जंगल जागते कधी आठवणींचे वादळ येते, सोसाटय़ाचे वारे वाहू लागतात. जंगली प्राणी वाघ-सिंहाच्या डरकाळ्या व गर्जना यांनी जंगल हादरून जाते, वादळात सापडलेले वृक्ष! त्यावरील पक्ष्यांचे थवे इकडून तिकडे उडत राहणारे, तर जंगलातून वाहणाऱ्या नदीला महापूर आठवणीचा महापूर, या महापुरात सापडल्यावर काय अवस्था मनाची? भोवऱ्यात सापडलेले मन आत आत जात राहतं, घन अंधार भोवती दाटुनी येता; आठवणींची भुतेही जमता, दु:ख वेदनेचे ते गीत गाता; अंतर्मन हे ढवळुनी जाते; जगण्यास्तव कांही न अुरते आठवणी! व्यक्तीच्या, प्रसंगाच्या! सुखदुखाच्या, बालपणातील; बागडणाऱ्या चंचळ हरिणासारख्या; रंगबिरंगी फुलाफुलांवर भटकणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरासारख्या आठवणी तारुण्यातील; सुगंधी फुलांच्या वर्षांवासारख्या आठवणी! मोहून टाकणारा फुलांचा वर्षांव! जणू वसंतातील सुगंधी बहर! कोकिळेची मधुर तान! भरून आलेल्या मेघांना पाहून मनमोहक रंगीबेरंगी पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरासारख्या आठवणी; तर मेघांवर रेलून रेखलेले सप्तरंगी इंद्रधनूसारख्या आठवणी! आठवणी प्रसंगाच्या आठवणी, आठवणी व्यक्तीच्या. ऐन उन्हाळ्यात ज्वालाफुले आकाशातून बरसत असतानाही; स्वत:च प्रतिकूल परिस्थितीतही फुलून येणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी आठवणी! जिद्द जागवणाऱ्या आठवणी! तर जीवनाला दिशा दाखवणाऱ्या; दीपस्तंभासारख्या व्यक्तींच्या आठवणी. तर कधी बेसावध असताना पायाजवळून सळसळत जाणाऱ्या धोकादायक सापासारख्या लोकांच्या आठवणी! ‘ब्रुटस’च्या आठवणी! शाळा-कॉलेजातील स्पर्धा; त्यातून मिळालेले यश-कौतुक, ज्यामुळे आत्मविश्वास जागवला जातो त्या आठवणी! मित्र, मत्रिणींच्या आठवणी! काही नाते नसतानाही जिवाच्या जिवलग बनणाऱ्या व्यक्तीच्या आठवणी! बालपण, तारुण्य, ओसरलेल्या तारुण्यातील वेगवेगळ्या मनोहर, प्रेरणादायी, जीवनदायी तर कधी बरबाद करणाऱ्या पावसाच्या आठवणी; त्या मनातील पावसाच्या आठवणीत स्वत:च भिजणारा पाऊस!
अंधारुनी येता
दिवेलागण अुजळुनी
येते कुणाची आठवण?
घेरुनी घेता मज एकाकीपण;
मन आठवते,
अजुनी कुणाला पण?
अशा अविस्मरणीय आठवणी; मनाला ओरबाडणाऱ्या आठवणी! भरून आलेली जखम पुन्हा ओली वेदनादायी करणाऱ्या आठवणी! पुसलेले डोळे पुन्हा पुन्हा ओसंडून वाहायला लावणाऱ्या आठवणी! जंगलात लागलेल्या वणव्यासारख्या दाहक आठवणी! प्रिय व्यक्तीचे; सरणावर सरत चाललेले शरीर, त्याची होत असलेली राख; स्वत:चे फाटत जाणारे काळीज; जीवनात निर्माण झालेली भयाण पोकळी कधीही भरून न येणारी! कुठे सोडणार या आठवणी, शेवटच्या श्वासापर्यंत सुटणार नाहीत; पाठलाग करणाऱ्या शिकाऱ्यासारख्या पाठलाग करतच राहतात.
आठवणींच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी प्रचंड मानसिक शक्ती लागते. कुठून मिळणार ही शक्ती?
ह्या आठवणीच्या जंगलात जशा दाहक, भीतीदायक आठवणी तशा जीवनाला जीवन देणाऱ्या झुळझुळत्या झऱ्यासारख्याही आठवणी जागतात. दाट सावली देणाऱ्या वृक्षांच्याही आठवणी असतात! उत्साहवर्धक आठवणी जीवनाला तरुण बनवतात.
आठवणीचे मोहोळ जसे मधुर मधाचे थेंब देते तसे माशांचे डंखही देते. ज्यांनी छाया दिली; उत्साह पेरला, प्रेरणा दिली राखेतूनही पुन्हा जिवंत होणाऱ्या फिनिक्सची शक्ती मनात पेरली, कोमेजून जाणाऱ्या मनाला निराशेतून वर काढले, जीवनात जिद्दीनेच कसे जगायचे; अपयशांनी खचायचे नाही हे शिकवले, मनात पेरले. त्या प्रेरणादायी व्यक्तींच्या; दीपस्तंभासारख्या व्यक्तींच्या, आठवणींच्या सहवासात राहणे; हा उदास भयानक आठवणींवर विजय मिळवण्याचा मार्ग मिळू शकतो. सतत कार्यरत राहणे, जीवनातील मधुर आठवणींच्या सहवासात राहणे हा जीवनाला निराश करणाऱ्या आठवणींचा पाठलाग चुकवण्याचा मार्ग मिळवता येतो. कारण रिकामे मन सतानाचे घर बनते. चांगलंच आठवा, चांगलंच करण्यात व्यस्त राहा.
अॅड. गीतांजली सुकळकर response.lokprabha@expressindia.com