तशी मी लहानपणापासून फुलवेडीच. मग तो वासानं धुंद करणारा मोगरा असो वा रानात फुललेली रंगीबेरंगी बिनवासाची फुले असोत फुले दिसली की, काय छान फुलं फुलली आहेत म्हणत माझे पाय आपोआपच तिकडे वळतात आणि हात अलगदपणे फुलांवर फिरायला आसुसतात. लहानपणी आई मला फुलवेडीच म्हणायची. एवढेसे केस आणि केवढी फुलं डोक्यात माळतेय म्हणून खोटं खोटं कुरकुरत कौतुक करायची आणि म्हणायची सोसमावशी आहे नुसती. माझे हे फुलांचे वेड बहुधा वडिलांकडून आले असावे. त्यांना गुलाबाची तऱ्हेतऱ्हेची झाडे लावण्याची प्रचंड हौस. आमच्या सोलापुरात तर त्यांना गुलाबवाले म्हणूनच ओळखीत. आमच्या घराच्या बागेत कृष्णकमळ सोनटक्का अशी वासाची फुले तर होतीच. शिवाय जांभळी, पांढरी, पिवळी अशी तीनही रंगांची कोरांटी भरपूर होती. त्याचे जाडे जाडे गजरे करून डोक्यात घालण्यात आणि मैत्रिणींना वाटण्यात खूपच आनंद वाटायचा तसेही मला फुले डोक्यात घालण्यापेक्षाही तोडून माळा करण्यात अधिक आनंद वाटतो. फुले तोडताना येणारा सुगंध आणि फुलांचा स्पर्श हवाहवासा वाटतो. अद्यापही माझे हे फुलांचे वेड कायम आहे. आमच्या घराच्या बाजूलाच खूप हिरवी अबोली फुलते. ईनमीनतीन पाकळ्यांचे फूल पण रंग अतिशय सुंदर. कोणाला गजरा दिला किंवा डोक्यात घातला तर कोणीही हटकून विचारतेच कसली फुले आहेत ही? खरी आहेत का खोटी? काय छान रंग आहे ना? असे कोणीतरी म्हटले की अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटते.
या साऱ्या फुलांप्रमाणेच बकुळीचे छोटेसे सुवासिक फूलही माझ्या अत्यंत आवडीचे. मध्यंतरी अलिबागला गेले असताना वरसोली बीचवर जाण्यासाठी पायीच निघालो होतो. एकाएकी ओळखीचा सुगंध आला. कसला बरं हा वास? अरे! हा बकुळीचा वास. डोळे इकडे-तिकडे बघत झाडाचा शोध घेऊ लागले. मुलीला म्हटलेही अगं छान वास येतोय नक्कीच जवळच झाड आहे. असे म्हणून चाललो आहोत तोच समोर रस्ताभर बकुळीचा सडा पडलेला. जणू काही फुले म्हणत होती बघतेस काय? उचल हवी तेवढी आवडतात ना तुला. भरपूर फुले वेचून घेतली. अगदी तृप्त झाले. कोणीच कशी फुले वेचत नाही म्हणून नवल वाटले. पण मुंबई सोडली तर इतर ठिकाणी गजरे डोक्यात घालायचे वेड नाही. खूप दिवसांनी मला बकुळी भेटल्याचा आनंद झाला.
खरं सांगायचं म्हणजे या बकुळीचं आणि माझं नक्कीच काहीतरी नातं आहे. कारण मी जेथे जेथे जाते तेथे तेथे ही बकुळी मला भेटतेच. मग मी आठवायचा प्रयत्न करते कुठे बरं ही आपल्याला पहिल्यांदा भेटली? विचार करत करत मन शालेय जीवनाकडे वळते. मी असेन तिसरी चौथीत. माझ्या वर्गात ‘मोने’ आडनावाची एक मुलगी होती. तिचे नाव मला आठवत नाही. पण मी रोज तिच्याकडे खेळायला जायची. तिचे स्वत:चे घर होते. अंगणात छानसा झोपाळा होता. आणि मागच्या बाजूस एक भलेथोरले बकुळीचे झाडही होते. तिच्या घरी शेतातल्या भुईमुगाच्या शेंगाची पोती पडलेली असत. आम्ही भरपूर खेळायचो. आणि नंतर झोपाळ्यावर बसून शेंगातले दाणे आणि गूळ खायचो. संध्याकाळचे पाच वाजले की टपाटप बकुळीची फुले पडत. ती वेचायची आणि झोपाळ्यावर बसून गजरे करायचे. कधी दोरा नसेल तर बकुळीचेच पान घ्यायचे. पानाचा खालचा थोडासा भाग ठेवून दोन्ही बाजूने पान फाडून टाकायचे. फक्त मधला दांडा ठेवायचा आणि त्यात फुले ओवायची. बकुळीचे फूल ओवायला खूपच सोपे असते. दोनतीन वर्ष ही हौस भागली. फायनल नंतर दोघींच्या शाळा बदलल्या आणि आपोआपच भेटीगाठी बंद झाल्या. मग खूप वर्ष बकुळीही मला दुरावली. काही वर्षांनी आम्हीही सोलापूर सोडून मुंबईला आलो. आणि अचानक एकदा शनिवार वाडय़ात भेटली. शनिवार वाडा बघायला गेलो असताना खालच्या मैदानात बकुळीची भरपूर झाडे होती.
पण मोसम नसल्यामुळे फुले मात्र मिळाली नाहीत. नंतर एकदा केव्हातरी पन्हाळगडच्या तबक उद्यानात. आपटय़ाला राकेश रोशनच्या शिवमंदिराजवळील बागेत, शेगावला, पालीला अशी अधूनमधून भेटतच राहिली. लग्नानंतर नागपूरला गेले तर तेथेही अंगणात बकुळी होतीच. आता तर काय शालेय जीवनात आयुष्यात आलेली ही बकुळी आता उतार वयातही साथ देण्यासाठी माझ्या गावातच आली आहे. डोंबिवलीत बऱ्याच ठिकाणी बकुळीची झाडे लावल्यामुळे आता ती मला रोजच भेटते. आणि अखेपर्यंत भेटणारच आहे. म्हणूनच मला वाटते की माझे अणि बकुळीचे नक्कीच काहीतरी नाते आहे.
राजश्री खरे – response.lokprabha@expressindia.com