सिनेमा आणि टीव्हीच्या प्रभावामुळे लग्न सोहळे बदलत चालले. लग्न पद्धतीत नसणाऱ्या अनेक गोष्टी आपण हायजॅक केल्या. लग्न हा मंगल पवित्र विधी आपण भव्य व ग्लॅमरस केला खरा, पण त्याक्षणी निर्माण होणाऱ्या नात्यांचं काय? ‘लग्न’ या एका घटनेने कुटुंबात अनेक नातीगोती एकाएकी एकदम जन्माला येतात. हीच नाती आई-मुलगा, भाऊ-बहीण अशा रक्ताच्या नात्यांना मागे सारून आपला तोरा मिरवतात.
गरीब गाईसारखी मायाळू ‘आई’ सासूच्या सिंहासनावर विराजमान होते. घरात दुर्लक्षिले गेलेल्या बाबांना ‘मामंजी’ची सामान्य सनद मिळते. निमूटपणे घरात वावरणाऱ्या ताई-माई ‘वन्स’ची जहागिरी मिळवून बसतात. धाकटय़ा भावात ‘भावोजी’ची ताकद भरली जाते. बाळूभावोजी अशी गोड हाक ऐकून घरात नात्यांची क्रांतीच होऊन जाते.
यातील काही नाती मात्र वर्षांनुवर्षे कुप्रसिद्धच असतात. सासू-सुनेचं नातं असंच एक बदनाम नातं, जे अपरिहार्यपणे जोडलं जातं. नणंद-भावजय नात्यात एक अहंकाराची विषवल्ली कळत नकळत फोफावत जाते. नववधू घराचं माप ओलांडल्यावर ती त्या कुटुंबात लगेचच ‘जाऊ’ नाहीतर ‘वहिनी’ होते.
लग्न जगभरातील संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. दोन भिन्न स्वभावाच्या अनोळखी व्यक्तींना त्यांचे नातेवाईक एकत्र आणतात आणि लग्न लागते. नातेसंबंध या संदर्भात सर्वात गुंतागुंतीचे नातं असतं ते लग्नानंतर. म्हणून भितीच्या भरात आणि उत्तेजीत अवस्थेत घेतलेला लग्नाचा निर्णय चुकायची शक्यता वाढते. लग्न हे नातं चांगलं मुरावं लगतं, त्यासाठी तेव्हढा वेळ द्यावा लागतो. संयम, धीर व सहनशीलता.. पर्यायानं दोन्हीकडून तडजोडीची तयारी होते, मग तयार होणाऱ्या सर्वच नात्यांना चव येते. खरं लग्नाचं नातं जोडलं जातं.
लग्न झाल्यानंतर दोन्ही घरची जोडप्याला आता पेढे कधी? काही एखादी गुडन्यूज? वगैरे प्रश्न विचारून हैराण करतात. आई-वडील म्हणतात आम्हाला आजी-आजोबा व्हायचंय, नातवंडाचं तोंड पाहायचंय मग..
एकदा का नातू/नात घरात जन्मली की, पुन्हा नवीन नात्यांची भर पडते. नातवंडामुळे दोन घराणी जवळ येऊन, नातवावर नात्याच्या प्रेमाचा हक्क सांगितला जातो. नातू/नात म्हणजे दुधावरची साय म्हणून दादा-दादी आणि नाना-नानी असे दोन ग्रुप पडतात. काका-काकू, मामा-मामी, आत्या-मावशी अशी नवीन नाती निर्माण होतात. त्यांच्यात नातवाचे/ नातीचे लाड करण्यात स्पर्धा सुरू होते. माहेरबरोबर ‘आजोळ’ या शब्दाला भावनिक ओढ निर्माण होते. मामा-मावशीमुळे आजोळची ओढ लागते. आजी-आजोबा नातवंडे यांच्या निर्लेप, प्रांजळ, अमर नात्याला मुलांचे आई-वडील बिझी असल्यामुळे फारच महत्त्व प्राप्त झाले आहे.
असं म्हणतात तुम्हाला तुमचं माणूस ओळखायचं असेल तर स्पर्शाची अनुभूती खूप काही सांगून जाते. हाच स्पर्श नात्याच्या बंधनात बांधून ठेवतो. चुकत असेल तर कानउघडणी करतो, संकटात असेल तर मदत करतो आणि आनंदात दुप्पटीने दान देऊन जातो.
कधीकधी लादलेल्या नात्यांपेक्षा ‘मानलेलं नांत’ जन्म घेतं ते एका वेगळय़ाच भावनेतून. विश्वासाची तर कधी त्यागाची भावना त्या मानलेल्या नात्यात असते. म्हणून म्हणतात जवळच्या नातलगांपेक्षा सख्खे शेजारी हे खरे नातलग. मदतीला सर्वप्रथम तेच धावून येतात. तोरण आणि मरण अशा दोन वेळीच फक्त दिसणाऱ्या नातेवाईकांची एक फॉरमॉलिटी म्हणून आपण ‘मान’ राखतो. त्यावेळी सख्ख्या शेजाऱ्यांना विसरता कामा नये.
खऱ्या नात्यांमधील झळाळी उजळून निघते ती त्याग आणि समर्पणामुळे. जे नातं मनाला भावलं, हृदयाला पटलं ते ‘नातं’ शब्दांच्या पलीकडचं असतं, नात्याला नाव द्या अगर देऊ नका.
काही नाही सांगताना तारांबळ उडते तर घराणं कूल वृत्तांत याचा आधार घेऊन ओढून ताणून ‘नातं’ सांगावं लागतं. अशी ‘नाती’ ही ‘गोती’ ठरतात.
श्रीनिवास स. डोंगरे