मुलांनो, तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, पण तुरेवाला कोकीळ पक्षी म्हणजे ‘क्रेस्टेड ककू’ आपल्याकडे परदेशातून येतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला तो दिसू लागतो. यंदाही जून महिन्यात ‘चातक’ हजर झाला. फार मोठा प्रवास करून तो दमला होता. या चातकाचं या वर्षी कुणीच स्वागत केलं नाही. कारण माहीत आहे का? कावळ्याने आधीच बागेतल्या पक्ष्यांना फितवलं होतं. कावळ्याचा आवाज खराब होता. त्याच्याकडे रंगरूप नव्हते. तुरा तर नव्हताच नव्हता. त्यामुळे चातकाचा तो राग करायचा. चातकाशी कुणीच बोलेना. रंगीत रानचिमणी फक्त रागाने म्हणाली, ‘आलास भाव खायला? तिकडे तुझ्या देशांतून हाकललं का तुला? इथे आमच्या प्रदेशात का तडमडतोस दरवर्षी? इथली फळं भारी गोड लागत असतील, नाही का? स्वत:ला इथं घरटं बांधायला नको. यायचं, मजा करायची. गाणी म्हणायची आणि गरज संपली की, उडून जायचं’..चिमणीचं बोलणं म्हणजे ‘टोचणं’ होतं. चातकाला फार वाईट वाटलं. तो एक प्रवासी पक्षी होता. भारत देश, इथला निसर्ग त्याला फार आवडायचा. आपल्या मूळ देशी आफ्रिकेला गेल्यावर तिथल्या पाखरांकडे तो भारताचं कौतुक करायचा. मग दरवर्षी हा पाहुणा आला, तर काय बिघडलं? कावळा मात्र त्याला उपरा ठरवत होता. परदेशी पक्ष्यांनी भारतात यायचं नाही असं त्याने स्वत:च जाहीर केलं. गरुड किंवा मोरसुद्धा असं कधी म्हणाले नव्हते.

कावळ्याने शिकारी पक्ष्यांची वेगळी सभा घेतली. ससाणा आणि घारीला चातकाला पळवून लावण्यासाठी नेमण्यात आलं.

चातकाला कळेना की, आता कुठे आसरा घ्यायचा? कारण प्रत्येक झाडावर स्थानिक पक्षी हक्क सांगत होते. रात्री तर विश्रांती घ्यायला हवी! पण ती घेणार कुठं? चातक रडवेला झाला. दु:खाने त्याचा तुरा झुकला. असं कधी झालं नव्हतं. घार तर चातकाची शिकार करण्याची संधीच शोधत होती. ससाणाही टपून होता. म्हणजे लगेच परत आफ्रि केकडे जायला उडणंही धोक्याचे होते.

उदास चातकाशी कुणीतरी गोड आवाजात बोलू लागले. ‘भाई, मला ओळखलं नाहीस ना? कसं ओळखणार? आपलं ‘कुटुंब’ तसं एकच. पण गाठभेट नाही. मी महाबळेश्वरला होतो. म्हणजे सातारा जिल्हा. यंदा इकडे कोकणात खाली उतरलो! बरं झालं भेटलास, खूप दिवस तशी इच्छा होती माझी. नातं अगदी, सख्खं नसलं तरी तुझा चुलतभाऊ आहे मी! असं म्हणून त्या पक्ष्याने त्याचं नाव ‘पावशा’ सांगितलं. पावशासुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गोड हुरहूर निर्माण करणारा आवाज ऐकवतो. त्याला हिंदीत ‘पपीहा’ म्हणतात. तर या पावशाने रक्ताचं नातं सांगत या दु:खी, घाबरलेल्या चातकाला धीर दिला. चातक त्याच्या सोबतीने हळूच त्या बागेच्या बाहेर पडला. कावळ्याला उद्देशून पावशा मुद्दाम बोलला. ‘हा चातकभाई माझा पाहुणा आहे. त्याला कुणी त्रास देऊ नका. कळलं ना? तुमच्या घरटय़ात आसरा मागत नाही आम्ही. घाबरू नका..’

गावात आल्यावर आपल्या या चुलतभावाला चातकाने विचारले. ‘आपण राहायचं कुठे? रात्री अडचण होणार.’ पावशा म्हणाला. ‘अरे आपली जात घरटी बांधणारी नाही, पण दापोलीतल्या मुलांनी ‘कृत्रिम घरटी’ पाखरांसाठी तयार केली आहेत. लाकडी खोकेच आहेत ते लहान-मोठे. आत कापसाची गादी आहे. सावरी, ईशान, श्रावणी, ध्रुव सगळी मुलं पक्ष्यांच्या त्या घरात फळं आणून ठेवतात. अनुजने तर सुका मेवा पण दिला मला. बदाम मी कधीच खाल्ले नव्हते रे. पोरांमुळे मला मिळाले. तू माझ्याबरोबर त्या लाकडी घरात राहायला ये. जेव्हा तुला वाटेल तेव्हा आफ्रिकेला जा.

चुलतभावाबरोबर चातक त्या मुलांनी झाडाला ‘फिट’ केलेल्या घरात राहिला आणि नंतर एके दिवशी म्हणाला, ‘भाऊ, तुला सोडून मला नाही जायचं! मी आफ्रि केला परतण्याचा विचार सोडला. जग बदलतंय, आपण पक्ष्यांनी पण बदललं पाहिजे. आपले पूर्वज अशा ‘नेट बॉक्स’मध्ये राहिले असते का? आपण राहतोच ना? तसं मला कायम भारतातच राहू दे..’ हा विचार तर पावशाला खूपच आवडला. आता चातक पावशाबरोबर कोकणातच राहतो. मस्त ना!
response.lokprabha@expressindia.com

Story img Loader