ते तिघं सध्या आपल्या घरात धुमाकूळ घालतायेत. आपल्या कळत-नकळत आपली तुलना सतत त्यांच्याबरोबर होते आहे. आता तुम्ही विचाराल, हे कोण तुर्रमखान? त्यांची ओळख काय? त्याचं कर्तृत्व काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पहिला, आजीने कष्टाने उभ्या केलेल्या गृहउद्योगाचा एकमेव वारस आणि मालक असलेला श्री! (होणार सून मी ह्या घरची)
दुसरा, एका गर्भश्रीमंत घरातली पोरगी पटवण्याचा पराक्रम गाजवलेला राया! (जावई विकत घेणे आहे)
तिसरा, गांधीजींची सहनशीलता, टिळकांचा दुर्दम्य आशावाद, श्रावण बाळाइतका आज्ञाधारक इत्यादी गुण पदरी घेऊन साक्षात श्यामच्या आईनेसुद्धा जिची टय़ुशन लावावी अशा मातेच्या पोटी जन्मलेला सुपुत्र आदित्य! (जुळून येती रेशीमगाठी)
आता बोला! आहे का तुमच्यात हिम्मत यांना आवरण्याची? संध्याकाळी ७ ते १० या वेळात बायकोच्या हातून रिमोट हिसकवण्याची? नाही ना! मग गप्प बसा आणि त्या तिघांच्या पराक्रमाच्या गाथा पाहा.
घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि आकाराच्या सहा-सात बायकांच्या कटकटी सांभाळून व्यवसायामध्ये इतकं नेत्रदीपक यश मिळवणं म्हणजे खायचं काम नव्हे. त्यात मधूनच अनेक वर्षांपूर्वी घराबाहेर काढलेला दारूडा काका घरात परत येतो. मग वाल्याचा वाल्मीकी व्हावा तसं या काकामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. या बदलाचा शिल्पकार अर्थातच श्री असतो. काहीही कारण नसताना घर सोडून गेलेले श्रीचे वडील काहीही कारण नसताना परत येतात. मग श्री स्वत:ची मानसिक कुचंबणा वगैरे काहीतरी विसरून हळूहळू वडिलांना स्वीकारतो. हाच श्री स्वत:च्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून घरदार सोडून एका ‘हॉटेल’मध्ये राहून फार हलाखीचे दिवस काढतो. संगणकासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री त्याचा गृहउद्योग एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतो. आर्थिक मंदी वगैरे शब्द त्याच्या गावीच नाहीयेत. त्याने नवीन उत्पादन बाजारात आणलं रे आणलं की त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. श्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतरसुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे. फक्त त्याच्या बिझी शेडय़ुलमुळे तो तिला जास्त वेळ देऊ शकत नाही. आता एकच माणूस कुठे कुठे पुरणार ना! मधल्या काळात श्रीच्या बायकोचा अपघात होऊन तिचा स्मृतिभंश होतो. अशातही श्री खचून जाऊन मालिका बंद पडू देत नाही, तर सुरुवातीचेच चाळीस-पन्नास एपिसोड परत दाखवून बायकोची स्मृती परत आणतो. श्रीची सामाजिक बांधीलकीसुद्धा वाखाणण्याजोगी आहे बरं का! फावल्या वेळात तो मित्र-मैत्रिणींची लग्नं लावून देतो, लहान पोरांचे हरवलेले मायबाप शोधून देतो, सासूबाईंचे नखरे सांभाळतो. थोडक्यात काय, तर श्रीचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व समजून घ्यायला अजून ५०० एपिसोड तरी नक्कीच बघावे लागतील. तोपर्यंत आपली खैर नाही.
रायाचं कर्तृत्व ऐकून तर तुम्हाला स्वत:ची लाज वाटेल. काहीही करत नसलेल्या रायाला एके दिवशी अचानक लॉटरी लागते. एका गर्भश्रीमंत घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडते. यथावकाश (म्हणजे सावकाश पन्नासेक एपिसोडनंतर) त्यांचे लग्न होते. श्रीमंत सासू-सासरे रायाला घरजावई व्हायला सांगतात. पण आपला स्वाभिमानी राया त्यांना ठाम शब्दात नकार देतो. पुढल्या काळात राया स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. या लोकांना व्यवसाय सुरू करताना भांडवल, जागा, परवानग्या असल्या फालतू अडचणींना सामोरं जावं लागत नाही. मनात येईल तेव्हा व्यवसाय सुरू करायचा आणि दोन महिन्यांतच त्याची कीर्ती सगळीकडे पसरवायची एवढंच त्यांना माहीत! श्री आणि रायाने भागीदारीत एखादी कंपनी सुरू केली ना तर अंबानी आणि अदानींची काही खैर नाही. असो. तर एके दिवशी नाइलाजाने रायाला घरजावई म्हणून सासू-सासऱ्यांच्या घरी जावं लागतं. तरीही न डगमगता राया तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. त्यात जर त्याला यश आले तर सावरकरांच्या इंग्रजांच्या कैदेतून सुटकेच्या घटनेइतकंच ऐतिहासिक महत्त्व या घटनेला प्राप्त होईल. श्रीप्रमाणेच रायाचंसुद्धा बायकोवर नितांत प्रेम आहे. ते सिद्ध करण्यासाठी अधूनमधून तो तिला चहा वगैरे करून देतो. तुम्ही कितीही वेळ घातलात ना तरी तुम्हाला इतका सुंदर चहा जमणार नाही. रायाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे राया अतिशय शांत आणि संयमी आहे. बहुधा त्याचा हाच गुण बायकांना आवडत असावा. तरीही अशा या रायाची सद्गुणगाथा चॅनलवाल्यांनी लौकर संपवली.
श्री आणि राया यांच्या गाथा ऐकूनच जर तुम्ही गार झाला असाल तर महात्मा आदित्यच्या तर जवळपासही येऊ नका. ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या अजय देवगणचा वंशज असलेला आदित्य त्याच्या कितीतरी पुढे गेलेला आहे. गंमत अशी आहे की, साधारण ज्या लोकांना आपण महात्मा म्हणतो, ते सगळे जन्मानंतर त्यांच्या कर्तृत्वाने महात्मा झाले. आदित्य आईच्या पोटातूनच महात्म्य घेऊन जन्माला आलाय. आदित्यच्या आईचा स्वभाव इतका गोड आहे की तिच्या फक्त सहवासानेच एखाद्याला डायबेटिस होईल. त्यामुळेच आदित्य एक अत्यंत सुस्वभावी मुलगा आहे. लग्नानंतर त्याच्या बायकोने त्याला ‘हम दिल आधीच किसी को दे चुके सनम’ असं सांगितल्यावरही तो तिच्यावर चिडला नाही. तिच्यावर नातं स्वीकारण्याची जबरदस्तीही त्यांनी केली नाही. याउलट तिला निर्णय घेण्याची मोकळीक दिली. हळूहळू तिला आदित्यचा चांगुलपणा उलगडू लागला. ती त्याला ‘तू किती चांगला आहेस रे’ असं दर एपिसोडमध्ये तीनदा म्हणायला लागली. तरीसुद्धा आदित्य तिला ‘मग राहा ना माझ्यासोबत भवाने!’ असं एकदाही म्हणाला नाही. शेवटी तिनेच पुढाकार घेऊन प्रेमाच्या सुधारित आवृत्तीची कबुली दिली. मगच त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. पण म्हणून मालिका बंद करण्याइतका आदित्य स्वार्थी नाहीये. तो एक जबाबदार मुलगा, भाऊ, जावई आहे. सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेमप्रकरणसुद्धा तो मार्गी लावून देतो.
थोडक्यात म्हणजे श्री, आदित्य, राया ही त्या सर्वशक्तिमान ईश्वराचीच तीन रूपं असल्यासारखी वाटतात. आपल्यासारखे सर्वसामान्य पुरुष त्यांच्यासमोर काय टिकणार?
चिनार जोशी