सर्व काही दिलं त्यानं मला. माझं भविष्य उज्ज्वल केलं. प्रवेश घेताना वाटलं होतं, कुठे आलो इथे आपण. काय शिकणार आहोत. काहीच तर नव्हतं तिथे शिक्षणासंबंधित, ना क्लासरूम, ना लॅबोरेटरी, ना हॉल, ना ऑफिस, ना हे, ना ते.
पण हे काही लागतच नाही शिकायला. लागतं फक्त मन. उत्तुंग झेप घेणारं, निश्चयी, काही तरी करून दाखविणारं, ध्येय गाठीशी बांधून वाटचाल केली की सगळं साध्य होतं.
ना खुर्ची, ना टेबल. वडाची सावली, पिंपळपानांची सळसळ अशा ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं, माहिती होतं मला. आजींनी सांगितलं होतं ते लहानपणीच, आपल्या संस्कृतीची परंपरा, म्हणूनच या अशा पडक्या वाडय़ात भरणाऱ्या कॉलेजातही प्रवेश घेऊन मी आनंदून गेले होते.
मोजकेच आम्ही विद्यार्थी मुलं आणि मुली प्रथमच सोबत. यापूर्वी मी मुलींच्याच शाळेत होते. पण दचकले नाही. थट्टा- मस्करी, गंमतजंमत. सगळं काही तिथे व्हायचं. पण एकदा का घरी आली, की घर एके घर. विसरून जायचं सगळं बाहेरचं जग.
वाटलं होतं पूर्णपणे विसरून जाईल का? एक स्त्री म्हणून घर संसार सांभाळताना जमेल का ही तारेवरची कसरत. मनाची पुन्हा तयारी झाली. न जमायला काय झालं? जमेल की सगळं आणि जमलं ते जे सर्व अपेक्षित होतं.
आजही तो वाडा आठवतो. आमचा मुलींचा घोळका, एका कोपऱ्यात बसलो होतो. आम्ही कॉलेजच्या आवारात, समोरून एक शिपाई आला. म्हणाला, ‘बाबूजींनी, बोलावलं तुम्हा सर्वाना,’ भीती वाटली. कशाला बोलावलं असेल? एकमेकींना हिम्मत देत भेटायला गेलो ‘बाबूजींना.’
बाबूजींनी स्मित हास्य केलं आणि गोड मृदू आवाजात म्हणाले, ‘वह अच्छे घरके लडकियोंको बैठनेकी जगह नही है. अंदर जाके बैठो, किती आपुलकी, किती नि:स्वार्थ प्रेम, किती जबाबदारीनं स्वीकारलेलं आमचं पालकत्व. संस्थेचे संस्थापक होते ‘बाबूजी’. आमच्याही मनात तेवढाच आदर, आदरयुक्त भीती. पुन्हा कधी अशा जागी बसलो नाहीत आम्ही, हेच ते संस्कार आज आठवतात. हीच ती माया, आपुलकी सुरक्षित जीवनाची ‘गुरुकिल्ली’ जी आम्हाला सर्व काही शिकवून गेली. ध्येय गाठायला मदत झाली यामुळे. यातूनच बनलो आम्ही. दृढ, निश्चयी, सासर-माहेर सांभाळून नोकरी करायला, समतोल साधायला शिकविणारी हीच ती शिकवण.
काय होतं त्या कॉलेज संबोधणाऱ्या जुन्या वाडय़ामध्ये! पण पळून नाही गेलो आम्ही. कारण मायेची माणसं होती तिथे, नीरव शांतता होती, पिंपळाचा आणि वडाचा भक्कम आधार होता तिथे.
काही साध्य करायला आणखी काय लागतं? स्वत:लाच ध्येय नसेल तर. उगाच नावं ठेवत बसायचं याला त्याला. स्वत:ची जिद्द, पूर्णपणे झोकून देण्याची क्षमता, नम्रता, शालीनता, जिथे उभे असाल तिथूनच सुरुवात करण्याची मनाची तयारी. स्वत:चीच इच्छाशक्ती, उंच उडण्याची सोबत घेऊन आईवडिलांनी दिलेली शिदोरी आणि गुरूंची गुरुकिल्ली.
डॉ. मंगला ठाकरे