ट्रॉय.. तपकिरी रंगाचा, पडक्या कानांचा नि गलेलठ्ठ झुपकेदार शेपटीचा.. माझा डॉगी!
अगदी लांबून मला पाहताच, डौलदार शेपटी हलवत, दुडुदुडु माझ्यावर लाडाने झेप घेणारा माझा सर्वात लाडका सखा! पुढचे पाय माझ्या कमरेवर ठेवून ‘वाकायला शिक जरा..!’ असे म्हणत मला झुकायला सांगणारा माझा गोड मित्र! मी पुढे झुकल्यावर, त्याच्या छोटुकल्या जिभेने चाटून झालं की, मला सुचवणार..‘आता तुझी पाळी, गुड मॉर्निग करायची..!’ पण त्याला माहितीय की, मला काही उडय़ा मारणं जमायचं नाही, की शेपूट हलवून व्यक्त व्हायला येणार नाही.
मग, साहेब इकडेतिकडे बघणार.. दोन-चार बाकडी हुंगून एखादे पसंत करणार आणि मट्कन त्याच्यावर उडी मारून फतकल मारणार! मग वज्रासनात बसून कान, गळा खाजवण्यासाठी मला सोयीस्कर अशा मुद्रा करणार!
मसाज समारंभ झाला की, ‘पेंगतोय मी आता..’ असे सुचवत, अगदी चारही पाय फाकवून आणि पोटाचा घेर फैलावून स्वत: फतकल मारणार आणि मलाही थोडीशी जागा देणार.. लोकलच्या चौथ्या सीटएवढी!
मग स्वारी अगदी लाडात येऊन हनुवटी मांडीजवळ ठेवणार.. मग आपण कपाळावरून शेपटीपर्यंत हात फिरवायचा, त्याला थोपटायचं.. मध्येच एखादी टपकी मारायची!
हा सगळा तुम्हाला.. भोंगळपणा किंवा बालिशपणा वाटत असेल, तर तसं नाही.. एक अनोखा भावबंध गुंफण्याचे क्षण असतात ते..! मागच्या म्हणजे कालच्या पूर्ण दिवसाचा क्षीण घालवणारे व भविष्यातील आव्हानांना सामोरे जायला पुनरुज्जीवित करणारे..!
म्हटले तर.. भूतकाळ विसरायला लावणारे व भविष्याची चिंता न लावणारे..!
फक्त.. वर्तमानातले, प्रेमाने जगण्याचे.. जगायला शिकवणारे क्षण!.. असे लिहून-वाचून त्यांचे वर्णन नाही करता येणार, पण तरी..
ट्रॉयचं माझ्या बाजूला असणं आणि तेही कुठल्याही क्षणी असणं हेच किती ऊर्जादायी असतं. म्हणजे यश, आनंद इ.ना कवेत घ्यायला बरेच जण असतात; पण हताश, अपयशी क्षणांचं काय? त्यांना कुणीच वाली नसतो आणि असलाच तर, आपली कीव करणारा, दया दाखवणारा आपल्यालाच नको असतो.
अशा वेळी ट्रॉय, मी बोलताना खूप भावुक होतो; पण आई-बाबांसारखं तो मला विचारत नाही की, ‘बाई, काय झालं?’ जिवाभावाच्या मित्रासारखं तो अगदी विघ्नहर्त्यांसारखं मदत करू का? असंही विचारत नाही.. In short, irritate करत नाही.
तरी तो फक्त ‘असतो..’ माझं ‘हसू आणि आसू’ त्याच्या करुणादायी नजरेत साठवत.. मध्येच एखादा कटाक्ष अथांग सागराकडे टाकत.. एका शांत तपस्वीसारखा.. मला बिलगून ‘असतो’!.. अगदी कुठलाच ‘प्रश्न आडून आडूनही न विचारता की कुठचाही निर्थक आशावाद न दाखविता’.. ‘तो फक्त असतो..’ मध्येच त्याची झुपकेदार शेपूट माझ्या पाठीवर, वक्राकार भुरुभुरु फिरवत..! फक्त माझ्या‘सोबत’ असतो!
आता, थोडी उभारी मिळाल्यावर, माणसाची जात माझी.. घडय़ाळाकडे लक्ष जाताच, थोपटणारा हात आखडता घेणारी आणि जीवनगाडय़ाला जुंपण्यासाठी, अलविदा म्हणणारी!!
मग आमचा निरोप समारंभ सुरू.. तो आपला केविलवाण्या नजरेने, माझ्या पायात घोटाळणार.. भुंकून थोडीशी नापसंती दाखवत निषेध नोंदवणार..! पण तरी..
‘तू मला हवी आहेस, जशी आहेस तश्शी..
हसरी वा रडकी, जिंकलेली वा हरलेली..’
अगदी आहेस तश्शी.. असा त्याचा आश्वासक निरोप घेऊन.. मी माझेही रुटीन चालू करते. ‘जस्से आहे तस्से..’ ‘स्वीकारण्यासाठी..’ पुन्हा एकदा.. उद्या.. ट्रॉयला भेटण्यासाठी..! माझ्या नैराश्याचे मळभ त्याने चाटण्यासाठी नि निव्र्याज प्रेमाचे, आलिंगन देण्यासाठी..!!!
स्नेहा चुरी
आमचा ट्रॉय
ट्रॉय.. तपकिरी रंगाचा, पडक्या कानांचा नि गलेलठ्ठ झुपकेदार शेपटीचा.. माझा डॉगी! अगदी लांबून मला पाहताच, डौलदार शेपटी हलवत, दुडुदुडु माझ्यावर लाडाने झेप घेणारा माझा सर्वात...
First published on: 26-06-2015 at 01:17 IST
मराठीतील सर्व ब्लॉगर्स कट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bloggers katta