरं.. त्याला कारण अगदी तसंच होतं. अगदी कॉलेजला असल्यापासून ‘त्याची’ एक सवय होती. रागात पटकन हिला काही तरी बोलून जायचं आणि मग हिच्या डोळ्यांतील पाणी पाहून पुन्हा तिला मनमोकळे हसविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे. मात्र, जेव्हा तिने घरातल्यांना दुखावले जाऊ नये म्हणून त्यांच्या मर्जीनेच लग्न करण्याचा आपला निर्णय ठाम केला. तेव्हा हा निर्णय ऐकविण्यासाठी झालेल्या भेटीत त्याने तिला सांगितले होते की, ‘‘ठीक आहे, आपले नाते का तोडावे’चे कोणतेही स्पष्टीकरण न देता तू हा निर्णय घेतला आहेस. तर मी तुला अजूनही फेरविचार कर असं सांगणार नाही. मात्र, तशी कधी गरज पडू नये, पण जर तुला कधी खूप दु:ख झाले किंवा मी हसणं विसरली तर नाही ना, अशी शंका जरी मनात आली तर नि:शंक मला फोन कर. मी तुला पुन्हा हसायला शिकवेन.’’ बस! एवढंच बोलून ‘त्याने’ तिचा निरोप घेतला. त्यानंतर लग्नाचे नव्याचे नऊ दिवस झाल्यानंतर मुळातच हळवी असलेल्या तिच्या मनाला छोटे-मोठे धक्के बसू लागले. कधी जाणतेपणे तर कधी अजाणतेपणे. अशाच एका क्षणी तिने त्याला जरासं बिचकतच कॉल केला. त्यानेदेखील आपल्या शब्दांना जागत त्या वेळी आणि त्यानंतर वेळोवेळी तिचे डोळ्यांतील आसवांचे रूपांतर ओठांवरील हास्यात केले. मग तो एक सिलसिलाच सुरू झाला. त्याचेदेखील त्रिकोणी कुटुंब. तिच्यासारखाच त्यालाही एकुलता एक मुलगा. दोघेही आपल्या संसारात चांगल्या प्रकारे रममाण झाले होते. आपल्या जोडीदारांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ न देता दोघेही एकमेकांना हवा तेव्हा आधार देत होते. खासकरून तिला जेव्हा-केव्हा मनमोकळं हसावंसं वाटायचं तेव्हा ती त्यालाच फोन करायची आणि तो आपण दिलेला शब्द तंतोतंत खरा करायचा.

आज, बालराजेंशी झालेल्या वादामुळे तिने पुन्हा एकदा नैराश्यातून बाहेर यायला त्याला कॉल केला. घरी जमलेल्या तमाम मंडळीना ‘‘सॉरी, एक महत्त्वाचा कॉल आहे. माझी एक ‘कमिटमेंट’ आहे,’’ असे म्हणत तो घरातून बाहेर आला. फोन उचलायला उशीर तर झालाच, पण या वेळी त्याचा आवाजदेखील बराचसा कातरलेला. तिचा प्रश्न, ‘‘काय रे काय झालं? आज आवाज असा का तुझा?’’ त्याचे उत्तर, ‘‘काही नाही गं.. असंच. बोल ना काय झालं?’’ तिने मग आज आपल्या चिरंजीवाबरोबर झालेल्या वादाचा शब्दन्शब्द सांगितल्यानंतर त्याने ‘‘बस, एवढंच ना,’’ असं म्हणत आपल्या शब्दांची चौफेर फटकेबाजी करत तिला हसविण्याचा प्रयत्न सुरू केला. काही वेळातच तिच्या चेहऱ्यावर हसू उमलू लागले. अखेर एका क्षणी त्या विदूषकाची मात्रा काम करून गेली आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली. ती फोनवर मनमुराद हसत होती आणि त्याच्या घरी जमलेली तमाम मंडळी स्वत:चा एकुलता एक मुलगा अपघातात गमावल्यानंतरदेखील हा कोणती ‘कमिटमेंट’ पूर्ण करण्यात गुंतला आहे, याचा विचार करत स्तब्धपणे उभी होती.
सागर शिंदे

Story img Loader