lp22नेहमीचीच सात-बावीसची लोकल. जमलेला टारगट ग्रुप. चर्चगेट कधी यायचं कळायचंही नाही.
नालासोपारा रिटर्न होणारे काका भाई सगळ्यांना सीट आणायचे. अख्खा ग्रुप त्यांना भाईच म्हणायचा.
नालासोपारा व वसईला काही ‘लटकते मजनू’ चढायचे. तेव्हा खिडक्यांना जाळ्या नव्हत्या. प्लास्टिकच्या पिशवीतले किंवा लहानशा बॅगमध्ये लपेटलेले जेवणाचे डबे आत यायचे. खिडकी नि लोकलचा वरच्या पन्हळीचा काठ पकडून जिवावर उदार होऊन रोज प्रवास करणाऱ्या या मंडळींचा रागही यायचा नि धाडसाचं नवलही वाटायचं. भाईची कॉर्नर सीट ठरलेली. ते काळजीपूर्वक सगळ्यांचे डबे घ्यायचे. भाईंदरला काही लटकते मजनू उतरायचे. काही बोरिवलीला. सगळे डबे परत बाहेर जायचे. गर्दीत एखादा चेहरा दिसायचा. नंतरची दोन-चार स्टेशन्स फक्त त्यांची घरची परिस्थिती दाखवणाऱ्या चपला तेवढय़ा खिडकीवर दिसायच्या. मनातं एवढंच असायचं.
एके दिवशी एक डबा शिल्लक राहिला.
अरे हा डबा कुणाचा राहिला?
भाईने ग्रुपला कळवलं.
‘‘त्याचा आज उपवास असेल.’’
‘‘भाई उघडून बघ. नाश्ता करूया’’
अजून दोन-चार टवाळ सल्ले आले.
भाई सहृदय माणूस.. डबा राहिला खरा, पण जीव लागेना.. दुपारी ऑफिसमध्ये लंच संपल्यावर पिशवी उघडली. एक प्लास्टिक डबा, पास, एक मुलीचा फोटो, एक रेल्वे आय कार्ड नाव आणि पत्ता लिहिलेलं, थोडेसे पैसे. दोन किल्ल्या..
कुठे गेला असेल? काय झालं असेल? असंख्य शंका.
भाईने चक्क एक तास लवकर ऑफिस सोडलं.
वसई ईस्टचा पत्ता शोधत निघाले..
पत्ता मिळाला. घर कसलं, झोपडीच. एक घोळका बाहेर उभा होता. रेल्वे आयकार्डवरचं नाव भाईने विचारलं.
हो हो.. इथेच.. पण तुम्हाला उशीर झाला, उचलला दोन तासांपूर्वी. नंतर बॉडी जास्ती ठेवण्यासारखी नव्हती.
भाई अवाक् झाले. हातातील बॅग गळून पडली.
त्यांचा तो अनोळखी मित्र लोकलमधून पडून देवाघरी गेला होता.
त्यानंतर भाईने सात-बावीसच्या लोकलची कॉर्नर सीट कायमची सोडली.
बर्नाड लोपिस – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader