आपणही काहीतरी लिहावे अशी ऊर्मी अनेकदा येते, पण या ऊर्मीने कधी कधी माझी चांगलीच फजिती केल्यामुळे बेत पुढे ढकलला जात असे. हेही खरे की, अशाच फजितीने माझ्यातला लेखक घडविला. एखादे वेळी माझी फजिती झाली तर लोकांपेक्षा मलाच जास्त आनंद होतो, कारण त्यामुळे पुढे काही चांगले घडणार याची मला खात्री असते.
वयाच्या सातव्या वर्षांपासून मला वाचनाची आवड निर्माण झाली. त्याचे सर्व श्रेय ‘रविवार लोकसत्ता’च्या बालविभाग सदराला आहे. त्यातील एक कविता अजूनही पाठ आहे. ती माझ्या मुलांना आणि आता त्यांच्या मुलांनाही कुशीत घेऊन गात झोपवतो.
शाळेत असताना एके वर्षी गॅदिरगमध्ये स्वलिखित एकांकिका सादर करण्याची स्पर्धा जाहीर झाली. धाडस करून ‘फितुरी’ नावाची एकांकिका लिहिली. एका वृद्ध दाम्पत्याचा एकुलता एक तरुण पराक्रमी सुपुत्र कोणाच्या तरी फितूर कारवायांमुळे शहीद होतो. त्यावर आधारित हे नाटक होते. त्या वेळी भारत-चीन युद्ध सुरू होते. नाटक विनोदी नव्हते, त्यामुळे वर्गशिक्षकांनी नाराजीने परवानगी दिली.
मी वर्गशिक्षकांना मूळ संहिता दाखवली होती, तेव्हा नाटकाचा विषय चांगला असला तरी नाटक फार गंभीर वाटते म्हणून त्यांनी ते परत केले होते. त्यामुळे ते थोडे हलके-फुलके करण्यासाठी नाटकात राजू भजेवाला हे पात्र वाढवले. हा मुलगा भजे तळताना हिंदी सिनेमातल्या लोकप्रिय गाण्यावर आधारित स्वत: तयार केलेली विडंबन गाणी गात असे. त्यापैकी एक गाणे राज कपूर यांच्या चित्रपटातील गीताचे विडंबन होते. त्या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी अशा-
मेरा नाम राजू,
भजे का है दुकान।
मेरा काम है नित्य भजे पकाना,
और दुसरोंको खिलाना
दुसरोंने नहीं खाये तो,
आपणही खाना।
नाटक सादर करताना त्या कलाकाराने ‘आपणही खाना’ म्हणताना असे गमतीशीर हावभाव केले की, सगळे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. एवढय़ा अनपेक्षित प्रतिसादामुळे गडबडलेल्या त्या कलाकाराच्या कपडय़ावर मात्र कढईतले तेल सांडले. नाटकभर तेलकट कपडय़ात काम करणारा तो कलाकार मीच स्वत: होतो. हे नाटक मी लिहिल्याचे कळल्यावर शाळेतील मित्र मला गमतीने ‘तेलकट लेखक’ म्हणू लागले. पण नाटकाला प्रथम पुरस्कार व मला उत्कृष्ट लेखक पुरस्कार मिळाल्याने शाळेत भाव मात्र वाढला.
पुढे इंजिनीअरिंग कॉलेजमध्येही वाचनाची आवड जोपासली. तेथील ग्रंथालयातील बहुतेक सर्व मराठी पुस्तके वाचून काढली. पण इच्छा असूनही लिखाण करणे जमले नाही. मार्ग सापडत नव्हता. एकदा सहज पेपर वाचत असताना जुन्या मित्राचे नाव दिसले. त्याने ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ सदरात पत्र लिहिले होते. मी विचार केला आपणही एखादे पत्र लिहून प्रसिद्धीस सुरुवात करावी. विद्यार्थ्यांसंबंधी एक समस्या डोक्यात घोळत होतीच. त्याच विषयावर पत्र लिहून लगेच पोस्ट केले. दररोज तो पेपर पाहणे सुरू झाले. बरेच दिवस झाले तरी छापलेले पत्र दिसले नाही. निराश होऊन नाद सोडून दिला.
एके दिवशी अचानक वसतिगृहातील रूम पार्टनरने कागदात गरम भजी आणली. सर्वानी भज्यांचा आस्वाद घेतला. तो तेलकट कागद मी चोळामोळा करून फेकणार इतक्यात अचानक त्या कागदावर तेलकट अक्षरात माझे नाव दिसले. अहो आश्चर्यम्! माझे पत्र पूर्वीच छापून आले होते. त्या रद्दी तेलकट कागदावरचे नाव बघून आनंद गगनात मावेना. नंतर कित्येक दिवस मी त्या कागदाचा तेलकटपणा घालवण्याचे प्रयत्न करीत होतो. पुन्हा एकदा ‘तेलकट लेखक’ पदवी मिळाली.
अशा प्रकारे माझे पहिले प्रकाशित लिखाण आणि पहिला नाटय़प्रयोग भजेदार कम मजेदार झाले.
पुढे माझे अनेक लेख, पुस्तके प्रसिद्ध झाली, परंतु अजूनही कुठे खमंग भजे दिसले की माझ्या पोटात गोळा उठतो, तो फजितीच्या भीतीने की तेलकट पदार्थ न खाण्याच्या बंधनामुळे हे कळत नाही. तुम्हाला कळले तर जरूर लिहून कळवा. मात्र कागद आणि भजे वेगवेगळे पाठवायला विसरू नका बरं का!

Story img Loader