काल अगदी दिवसभर कमालीचे उकडत होते. अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय ते चांगलंच कळलं. उकाडय़ाने जीव अगदी हैराण होऊन गेला होता. रात्री कूलर असूनसुद्धा नसल्यासारखाच वाटत होता. पण दिवसभराच्या थकव्याने झोप मात्र केव्हा लागली कळलेही नाही. नेहमीच्या वेळेला पहाटे जाग आली. सगळं आटोपून रोजच्यासारखे फिरायला निघाले तेव्हा कालच्या जीवघेण्या उकाडय़ाचा मागमूसही नव्हता. आभाळ भरून आलेले अन् अगदी आल्हाददायक वारा सुटलेला. नक्कीच आसपास कुठे तरी पाऊस पडलेला असावा. काय प्रसन्न वातावरण होते. रेशमी झुळझुळत्या वाऱ्याचा स्पर्श गुदगुल्या करत होता. वाटलं नेहमीसारखंच असं वातावरण राहिलं तर काय बहार येईल. सूर्य वर येऊच नये. अशीच आल्हाददायक पहाट नेहमीसाठीच राहावी. किती छान होईल न. आपल्याच विचाराचं हसू आलं. नेहमीच जर असं वातावरण राहिलं तर मग त्याचे अप्रूप तरी काय राहणार म्हणा. आज ही झुळूक इतकी हवीहवीशी वाटतेय, कारण काळ अंगाची काहिली होणारा उकाडा अनुभवला. खरोखरच निसर्ग किती यथार्थपणे जगण्याचा मंत्र शिकवतो ना! सुख हवेहवेसे वाटतेच प्रत्येकाला. पण काहीही न करता नुसतेच सुख मिळत गेले तर त्याची मौज ती काय राहणार? नुसते अळणी होईल आयुष्य. सुखाची खरी चव अनुभवायची असेल तर थोडे चटके सोसावे लागतील, थोडा त्रास सहन करावा लागेल, थोडा मनस्ताप सहन करावा लागेल. त्यानंतर येणारी सुखाची झुळूक मग कशी मनाला गारवा देऊन जाईल न. अन् तेव्हाच त्याची खरी किंमत कळेल. कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकरांनी हे सगळं काय नेमक्या शब्दात व्यक्त केलंय नाही?
एक धागा सुखाचा,
शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र माणसा
तुझिया आयुष्याचे
शंभर दु:खाच्या धागे माणूस त्या एका सुखाच्या धाग्यासाठीच तर सहन करत असतो न? आणि हा एक सुखाचा धागा प्रत्येकाला नक्की कधी ना कधी गवसतोच. कधी तो शाळेत शिक्षकांनी दिलेली शाबासकीची थाप असतो, कधी पहिल्यांदा सायकल चालवण्याचा आनंद असतो तर कधी बक्षीस मिळवल्यावर आईबाबांच्या डोळ्यांतले कौतुक असतो. कधी तो प्रियकर-प्रेयसीच्या डोळ्यांतली पसंतीची दाद असतो तर कधी सहचरांनी दमलास-दमलीस? म्हणून प्रेमानं केलेली विचारपूस असतो. कधी तो आपल्या चिमुकल्याचं निव्र्याज हसू असतो तर कधी त्याचा कोमल, रेशमी स्पर्श. कधी कामाचा रामरगाडा आटोपल्यावर थोडेसे टेकल्यावर मुलांनी आपणहून हातात दिलेला पाण्याचा ग्लास असतो तर कधी त्यांच्या यशाने कृतकृत्य होण्याचा क्षण असतो. आणि असा हा एक धागाच तर तुम्हा-आम्हाला जगण्याचं बळ देत असतो. जगणं शिकवत असतो. जगणं सुंदर करत असतो. अन् मग मंगेश पाडगावकरांच्या ओळी सहजच ओठांवर येतात-
या जन्मावर, या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
शतदा प्रेम करावे