मी मुलगी असणं अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक असतं तरी ते सुरू होतं कौतुकभरल्या टोमण्यांनी, ‘दुसरी पण मुलगीच?’ आश्चर्य म्हणजे हे उद्गार असतात मुलगी असलेल्या मनांचेच!

मी मुलगी असणं वाढतं भातुकली आणि बाहुल्यांच्या खेळांनी! मी मुलगी असणं जपलं जातं हळू बोलण्याने, मंद हसण्याने आणि कामाचं वळण लागल्याने! सुदैवाने मी मुलगी असणं आता आड येत नाही माझ्या पदव्यांच्या, बक्षिसांच्या पण जाणवू दिलं जातं सहज केलेल्या प्रशंसेने ‘मुली असून छान शिकवलंत हो!’
मी मुलगी असणं दुखावतं माझ्या आई-वडिलांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीने, मुलगा असलेल्यांपेक्षा कमी लेखण्यामुळे! मी मुलगी असणं कठोरपणे जाणवतं बसच्या घुसमटत्या गर्दीत चढताना, लोकलच्या जाळय़ातून बघणाऱ्या नजरा टाळताना आणि उशिरा घरी परतताना इतरांच्या काळजीयुक्त मानभावी कॉमेंट्स ऐकताना! मी मुलगी असणं संतापजनक बनतं बॉसच्या मधाळ बोलांनी आणि डिक्टेशन देताना विचार करण्याच्या आविर्भावात मला न्याहाळताना!
मी मुलगी असणं असं वाटतं अपेक्षा वाचताना, ‘गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष, मनमिळाऊ, नोकरी असणारी!’ मी मुलगी असणं नडतं हुंडय़ाच्या पैशासाठी! मी मुलगी असणं आनंदतं लग्नातल्या मंगळसूत्र, कुंकू, बांगडय़ांनी! मी मुलगी असणं लाजतं देवादिकांच्या साक्षीने त्याच्या मागून चालताना! मी मुलगी असणं सांभाळतं उंबऱ्यातले माप ओलांडताना! मी मुलगी असणं कसरत ठरते सासू-सासऱ्यांची मर्जी राखताना! मी मुलगी असणं कसरत ठरते सासू-सासऱ्यांची मर्जी राखताना! मी मुलगी असणं हसत स्वीकारते आपल्या कुटुंबासाठी, कामावरून दमून आल्यावर, सगळे मजेत टी.व्ही. बघताना एकटीने स्वयंपाकघरात राबताना! मी मुलगी असणं कठीण असतं पत्नी, सून, जाऊ, वहिनी नात्यांना सांभाळताना अन् रीती-रिवाज, ‘संस्कृती’ पाळताना!
मग एक गोड बातमी येते आणि मी मुलगी असणं सुखावतं, फुलारतं, आतून उमलतं! मग मी मुलगी असणं बनतो कौतुकाचा विषय!
कुशीतलं बाळ माझ्याकडे पाहून खुद्कन हसतं. मी मुलगी असणं पुन्हा सुरू होतं, कारण ‘तिचं’ मुलगी असणं अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक असतं तरी ते सुरू होतं, ‘मुलगी वाटतं?’ या निर्थक प्रश्नाने!!!
संध्या विनायक रानडे

Story img Loader