वाढदिवसाच्या दिवशी आपले आप्तेष्ट बहुतेक वेळा भेटवस्तू देतात. भेटवस्तू लहान असो वा मोठी, स्वस्त असो वा महाग; त्यांची तुलना होऊ शकत नाही. कारण त्या भेटीच्या मागची भावना अमूल्य असते. यंदा माझ्या वाढदिवसाला मिळालेल्या भेटवस्तूंपैकी एकीने मात्र माझे लक्ष जास्तच वेधून घेतले. ती भेट पाहून मला आनंद तर झालाच; पण ती खूप जुन्या, खोल रुजलेल्या आणि शाळकरी आठवणींना ती वस्तू स्पर्शून गेली. आणि ती भेटवस्तू म्हणजे – शाईपेन!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काळ्या आणि चंदेरी रंगाचा तो शाईपेन खरोखर खूपच सुंदर होता. चकाकणारी सोनेरी निब अत्यंत रेखीव होती. तो शाईपेन पाहून मी हरखून गेले. माझे मन शाळेच्या जादूई दुनियेत केव्हाचे रममाण झाले. आयुष्यात पहिल्यांदा वापरलेला शाईपेन ते धकाधकीच्या जीवनात कामाच्या व्यापात त्याचा पडलेला विसर- इथपर्यंत सगळी क्षणचित्रे मला दिसू लागली. तशी दिसायला शाईपेन – ही वस्तू फार क्षुल्लक वाटते (किमान वय- वाढलेल्या माणसांना तरी!); पण प्रत्येकाच्या आयुष्यातल्या सोनेरी क्षणाची ती एक गोष्ट आहे, असे मला वाटते.

लहानपणी मला मोराचे पीस, टाक, वेत अशा वस्तू वापरून लिखाण करण्याचे भयंकर आकर्षण होते. आजोबा नेहमी टाकाने केलेल्या लिखाणाबद्दल बोलायचे, तेव्हा मलाही कधीतरी टाक वापरायला मिळावा अशी खूप इच्छा असायची. पण वयाच्या सातव्या- आठव्या वर्षी ‘शाईपेन’ हा आधुनिक टाक माझ्या हातात पडला. मला बाबांनी आणलेलं पहिलंवहिलं शाईपेन प्रचंड आवडलं होतं आणि ते घेऊन मी घरभर मिरवत होते. शाळेतही साधारण त्याच सुमारास शाईपेन वापरण्याची सूचना मिळाली. मग काय, तेव्हापासून सगळं लिखाण त्याच पेनानं! शाईपेनाची जीवनदाहिनी- शाईची दौत, तीही सोबत असायची कायम. दररोज शाळेतून आल्यावर शाईने बरबटलेले हात, कपडय़ांवर उडालेले सहीचे शिंतोड बघून आई आणि आज्जीचा थोडा ओरडाही मिळायचा; पण शाईपेन वापरण्यात खूप मजा होती हे नक्की. केवळ अभ्यास वा लिखाणच नाही, तर अजून बऱ्याच गोष्टींसाठी आम्ही बिलंदर मुलं शाई वापरत असू. जणू शाईपेन आणि शाईची दौत पाहून आमच्या कलाकसुरींना प्रोत्साहन मिळे. शाळेत वर्गाच्या भिंतींवर नक्षी म्हणून शाईपेनाने शिंतोडे उडवत असू. अर्थातच, अशा पराक्रमांसाठी शाळेत शिक्षाही व्हायची. दोरा शाईत बुडवून वहीच्या मागच्या पानांवरसुद्धा नक्षीकाम चाले. अगदी दहावीपर्यंत शाईपेन म्हणजे सख्खा मित्र असल्यासारखंच होतं. शाईपेन वापरायचं म्हणून का होईना हस्ताक्षर सुधारण्यासाठी आमची धडपड चालायची. शुद्धलेखन करणेही मान्य करायचो.

शाळा संपल्यानंतर थोडय़ाच वर्षांत, शाईपेनची जागा इतर आधुनिक पेनांनी घेतली. इतर पेनांमध्ये विविधता होती, वेगळे रंगरूप; परंतु रिफिलची नळी संपली की तो पेन आयुष्यातून जवळपास हद्दपार होतो. त्यामुळे इतर मॉडर्न पेनांबरोबर शाईपेनसारखी जवळीक कधी निर्माण झालीच नाही. पेन हे फक्त लिखाणाचे साधन बनले. शाईपेनात जो भाव, जी आपुलकी वाटायची ती रिफिलीच्या पेनातून निघून गेली. हल्ली कॉम्प्युटरच्या युगात पेन वापरणेही कमी झाले. वाढत्या वयाबरोबर छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधली मजा हरवून गेली. सगळ्या वस्तू युज अ‍ॅण्ड थ्रोच्या तत्त्वावर आयुष्यात येतात आणि जातात.

सध्याची लहान मुलं तर खूपच हुशार आणि चंट आहेत. मोबाइल, कॉम्प्युटर, आयपॅड ही त्यांची खेळणी झाली आहेत. कित्येक शाळाही ‘ना- पुस्तक, ना- फळा’ ‘ई-स्कूल’ झाल्या आहेत. सध्याचं वास्तव अनुभवताना एक प्रश्न मला नेहमी सतावतो, या नवीन पिढीला शाईपेनसारख्या गोष्टींबद्दल कधी नवलाई वाटेल का? त्याहीपेक्षा, कधी ते त्यांच्या हातात पडेल का? आम्ही, आमच्या पिढीने अनुभवलेली मजा या मुलांना अनुभवयाला मिळेल का? कदाचित टीव्ही, मोबाइल, कॉम्प्युटरसारख्या आधुनिक वस्तूंच्या गर्दीत- एक साधे लिहिण्यासाठी वापरले जाणारे शाईपेन कुठे अडगळीच्या कोपऱ्यात गेले असेल कुणास ठाऊक.

अगदी सुंदर, रम्य आणि रंगीत बालपणीच्या आठवणीतून माझे मन आता वास्तवात येत होते. शाईपेनाबरोबरच आपण बऱ्याच गोष्टी विसरून गेलो आहोत, याची जाणीव झाली. आता हे भेट म्हणून मिळालेलं शाईपेन पाहून पुन्हा नवीन सुरुवात करायची ठरवली. हरवलेले ते निळे – सोनेरी दिवस पुन्हा जगण्याचा निर्धार केला. त्या आप्तमित्राचे आभार शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही; पण शाईपेनाची ती खास जागा अजूनही माझ्या मनात आहे, ही सुखद जाणीव मात्र झाली.
पूजा पवार – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व ब्लॉगर्स कट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog ink pen