ती एक स्वप्नाळू मुलगी होती. तिला पाऊस खूप आवडायचा. आभाळ भरून आलं की तिला खूप आनंद व्हायचा. मग ती आभाळाकडे बघत टाळ्या वाजवायची. तिच्यासाठी पाऊस म्हणजे जिवाभावाचा सखा!!!
पावसाळा हा तिचा आवडता ऋतू ती एखाद्या सणासारखा साजरा करायची. रोज उंबऱ्यावर बसून पावसाची वाट पाहायची. पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्या की भान हरपून पावसात मनसोक्त भिजायची. तिच्या बालपणापासून तिने पावसाच्या सोबतीने अनेक मोहक क्षण अनुभवले होते. ते सारे अनुभव तिने हृदयाच्या कप्प्यात जिवापाड जपले होते.
गावचा पाऊस म्हणजे निसर्गाची अनोखी किमया होती. इथे शहरात आल्यापासून आता फक्त तिला आठवणीतल्या पावसाची सोबत होती. पण एके दिवशी तिने ठरवलं, पाऊस शहरातला काय, गावाकडचा काय, एकच! फक्त ठिकाणं वेगवेगळी!
आपण इथल्या पावसातही मनसोक्त मजा करायची. आणि आभाळ भरून आलं. तिला उत्सुकता होती की शहरातले लोक पावसाचं स्वागत कसं करतात याची. पण तिची घोर निराशा झाली. पाऊस आल्याचं कुणाच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. सगळे नेहमीच्या रहाटगाडग्यात बिझी होते. काही जणांना तिने समुद्रावर जाताना पाहिलं, तेही छत्री घेऊन.
तीही छत्री घेऊन बाहेर पडली. खरंतर तिला छत्री न घेता भिजत जायचं होतं. पण काय करणार! असं एकटंच वेडय़ासारखं भिजत कसं जाणार? लोग क्या कहेंगे? हा विचार डोक्यात येऊन ती छत्री घेऊन बाहेर पडली.
तिने छत्री घेतली होती खरी, पण ती छत्री मधे मधे तिरकी करून कधी कधी थोडय़ा वेळासाठी बाजूला करत ती पावसाच्या सरींचा स्पर्श अनुभवत होती. किनाऱ्यावर पोहोचली तेव्हा आनंदाच्या कारंजाने तिच्या मनात उसळी घेतली. किनारा किती आकर्षक दिसत होता. सागरातून उसळणारी प्रत्येक लाट काहीतरी निरोप किनाऱ्याला सांगून परतत होती.
मरिन ड्राइव्हच्या फुटपाथवर छत्री घेऊन रिमझिम सरींत एकटक समुद्राकडे पाहताना ती भान हरपून गेली. मनोमन म्हणत होती.. ‘‘या वर्षीच्या पावसात मी एकटीच भिजते आहे.. ठीक आहे.. पण पुढच्या वर्षीच्या पावसात माझ्यासोबत भिजायला तोही असेल. मी एकटी नसेन.. मी एकटी नसेन.. पाऊस पडायला लागला की मी लहान मूल होऊन जाते आणि वाटत राहतं माझ्यासोबत कुणीतरी असायला हवं.. जिवाभावाचं.. एकाच छत्रीतून त्याच्यासोबत चालण्याचा क्षण माझ्या आयुष्यात कधी येईल का?’’
ती एकटी चिंब भिजलेला समुद्रकिनारा पाहताना कुणाचीतरी सोबत मागत होती. गावातून शहरात आल्यावर ती खूप एकटी पडली होती. हॉस्टेलमधल्या मुलींशी तिची फारशी मैत्री झाली नव्हती. तिच्या छत्रीवर, फुटपाथवर, समुद्रकिनाऱ्यावर पाऊस बेधुंद बरसत होता. तसाच तिच्या मनाच्या आभाळतल्या पावसानेही आत दाटी केली होती. फक्त तिच्या पापण्याआडून बरसायचा बाकी होता. आणि पुढे घडणाऱ्या भयानक प्रसंगाची तिने कल्पनाच केली नव्हती.
पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. म्हणून चार बाइकस्वार तरुण फूटपाथवरून रोरावत चालले होते. त्यातल्या एकाने तिला जोरात धडक दिली.
पाऊस आल्यामुळे आनंदित झालेली ती क्षणार्धात फूटपाथवर कोसळली. कुणीच तिच्या मदतीला धावलं नाही. जो तो दुर्लक्ष करत, फक्त हळहळ व्यक्त करत पुढे निघून जात होता. अखेर त्या गर्दीतून एक तरुण मुलगा पुढे आला. त्याने तिला उचललं. ती बेशुद्ध अवस्थेत होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत मेंदूतून खूप रक्तस्राव झाला होता. दोन दिवसांनी ती शुद्धीवर आली. तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं.
थोडय़ा वेळाने डॉक्टर आले. तिने डॉक्टरांना विचारलं, .. मी इथे कशी?
डॉक्टरांनी तिला सांगितलं.. ‘‘शांत व्हा.. तुमचा अपघात झाला होता. तो मुलगा तुम्हाला इथे घेऊन आला.’’ डॉक्टरांनी पॅसेजमध्ये बसलेल्या मुलाकडे हात दाखवला.
तो मुलगा उठून तिच्याजवळ आला. तिने विचारलं, .. ‘तुम्ही कोण?’
तो म्हणाला, ‘‘ते जाऊ देत.. आधी मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असतं?
तुम्ही कुठे राहता?
तुमचे नातेवाईक.. तुमचं नाव?
तुम्हाला इथे आणलं तेव्हा तुमची ओळख पटावी असं तुमच्याकडे काहीच नव्हतं. फूटपाथवर तुमच्या बाजूला फक्त एक छत्री पडली होती.’’
तिने मेंदूवर जोर दिला. आठवायचा प्रयत्न केला. पण तिला काहीच आठवेना.
डॉक्टर म्हणाले, .. ‘‘काळजी करू नका. आठवेल तुम्हाला हळूहळू.. ताण घेऊ नका.. थोडा वेळ शांत पडून राहा..’’
ती स्वप्नाळू मुलगी आपली ओळख कायमची विसरून गेली होती. घरच्यांशी संपर्क साधण्याचं काहीच साधन हाती उरलं नव्हतं. त्याने मात्र तिला अंतर दिलं नाही. तिला पूर्ण बरं वाटल्यावर तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. वर्षभराच्या सहवासाने दोघे मनाने खूप जवळ आले होते. ती आपली ओळख त्याच्या डोळ्यात शोधत होती. आपलं सारं जग ती त्याच्याच डोळ्यात पाहत होती. दोघांनी लग्न केलं.
आता ते आठवडय़ातून दोनदा तरी मरिन ड्राइव्हला येतात. आणि पावसात भिजायला तर एकाच छत्रीतून आवर्जून ती दोघं मरिन ड्राइव्हला येतात. ती लहान मूल होऊन त्याच्यासोबत पाऊससरींचा स्पर्श मनसोक्त अनुभवते. त्याला वाटतं, तिला इथे आणलं तर काहीतरी आठवेल. तिच्या कुणीतरी ओळखीचं भेटेल. पण पुढच्याच क्षणी तो प्रचंड घाबरूनही जातो. ‘‘तिच्या ओळखीचं कुणी भेटलं नी तिला माझ्यापासून कायमचं दूर घेऊन गेलं तर..’’ कारण आता तिच्याशिवाय आपल्या आयुष्याची तो कल्पनाच करू शकत नाही..
भक्ती परब response.lokprabha@expressindia.com