‘‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे’’ ही बालकवींची सुप्रसिद्ध कविता कॉलेजमध्ये समग्र बालकवींचा अभ्यास करताना वाचली. बालकवींची सौंदर्यदृष्टी आपण घेऊ या. मग यत्र तत्र सर्वत्र आनंदच दिसेल. माणसाला परमेश्वराने अंत:करण बहाल केलंय. या अंत:करणात चार भाव आहेत. मन, चित्त, बुद्धी, अहंकार, भक्ती हा जसा मनाचा भाव आहे तसाच आनंदही मनाचा भाव आहे. आपलं मन शुद्ध असावं, तरल असावं, तशी दृष्टीही आनंदाचा शोध घेणारी असावी. या पृथ्वीमोलाच्या गोष्टी आहेत. निसर्गात सर्वत्र आनंदच भरून राहिला आहे. पहाटे उदयाचली आलेल्या लोहगोल वासरमणीच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात होऊ दे.
पक्ष्यांचा मंजूळ रव, मोरपंखी पिसारा फुलवून नाचणारा मयूर, पारिजातकाचा मंद सुगंध, सागराची गाज, पाण्याचे धबधबे, वसंतात उमलणारी सुवासिक फुलें, किती किती सांगू? याकडे आपण सौंदर्यदृष्टीने पाहिलं तर समजतं, की हे आनंदाचं भांडार परमेश्वराने आपल्यासाठी खुलं केलंय. माझ्या ओळखीचे अेक गृहस्थ अेकदां म्हणाले, नायगरा काय पहायचाय? बाथरूममधला नळ जरा जोरात सोडला की नायगराच कीं हो. काय म्हणावे या दृष्टिदारिद्रय़ाला, असो.
हा मनाचा भाव-आनंदही तीन प्रकारचा असतो बरं का! राजसी, तामसी, सात्त्विक.
आयुष्य सुखात घालवणे. जेवणावळी, मनोरंजन, मित्र परिवार, सर्वाना हवे नको बघणे, याला राजसी आनंद म्हणावे. आपण बहुतेक सारेजण याच आनंदाचे सभासद.
आता तामसी आनंद पाहा. दुसऱ्याला पीडा देअून मिळवलेला आनंद तामसीच हं. मला लहानपणीची एक ऐक लेली गोष्ट आठवते आहे. विहिरीच्या काठावर बसून मुलें पाण्यात दगड फेकत होती. जिवाला घाबरून बेडूक सैरभैर पळत होते. शेवटी एक वडिलधारा बेडूक मुलांना म्हणाला, ‘‘अरे तुम्ही हे काय करताय?’’ मुलें म्हणाली, ‘‘खेळतोय. आम्हाला मजा येते आहे. आनंद वाटतो आहे.’’ वडिलधारे बेडूक दादा म्हणाले, ‘‘तुमची मजा होते, तुम्हाला आनंद वाटतो. पण आमचा जीव जातो ना.’’ तर असा हा तामसी आनंद. शेजाऱ्याच्या घराला आग लागली तर होअूं दे मेल्याचं तळपट. म्हणून कडाकडा बोटे मोडणारी माणसे तामसी आनंदाचे सभासद. शेजाऱ्याच्या घराला आग लागली तर मिळेल तिथून पाण्याच्या घागरी आणून आग विझविण्याचा प्रयत्न नको का करायला? यासाठीं मनाचा मोठेपणा व मनही तसंच शांत व तरल असायला हवं ना?
अनेक जण म्हणतात, या कामांतून मला आनंद मिळतो, माझ्या आनंदासाठी मी हे काम करतो आहे. अन् करत राहणार आहे. पण.. काम भलेही चांगले असो कुटुंबीयांना नको जन्म करायचा कां? सर्व कुटुंबीयांची ससेहोलपट करणारा तुमचा आनंद तामसीच बरं.
आतां सात्त्विक आनंदाचा विचार करू या. शेजाऱ्याच्या घरांत कांहीही आनंददायक घटना घडली, क्षुल्लक का असेना तुम्हाला आनंद व्हायला हवा. तुमचं, मन अेवढं दिलदार असायला हवं. आचार्य विनोबाजी भावे म्हणतात, ‘‘भुकेल्यासमोर भरले ताट आले असतां त्याने ते समोरच्या, भुकेल्याला देणे व त्याची तृप्तीची ढेकर अैकणे याला संस्कृती म्हणतात. तसेच निसर्गाच्या नानारूपांतून मिळणारा आनंद सात्त्विकच बरं. माझ्या व्यक्तिगत जीवनांत मला पतीसमवेत भारत दर्शन घेता आलं. हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशातून पाहिलेला कांचंनगंगा पर्वतराजींतून उदयाचली आलेला वासरमणी पाहिला. अहाहाऽऽऽ! कन्याकुमारीला भारताच्या पायाशी पसरलेला अथांग महासागर पाहिला व त्याचे धाकटे बंधू बंगालच्या उपसागर व अरबी समुद्र यांची तिघांची गप्पारूपी गाज ऐकली व तिथून सूर्योदयही पाहिला. मान उंचावून दुखावेल अितकी उंचच उंच गोपुरे, रामेश्वरम्, मदुराई, जगन्नाथ पुरी, कोनार्क पाहून थक्क झाले. अजंठा वेरुळ पाहिले. हर्ष माईना मनीं अशी अवस्था झाली.
पॅसिफिक महासागरातून आम्हाला सांगणारा, ‘‘उद्या परत येतो हं’’ मावळता दिनकर बघितला. अटलांटिक महासागरांतून परतणाऱ्या मावळत्या दिनकराला अघ्र्य देण्याचं भाग्य मला लाभलं. विविधरंगी टय़ुलिपच्या शेतांतून भटकणे, थंडगार तुषार अंगावर झेलणे हा माझा व्यक्तिगत आनंद. पहाटे कानावर येणारी कॉल ऑफ व्हॅलीची धून, पहाटे पहाटे भारतरत्न पंडित भीमसेन जोशींच्या धीरगंभीर ‘आवाजांतली’ माझे माहेर पंढरी! ही लकेर ऐकली की सारी सकाळ आनंदमय होते. तोंडाचे बोळके असलेल्या बाळाच्या हसण्यातील निरागसपणा, पहाटे साखरझोपेत अंगावरून फिरणारा मायेचा स्पर्श. काय काय म्हणून सांगू?
पण प्रत्येकाच्या जीवनात अेक अत्युच्च आनंदाचा क्षण येतो. पाहा आठवून. तसा तो माझ्या जीवनांत आला. कधी सांगू? सन १९५८ ची दिवाळी. माझ्या आईने माझ्या मांडीवर माझ ंनवजात बाळ ठेवलं. त्या खूप कुरळ्या दाट केसांचं जावळ व टपोरे डोळे असलेल्या माझ्या बाळाला मी डोळे भरून पाहिलं. त्याच्या दर्शनानं जो आनंद मिळाला तो आयुष्यातला अत्युच्च आनंद क्षण! मी मनांत म्हटलं, हिच्या रूपानं मला लाभलं त्रिलोकीचं मंगलस्थान. हिनं मला दिलं मातृत्वाचं महन्मंगल स्थान. तर असे हे मंगलमय अजरामर झालेले आनंदाचे वरदान. चला मग, ऐका माझं.
मन आनंदे नाचलं, हसलं
अंगण माझं आनंदी सुगंधी
फुलांनी सजलं,
अशा या आनंदाने सजलेल्या अंगणांत आपण सारेजण फेर धरू या आणि गाऊ या,
ऐलोमा पैलोमा गणेश देवा,
आनंदाचा खेळ चालूं दे,
करीन तुझी सेवा.
आणि मग खिरापत वाटूं या सर्वाना. आनंदाची खिरापत. तुम्हीपण घ्या आनंदाची खिरापत.
शकुंतला नानिवडेकर – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा