आपण अलगदपणे पकडलेलं फुलपाखरू सुटण्यासाठी धडपडतं. आपण त्याला सोडून देतो, पण जाता जाता ते बोटावर रंग ठेवून जातं. आभारासाठी शब्द न देता ते जवळचे रंग देऊन जातं, जगण्यासाठी सत्त्वाची आहुती देऊन जातं. मैत्रीच्या नात्यातही असेच एकमेकांना आवडणारे रंग दिले जातात. विचारांची देवाणघेवाण होते. एकाच गोष्टीवर दोघांचंही एकमत होतं आणि मैत्रीच्या धाग्याची वीण पक्की व्हायला लागते. जिवलग हा शब्द काळानुरूप दृढ व्हायला लागतो. नि:स्वार्थपणे केलेली मैत्री अतूट असते. सुखदु:खात एकमेकांना पाठिंबा देणारी मैत्री, चुकलो तर वेळीच योग्य मार्ग दाखवणारी मैत्री, सतत सावलीसारखी सोबत असणारी मैत्री.. मैत्रीचे असंख्य पदर अनुभवायला मिळाले. धागे कच्चे निघाले असे फार क्वचित घडले, पण वर्षांनुवर्षे मैत्री टिकवण्यासाठीच धडपडत राहिले.
गेल्या २७ वर्षांपासून टिकलेली माझी व प्रतिभाची मैत्री. चिमणीच्या दाताने आवळे, चिंचा, पेरू वाटून खाल्ले, त्या वयापासूनची मैत्री. शाळा संपवून कॉलेजचा उंबरठा ओलांडला तो एकदाच. गाणं, लिहिणं, नाटकं, एकांकिका स्पर्धा, युवा महोत्सव, क्रीडा स्पर्धा जोडीनं गाजवल्या. एकमेकांच्या गुणांना प्रोत्साहन देत आम्ही अनेक पारितोषिकं कॉलेजसाठी खेचून आणली. आमची जोडी कॉलेजमध्ये फार प्रसिद्ध झाली. शिक्षण पूर्ण झाले. वाटा वेगवेगळ्या झाल्या. लग्नं झाली. नोकऱ्या सुरू झाल्या. अनेक सुखदु:खाचे पहाड, चढउतार आम्ही गेल्या २७ वर्षांत शेअर केले. भेटी फार कमी झाल्या, पण नाती होती तशीच राहिली. प्रतिभा सध्या पाचोऱ्याला आहे.
शिक्षकी पेशात आल्यापासून अनेक प्रशिक्षणं, शासकीय कार्यक्रम, सूत्रसंचालनं, राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कार्यशाळांमधून अनेक ओळखी झाल्या. कवितांच्या चाली, समूहगीतं, एकांकिका, नाटिका, विविध कार्यक्रमांची सूत्रसंचालनं यासाठी बरीच शिक्षक मंडळी संपर्कात आली, पण मैत्रीचे धागे नाही जुळले. एक मैत्रीण लक्षात राहिली. २००७ च्या राज्यस्तरीय प्रशिक्षणात योगिता शर्मा अमरावतीहून पुण्यास आली होती. फार मस्त गट्टी जमली आमची. फक्त तीन दिवस एकत्र होतो आम्ही, पण गेल्या सात वर्षांपासून मैत्रीचे घट्ट धागे आम्ही विणले. या सात वर्षांत पुन्हा भेट झाली नाही, पण अनेक सुखदु:खाचे क्षण जगलो. घासातला घास वाटून खाल्ला. मला या मैत्रीवरून एक पटले की, मैत्री खूप दिवसांच्या सहवासावर नाही तर तुमच्या आंतरिक भावनांमुळे कमी दिवसाच्या सहवासातही फुलू शकते.
एक मैत्रीण तर मोबाइलच्या चुकीच्या नंबरमुळे जुळली. भारत वर्ल्ड कप जिंकला त्या दिवशी मी माझ्या सर्व मित्रपरिवारात हा आनंद साजरा केला. चुकीचा नंबर सेव्ह झाल्याने माझा अभिनंदनाचा संदेश मुंबईच्या नंदा जिचकार यांना मिळाला. चुकून झाले म्हणून माफी मागितली. ‘अहो, आपण भारतीय आहोत आणि एका भारतीयाने दुसऱ्या भारतीय माणसाला शुभेच्छा देणं हेच आपले मूल्य आहे,’ अशा भावना नंदा जिचकार व शरद जिचकार यांनी व्यक्त करून या मैत्रीला खतपाणी घातले. मागच्या वर्षी त्यांच्या मुलाच्या लग्नात आमची पहिली भेट झाली, पण त्याआधीच दोन घरं जोडली गेली. एकमेकांच्या नातेवाईकांचा परिचय झाला. मुंबईत असलेल्या आमच्या लेकी स्नेहल-सायलीलाही जिचकार कुटुंबाने मदत केली. मैत्रीत कोणताही स्वार्थ नसतो. सतत आनंदाची पेरणी करणारी माणसंच मैत्री टिकवतात. मैत्रीत भीतीचा लवलेश नसावा. मैत्रीत खोटेपणा असेल तर त्या मैत्रीची भीती वाटायला लागेल. जगासमोर यायची भीती वाटेल. पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीत असे घडायला लागते. बदनामीचे क्षण वाटय़ाला येतात. विचारांची देवाणघेवाण करताना अडसर निर्माण होतात.
इतक्यातच नववी-दहावीच्या समीक्षणासाठी रत्नागिरीला जायचे काम आले. गणेशगुळेच्या समुद्र किनाऱ्यावर ओशियानो पर्ल हॉटेलमध्ये आमच्या राहण्याची व्यवस्था होती. हॉटेलच्या मागेच अरबी समुद्र किनारा होता. मी, डॉ. शोभा गायकवाड, डॉ. मंजूषा सावरकर एकाच रूममध्ये होतो. दोघीही नवीनच माझ्यासाठी, पण काही क्षणात आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी झालो. तीन दिवसांच्या त्या कार्यशाळेत मराठी विषयातल्या सर्व बारकाव्यांवर चर्चा तर झालीच, पण एकमेकींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही निरखता आले. समुद्र किनाऱ्यावर आम्ही तिघींनी फार धमाल केली. त्या तीन दिवसांतले काही भावनिक प्रसंगही मनात कोरले गेले. पहिल्याच दिवशीची रात्र. मी आणि डॉ. शोभा गायकवाड दिवाणावर झोपलो. मंजूषाने खाली पथारी लावली. शोभाचा चटकन डोळा लागला. मी आणि मंजूषा आमची व्यावसायिक दुखणी सांगत रात्री बराच वेळ जाग्या होतो. गाढ झोपेच्या अधीन झालेल्या शोभाचे भेगाळलेले, कष्टाळलेले पाय पाहून मंजूषाने चटकन पायाजवळ बसून पाय चेपायला सुरुवात केली. तिच्या स्पर्शाने शोभा जागी झाली, पण तिच्या डोळ्यात खळकन पाणी आले. मी तिला माझ्या कुशीत घेतले. डोळे पुसले. आम्ही तिघीही मूकपणे अश्रू ढाळत होतो. शब्दच नव्हते. दुसऱ्या दिवशी रात्री आमचे सांस्कृतिक कार्यक्रम नारळी-पोफळीच्या बागिच्यात आयोजित केले होते. डॉ. मंजूषाने या कार्यक्रमाचे फार सुंदर असे सूत्रसंचालन केले. ‘भोगले जे दु:ख त्याला’, ‘जिवलगा राहिले रे’, ‘शाम से आँख मे कुछ नमी सी है’ ही गाणी मी गायले. प्रेक्षकांची मनमुराद दाद मिळाली. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे सर्व अधिकारीवर्ग, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विषयतज्ज्ञ यांनी कौतुक केले. रात्री रूमवर परतलो. डॉ. शोभा गायकवाडने मी चांगले गायल्याबद्दल माझी व उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल मंजूषाची दृष्ट काढली. आई गेल्यानंतर आणि माहेर सुटल्यानंतर कुणी दृष्ट काढली असेल तर ती शोभानेच. न विसरता येणारे क्षण. शब्दांच्या पलीकडले. मैत्रीची ही नाती जपून ठेवू या म्हणूनच आम्ही एकमेकींचा निरोप घेतला.
मी शाळेचा सांस्कृतिक विभाग गेल्या १७ वर्षांपासून सांभाळतेय, ठिकठिकाणी लिहिते म्हणून अनेक स्वार्थी मैत्रिणीही गोळा झाल्या. माझ्या व्यस्ततेचा गैरफायदा घेऊन अनेक महत्त्वाची कागदपत्रं, रजिस्टर्स, माझ्या अधिकारातल्या महत्त्वाच्या वस्तू लांबवणाऱ्या सहकारी मैत्रिणीही आयुष्यात आल्या. मैत्रीच्या नात्यालाच सुरुंग लावणारा तो चेहराही मला फार मनस्ताप देऊन गेला. पण त्या विकृत मैत्रिणींनीच जगाची खरी ओळख करून दिली. मी फार अलिप्त झाले. सर्वाना सोबत घेऊन काम करतानाच सतर्क झाले. नाती कोणाचीच तोडली नाहीत, पण त्यांचा बुरखा फाडण्याचे काम केले. आपोआपच त्या दुरावल्या ‘सुसंगती सदा घडो’ या उक्तीप्रमाणे चांगलीच माणसं जोडत गेले. गाणाऱ्यांचे वर्तुळ. लेखक साहित्यिकांचे वर्तुळ, सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्यांचे वर्तुळ, राजकारणातली पण मूल्य जोपासणाऱ्या लोकांचे वर्तुळ, माझ्या भोवती असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वर्तुळ, त्यांचे पालक अशी अनेक वर्तुळं यात जिवाभावाची माणसं खूप भेटत गेली. काही लक्षात राहण्यासारख्या मैत्रिणी मिळाल्या. अजूनही अनेक जण प्रवाहात येतील, पण प्रतिभा, विद्या, योगिता, मंजूषा फार कमी.
स्मिता गालफाडे