ऊन येऊन जातं, पण कुठं जात असेल? आपण पावसाचा जेवढा विचार करतो, तेवढा कधी आमच्या या उन्हाचा केला काय? ऊन रुसलं, दूरच्या घरीच घुगून बसलं तर केवळ काळोख उरेल! तसाही बराच अंधार देशात आहेच. विचारवंतांची हत्या हीसुद्धा अंधार युगाचीच चाहूल!

मी उन्हाला धीर देतो. ‘पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीच आले’सारख्या रंगसुंदर, स्वप्निल ओळी लिहिणाऱ्या कवी मंगेश पाडगावकरांचं देवाचं करावं तसं स्मरण करतो. माझं घर कायमच उन्हात असल्यामुळे त्याचा मला आधार आहे आणि माझा त्याला शेजार आहे. प्रसिद्धीचं ‘प्रकाशित’ अंग थोडं फार असल्यामुळे ऊन मी पांघरतो अणि आयुष्याच्या उतारावर कोवळे लिखाण करतो!

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

उजेडाची दिशा ज्ञान-विज्ञानाची असते. तुम्ही निरंजन घाटेंचं ‘संभव-असंभव’ पुस्तक वाचून बघा. डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. प्रा. रमेश पानसे आणि सहकाऱ्यांनी सिद्ध केलेलं ‘कर्ता करविता’ हे पुस्तकही असाच प्रकाश दाखवतं. जर तरुण पोरांनी वाचनच केलं नाही,  संशोधनाची दखलच घेतली नाही, तर उजाडणारच नाही. उलट सगळं उजाड होईल! खाजगी जीवनात अगदी उनाड पोरांच्या हातातही मी पुस्तकं दिली आणि ते टगे कवितासंग्रहसुद्धा वाचायला लागले. विज्ञानवादी अंधश्रद्धा निर्मूलन ‘शिकले’. माझे एक जुने स्नेही विकास घारपुरे ह्यांनी तर दापोली तालुक्यातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा टपाल अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवला होता. शासन-प्रशासनाला या गोष्टींशी देणंघेणं नसेल, तर विकास हे मृगजळ ठरेल!

चमकोगिरी करणारे ‘शाई’नर लेखक आज गल्लीबोळात आहेत, पण ते फक्त शाई वापरतात. काळीज अंथरत नाहीत. बुद्धिप्रामाण्यवादाची विद्रोही ठिणगी तर त्यांच्यापाशी कधीच नव्हती. त्यामुळे जिंदगीचं आकलनच नाही. हौशी साहित्याची शोकांतिका ती हीच!

नवी, तरतरीत, तरणीबांड, थोडीशी वांड ‘ऊर्जा’ तरी आपण कुठे नीट जपतो? चांगल्या (!) घरची पोरं पूर्ण वाया गेलेली मी बघतो. अनेकांचं व्यसनांमुळे अकाली निधन झालं, ना कुणाला खंत, ना खेद! एका ड्रग अ‍ॅडिक्टने तर स्वत:ला जाळून घेतलं होतं! अगणित मुलांच्या मनामनात आज वैफल्य आहे. त्याचं गणित कुणी कधी मांडलं? अनेक महाविद्यालयांत साधी समुपदेशनाची सोय नाही. विजेसारख्या चमकदार वाटणाऱ्या पोरी नंतर फक्त सासरची धुणी-भांडी करत राहतात.

मग वाटतं, ऊन आलं काय, गेलं काय, आपल्या देशाला कशाचंच काही देणंघेणं राहिलेलं नाही. कल्लोळाचं पाणी तेवढं ढवळलं जातंय. एकमेकांच्या विरोधात द्वेषाचा विस्तव तेवढा भडकवला जातोय. पर्याय शोधणाऱ्या ‘सूर्यचूल’ वापरणाऱ्यांना मात्र आजही देश, हसतोय. कोकणात तर ‘पर्यावरणवादी’ किंवा ‘नास्तिक’ हीसुद्धा जवळपास शिवीच आहे! ‘भ’ आणि ‘भो’ पासून सुरू होणारे अपशब्द तेवढे सत्य सांगणाऱ्या माझ्यासारख्या मुक्त पत्रकाराबद्दल वापरले जातात. अशा गुंफांमध्ये प्रकाश कसा पडेल? तुम्हीच सांगा! वीज जाऊन येऊन असते तेव्हा टळटळीत दुपारी मी माझ्या अभ्यासिकेत असतो, पण एकाग्रता कशी लाभणार? कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रचंड मोठे आवाज सतत सुरू असतात. कमर्शिअल उद्योग जे मोठे आवाज करतात, राहत्या वस्तीत घुसवले आहेत. ‘ध्वनिमापन’ हा प्रकारच प्रतिगामी कोकणाला माहीत नसावा, ठाऊक असेल तर गरजेचा वाटत नसावा. लेखन, वाचन, चिंतन, संशोधन, प्रकाशन, ज्ञानजतन, त्याचं प्रसारण या सगळ्या प्रक्रिया अत्यंत मौल्यवान आहेत. त्यांची पुरेशी कदर, आदर मराठी माणसाने कधीही ठेवला नाही. पुस्तकांचे खप वेगळं काय सांगतात? लेखकरावाला वेगळी नोकरी का करावी लागते? एखादा लेखक तरी एवढय़ा मोठय़ा महाराष्ट्राने कधी पूर्णवेळ नीट जगवला? साहित्य संमेलनांनी कोटय़वधी रुपये उधळले, पण खरा लेखक अर्धपोटीच राहिला. या विसंगतीची जाणीव कोणत्या महा (न)  मंडळाला आहे? काही नाही!

उन्हासाठी, प्रकाशासाठी सगळी दारं अशी बंद केलयावर हिंस्त्र, जंगली, स्वार्थी, उग्र, बेफाम काळोखकाळ नाना संकटं घेऊन येणारच!

जिथं ऊन नांदतं, तिथेच प्रेमळ सावलीही उभी राहते. ईश्वर नसलेल्या नश्वर जगातून तुम्ही ऊनच तुडवून, बडवून हद्दपार करत आहात. मग सावली तरी कशी मिळणार? बरणीबंद ऊन विकत मिळत नाही. त्यांचे सोनेरी पंख आपण लावायचे असतात. मी नेहमी उन्हाला बिलगून राहिलो. आयुष्य चांगलं शेकून निघालं.

‘‘चिंतेचं आता भय, चिंता नाही!
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader