अमेरिकेसारख्या देशाला स्नो फॉल अर्थात हिमवर्षांवाचं काही अप्रूप नाही. नव्हे, तो तर त्या देशाच्या पाचवीलाच पुजलेला आहे. पण तोच स्नो फॉल थोडय़ा चुकीच्या काळात अवतरला तर कसे कसे रंग दाखवतो याचा आम्ही पण असाच एक मजेदार अनुभव घेतला.

२०११ सालच्या ऑक्टोबर महिन्यात आम्ही अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्याच्या मँचेस्टर या गावी थोरल्या मुलाकडे होतो. सून तीन महिन्यांची बाळंतीण होती. ऑक्टोबरच्या एका रविवारी नमितच्या एका मित्राकडे गेट टूगेदर ठरलं होतं. त्याचं घर बरंच दूर होतं. थंडीचं इतक्या लहान बाळाला घेऊन इतक्या दूर जायचं का याची चर्चा सुरू होती. ‘‘हवामानाचा अंदाज बघून ठरवूया,’’ असं म्हणून मुलाने लॅपटॉप सुरू केला आणि काय, त्या दिवशी ‘हेवी स्नो फॉल’ सांगितला होता. मग मित्रांकडे फोनाफोनी झाली आणि त्या दिवशीची पार्टीच रद्द झाली.
असं असतं अमेरिकेत! लोकांचं रोजचं आयुष्य, त्यांचे सगळे प्रोग्राम्स, पाटर्य़ा, पिकनिक्स् सारं काही हवामानावर ठरतं. तिथे हवामानाचा अंदाज एकदम परफेक्ट असतो. त्या दिवशी पण सकाळी सव्वा दहाला स्नो फॉल सुरू होईल सांगितलं होतं आणि अक्षरश: अलार्म लावल्याप्रमाणे सव्वा दहाला आकाशातून मऊ मऊ कापसासारखा हलका हलका बर्फ पडायला लागला. आमचा स्नो फॉलचा हा पहिलाच अनुभव! त्यामुळे भुसुभुसु पडणारा तो पांढराशुभ्र बर्फ पाहून खूपच आनंद होत होता. पण आता आनंद देणारा हा बर्फ पुढच्या काही तासांतच ‘क्या क्या गुल खिलानेवाला है’ याची त्यावेळी पुसटशीही कल्पना नव्हती. हळूहळू बर्फाची गती वाढत होती. बघता बघता घरासमोरचं हिरवंगार लॉन तास-दीड तासांतच पूर्णपणे बर्फाने आच्छादून गेलं आणि पांढऱ्या शुभ्र मऊ मऊ गादीसारखं दिसू लागलं. अमेरिकेत स्नो फॉल साधारण फॉल सीझन (पानगळ) संपल्यानंतर होतो. फॉल सीझनमध्ये झाडांचं पानन्पान गळून जातं. झाडं म्हणजे नुसता बुंधा आणि ओक्याबोक्या फांद्या राहतात. अशा वेळी झाडांवर पडणारा बर्फ झाडांवर टिकू शकत नाही आणि तो सरळ खाली जमिनीवर पडतो. पण या वेळचा स्नो फॉल सीझनच्या खूप आधी, झाडं फुला-पानांनी लदबदलेली असताना होत होता. त्यामुळे बर्फ झाडांवरून खाली न पडता झाडांवर अटकून राहू लागला. दुपारी अडीच-तीन वाजेपर्यंत खिडकी बाहेरचं संपूर्ण विश्व पांढरं शुभ्र झालं होतं. दूर दूपर्यंत पांढऱ्या रंगाशिवाय काहीच दृष्टीस पडत नव्हतं. सुट्टीचा दिवस असूनही स्नो फॉलच्या भाकितामुळे सगळय़ा बंगल्यांच्या गाडय़ा आपआपल्या ड्राइव्ह वेमध्येच उभ्या होत्या. सगळी झाडं, घरं, रस्ते, गाडय़ा सारं सारं पूर्ण त्या बर्फानी आच्छादून गेलं होतं.
हळूहळू म्युनिसिपालिटीच्या गाडय़ांचे आवाज सुरू झाले. या गाडय़ांच्या समोरच्या बाजूला मोठी मोठी फावडय़ांसारखी अवजारं असतात. ती रस्त्यावरचा बर्फ रस्त्याच्या दोन्ही बाजूला सरकावून देतात व वाहनांसाठी रस्ता साफ करतात. बघता बघता रस्त्याच्या दूतर्फा या गाडय़ांनी सरकावून ठेवलेल्या बर्फाच्या मोठय़ा मोठय़ा राशी तयार झाल्या. अचानक चारच्या सुमाराला घरातील वीज गेली. वीज नाही म्हणजे रूम हीटर, बॉयलर, चूल, फ्रीज सारंच बंद! बघता बघता घर थंड पडायला लागलं. बॉयलर बंद झाल्यामुळे नळाचं गरम पाणी बंद झालं. इकडे तिकडे फोन करून झाले. वीज कधी येईल याचा कोणीच अंदाज देईना. लहान बाळाला घेऊन अशा थंड घरात रात्र कशी काढायची हा मोठाच प्रश्न उभा राहिला. मुलाच्या एका मित्राला फोन केला. सुदैवाने त्याच्याकडे वीज होती. झोपायला इथेच या म्हणाला. मग आमच्या पुरतं अंथरुण पांघरुण बांधून घेतलं. मुलाने कारवरचा आणि ड्राइव्ह वे वरचा बर्फ फावडय़ाने साफ केला, गाडीचं हीटर सुरू केलं. मग आम्ही सर्वजण लॉनवर साचलेल्या गुडघाभर बर्फातून रस्ता काढीत कसे बसे कापर्यंत पोहोचलो. प्रथम मॉलमध्ये जाऊन जेवण उरकून घ्यायचं ठरलं. इथल्या मॉलमधला ‘तेरीयाकी चिकन’ हा पदार्थ आम्हाला खूप आवडतो. त्या तेरीयाकी चिकनवर आडवा हात मारून मुलाच्या मित्राकडे जाण्यासाठी उठलो. इतक्यात त्याचाच फोन आला. त्याच्याकडची पण वीज गेली होती. आणखी एका मित्राच्या अपार्टमेंटमध्ये वीज आहे. मी तिथेच चाललोय. तुम्ही पण तिथेच या असे तो म्हणाला. मग आमची गाडी त्या मित्राच्या अपार्टमेंटकडे वळली. आम्ही तिकडे पोहोचण्यापूर्वीच अजून दोन मित्र त्यांच्याकडची पण वीज गेल्यामुळे आपआपल्या कुटुंबीयांना घेऊन तिथे पोहचलेले होते. आता इतक्या सर्व लोकांनी त्या टू बीएचके अपार्टमेंटमध्ये कसं झोपायचं हा प्रश्नच होता. या मित्राचे पण आई-वडील आलेले होते भारतातून. सुदैवानी शेजारचं एक अपार्टमेंट, तिकडचं जोडपं लास वेगासला फिरायला गेलं असल्यामुळे आणि नशिबाने किल्ल्या अनुरागकडेच असल्यामुळे रिकामं मिळालं. एका रात्रीचाच तर प्रश्न आहे असा विचार करून काही लोकांची झोपण्याची व्यवस्था तिकडे केली. मग ज्याला जिथे जशी जागा मिळेल तिथे त्याने पथारी पसरली. एरवी अत्यंत टाप टिपीच्या त्या घराला एखाद्या धर्मशाळेचं स्वरूप आलं होतं. पहाटे पहाटे स्नो फॉल थांबला. पण चारही दिशांना प्रचंड प्रमाणात बर्फ साचला होता. ही सगळीच मुलं एकाच कंपनीत असल्यामुळे सकाळी सर्व बायकांनी मिळून भाजी पोळीचा एकच मोठा डबा त्यांना भरून दिला. दोन गाडय़ा घेऊन ते सर्व ऑफिसला गेले. दोन गाडय़ा घरी बायकांसाठी ठेवल्या. ऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर एकेकांचे आपआपल्या बायकांना फोन यायला लागले. ‘‘रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठी मोठी झाडं बर्फाचं वजन न पेलल्यामुळे मुळासकट उपटून विजेच्या तारांवर पडली आहेत. त्यामुळे तारा तुटल्याच, पण पोलसुद्धा मुळासकट उखडले गेले आहेत. त्यामुळे जवळपास पूर्ण मँचेस्टर गावातच काय संपूर्ण कनेक्टिकटमध्ये वीज नाही. सगळं सुरळीत होऊन वीज यायला चारपाच दिवस तरी लागतील. गेल्या शंभर वर्षांत ऑक्टोबर महिन्यात झाला नाही इतका बर्फ कनेक्टिक्टमध्ये काल झाला.’’ हे सर्व ऐकून आम्ही हबकलोच. चारपाच दिवस वीज नाही म्हणजे आंघोळीचा प्रश्न आला. मग या सर्व मुली दोन गाडय़ा घेऊन निघाल्या. प्रत्येकीच्या घरी जाऊन चारपाच दिवसांचे आंघोळीचे कपडे, नवऱ्यांचे ऑफिसचे कपडे घेऊन आल्या. चारपाच दिवस एकटय़ा अनुरागवर सर्वाच्या जेवणाचा भार नको म्हणून प्रत्येकीनी आपआपल्या घरून डाळ, तांदूळ, कणीक, तेल, फ्रीजमध्ये असतील नसतील त्या भाज्या, फळं, दूध, दही सर्व इथे आणून टाकलं. प्रत्येकीच्या फ्रीजरमध्ये मटण, चिकन, फीश हे पण भरपूर भरून ठेवलेलं होतं. पण या घरात नॉनव्हेज चालणार नव्हतं! शेवटी मन घट्ट करून त्या सर्वाला कचऱ्याचा डबा दाखवावा लागला. आता चारपाच दिवस राहाण्याचा प्रश्न उभा ठाकल्यामुळे शेजारच्या ब्लॉकच्या मालकाला फोन करून त्याचा ब्लॉक वापरण्याची अधिकृत परवानगी घेऊन टाकली.
रूम हिटरमुळे घरातील हवा खूप कोरडी झाली होती. सर्वानाच घशाला त्रास व्हायला लागला होता. अशा वेळी ह्य़ुमीडी फायर लावतात. त्यातील बाष्प हवा थोडी दमट करतं. इथे एक ह्य़ुमीडीफायर एका रूम पुरतं झालं. मग प्रत्येकीने आपआपल्या घरचं ह्युमीडीफायर आणलं. दोन्ही ब्लॉकच्या प्रत्येक रूममध्ये ठेवलं. जेवायला ताटं कमी पडायला लागली. डीशवॉशर दिवसातून तीन तीन वेळा लावावं लागत होतं. मग प्रत्येकीनं आपआपला डीस्पोझेबल प्लेटस् , ब्राऊल्स, ग्लासेसचा स्टॉक इथे आणून टाकला. प्रत्येकीचा अर्धा अधिक संसार इथे जमा झाला. त्या घराला आता एखाद्या निर्वासितांच्या छावणीचं स्वरूप आलं होतं.
एकेकाच्या खाण्या पिण्याच्या सवयी वेगवेगळय़ा. कोणी ऑफिसला जाताना फक्त कॉर्नफ्लेक्स खातो तर कोणी भरपूर नाश्ता करून जातो. पण इथे एकच नियम सर्वाना लागू केला गेला. एक जण रोज सकाळी सर्वासाठी नाश्ता, बनवू लागली. एकजण भाजी, एक जण पोळय़ा.. वगैरे. ऑफिस सुरू असलं तरी शाळा बंद होत्या. त्यामुळे चिल्लर पार्टी दिवसभर धुमाकूळ घालायला आणि सतत ‘खाऊ’ची डिमांड करायला घरीच होती.
तिसऱ्या दिवसापासून झाडं उचलण्याचं काम सुरू झालं. एक मोठा ट्रक आला. ट्रकच्या मागच्या भागातून एक मोठा दांडा बाहेर आला. त्याच्या टोकाला मोठी करवत होती. त्या करवतीने आधी पडलेल्या झाडावरचा बर्फ साफ केला. नंतर झाडाच्या बुंध्याचे आणि फांद्याचे तीनतीन/चारचार फुटांचे तुकडे केले गेले. मग एक भला मोठा चिमटा बाहेर आला. त्या चिमटय़ाने ते तुकडे उचलून ट्रकमध्ये फेकले. रस्त्यावरचा कचरा एका ब्लोअरच्या सहाय्याने एका बाजूला जमा केला गेला. रस्ता साफ! १५ ते २० मिनिटांचा खेळ! मग ट्रक थोडा पुढे! दुसऱ्या झाडावर हीच प्रक्रिया! दोन-अडीच तासांत संपूर्ण रस्ता साफ! आणि हे सर्व काम करायला वन मॅन आर्मी तैनात होती. याच पद्धतीनी हे काम संपूर्ण कनेक्टिकट स्टेटमध्ये होणार होतं. त्यानंतर पोल उभे करणे, तारा जोडणे वगैरे.. मग कुठे वीज येणार. म्हणजे अजून किमान आठवडा! आता आम्हा उभयतांना तिथे थोडं संकोचल्यासारखं व्हायला लागलं. मग आम्ही दोघे बसने न्यू जर्सीला लहान मुलाकडे गेलो. बरोबर सहाव्या दिवसापासून कॉपरेरेशनने शब्द दिल्याप्रमाणे एकेका एरियामध्ये वीजपुरवठा सुरू झाला. तसे तसे एकेक जण प्रस्थान ठेवू लागला. आपल्या घरी वीज आल्याचं कळल्यावर माझ्या मुलाने प्रथम जाऊन रूम हीटर आणि बॉयलर सुरू केले. घर बऱ्यापैकी उबदार झाल्यावर मग बायको मुलांना घेऊन गेला. दहा दिवसांनंतर आम्ही मँचेस्टरला परत आलो तेव्हा बस स्टॅण्डवरून घरी येताना पाहिलं रस्त्याच्या दूतर्फा बर्फाचे मोठे मोठे ढीग अजूनही तसेच होते. मी म्हटलं, ‘‘अरे, हा बर्फ अजून वितळला नाही!’’ यावर मुलगा म्हणाला, ‘‘वितळणार कसा? ऊन कुठे पडतंय? आता हा मार्च एप्रिलपर्यंत असाच राहणार.’’ आणि खरोखर डिसेंबरमध्ये भारतात परत यायला निघालो तेव्हासुद्धा तो बर्फ तसाच होता. आयुष्यभर आठवणीत राहणारा असा होता हा एक आगळावेगळा बर्फानुभव!
स्वप्नाली ताम्हाणे, नागपूर</strong>

Story img Loader