परवा सकाळी एकटीच फिरायला गेले होते. इतर वेळी असणारा कंपू त्या दिवशी काही कारणांनी आला नव्हता. एकटीच असल्यामुळे नेहमीसारख्या विविध विषयांवर चालणाऱ्या गप्पा सोबतीला नव्हत्या. आजूबाजूला रोज चालायला येणारे ओळखीचे चेहरे दिसत होते, काहींच्या चेहऱ्यांवर ओळख दिसली तर काही चेहरे आपल्याच नादात चालत होते. प्रत्येकाच्या मनात काही ना काही तरी विचार चालू असणार. रोज ठरलेली कामं, दिवसभराचं रुटीन मनात रुंजी घालत असणार. कोणाचं मन भूतकाळात रमलं असणार, तर कोणी भविष्याची काळजी करत असणार असं वाटून मी जरा एकादोघांकडे निरखून पाहिलं, पण छे..! मनाची खळबळ चेहऱ्यावर दिसत नव्हती. मनातील ही खळबळ लपवण्याची कला देवानेच आम्हाला जन्मत: दिली आहे का? कसलेल्या नटासारखं मन नावाच्या अजब रसायनामुळे तयार होणारे विचार, आठवणी आम्ही चेहऱ्यावर दिसू देत नाही.
आता माझंच बघा ना.. चालता चालता उडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहता पाहता मन भूतकाळात रमून गेलं. भारद्वाज पक्ष्याची जोडी लहानपणी दिसली की ती एकमेकांना दाखवायची चढाओढ आठवली. भारद्वाजची जोडी दिसली की काही तरी चांगली खबर येते किंवा गोड खायला मिळतं या समजुतीवर दृढ विश्वास होता. बुद्धीच्या तराजूत तोलण्याची तेव्हा गरज भासत नसे. एक साळुंकी दिसली तर वाईट बातमी येते, दोन दिसल्या की पत्र.. असं शाळेत जाता-जाता मैत्रिणींबरोबर शेअर केलं जायचं. काल-परवा घडल्यासारख्या या घटना मनात घर करून राहिल्या.
फिरता फिरता दिसणाऱ्या वेगवेगळ्या वृक्षवल्लींबरोबर किती तरी आठवणी जोडल्या आहेत याची जाणीव झाली आणि चुकार मनाने परत एकदा भूतकाळात उडी घेतली. एका घरात डोकावणारा लाल गावठी गुलाब नखशिखान्त फुलला होता, आमच्या घरी परसात गावठी गुलाबी गुलाबाचं चांगलं पुरुषभर उंचीचं झाड होतं. त्याला बहर आला की ते झाड पूर्णपणे गुलाबी व्हायचं. फोटो काढणं तेव्हा एवढं प्रचलित नव्हतं नाही तर मनातलं चित्र आज कागदावर परत पाहता आलं असतं.
मोगरा, जाई, जुई, प्राजक्त अशा वेगवेगळ्या सुवासिक फुलांच्या आठवणी सकाळ सुगंधित करून गेल्या. सकाळी सकाळी घरासमोर प्राजक्ताच्या फुलांचा पडलेला सडा आणि त्यावर पाय पडू नये म्हणून अलगद पाय टाकणारी मी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली, मोगऱ्याच्या फुलांनी गच्च भरलेलं झाड आठवलं आणि मन सुगंधित करून गेलं. आजी त्या फुलांचे देवाला हार करायची आणि आमच्यासाठी गजरे. फुलांनी सुवासिक झालेला देव्हारा मनात घर करून राहिला आहे. आमच्याकडे एक खूप जुनं चाफ्याचं झाड होतं, त्याला चक्क पारंब्या फुटल्या होत्या. त्याच्या पारंब्या अशा किती पक्क्या असणार.. पण त्या पारंब्यावर मी आणि माझा भाऊ झुलायचो. शेवटी एका दिवस त्या पारंब्यांनी राम म्हटलं आणि आमचा पाश्र्वभाग चांगला शेकून निघाला. आई रागवेल म्हणून ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ धोरण स्वीकारलं, पण सवंगडय़ांनी धोका दिला आणि ओरडा खाऊन कान तृप्त झाले.
आता कधीही, कुठंही चाफ्याचं झाड दिसलं की हा प्रसंग तसाच डोळ्यासमोर उभा राहतो. मन एका अजब रसायन आहे, क्षणात कुठे कुठे फिरून येईल काही सांगता येत नाही. वर्षांनुवर्षांच्या आठवणी कुठल्या फोल्डरमध्ये लपल्या असतात कुणास ठाऊक.. एक हलकासा स्पर्श त्यांना होताच अख्खा चित्रपट डोळ्यांसमोर सुरू होतो. फिरताफिरता रस्त्यावर दिसणारी भटकी कुत्री पाहिली आणि डोळ्यासमोर आला ‘जॉली’. त्याच्याविषयी चार-पाच ओळी लिहिणं शक्यच नाही. १३ वर्षांची साथ-सोबत एक आगळंवेगळं मूक नातं.. जे संपल्यावर परत कुणाबरोबर जोडायची हिंमत झाली नाही.
माणसाचं आयुष्य खरंच किती रंगीत असतं. आठवणींना पण रंग असतो. मनाच्या खोल गाभाऱ्यात या दडून बसतात आणि वर्तमानाच्या काठावर यायला एखादा सुवास, प्रसंग, निसर्ग, रंग त्यांना पुरेसा असतो. आता सुवासाचंच बघा ना. उग्र अत्तराचा वास आला की लग्न, नंतर नवऱ्याबरोबर पाहिलेले दोहा-कतारमधलं मुस्लीम मार्केट‘सुख’ डोळ्यासमोर येतं. आजूबाजूने जाणाऱ्या बुरखेवाल्या बायकांच्या अंगाला उग्र अत्तराचा वास यायचा.
आजही दिवाळीमध्ये रांगोळीत रंग भरताना लहानपणीच्या सडा घातलेल्या अंगणातील रांगोळ्या डोळ्यासमोर फेर घालतात. जसं आयुष्य पुढे पुढे जातं तसा भूतकाळ मोठमोठा होत जातो. आयुष्यात प्रसंगांची भर वाढत जाते. त्यामुळे नकळत मनाच्या भटकंतीच्या सीमा वाढत जातात. सूर्यनारायण बराच वर आल्यामुळे पावलं नकळत घराकडे वळली. मनाविषयी लिहावं तितकं थोडंच आहे. कसं, कधी रुसेल, फुलेल, हसेल काही सांगता येत नाही. अनुभवांनी मन शहाणं होतं, पण याचा नाही भरवसा हेच खरं. मनाची ही अजब सफर न संपणारी आहे. बहिणाबाई म्हणतात-
‘मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येते पिकावर.’
आणि याची प्रचीती आपल्याला येत राहणार हेच खरं.
हेमांगी वेलणकर response.lokprabha@expressindia.com

Story img Loader