हिवाळ्याचे दिवस होते. हवेत छानसा गारवा होता. वातावरण प्रसन्न होते. रविवारचा दिवस होता. काही कामासाठी कर्जतला जायचे होते. डोंबिवलीला कर्जत लोकल पकडली. सुट्टीचा दिवस आणि लवकरची गाडी होती. त्यामुळे गाडीला फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे खिडकीजवळची जागा मिळाली. चला, आता कर्जत येईपर्यंत काळजी नाही म्हणून सुस्कारा सोडला आणि आरामशीर बसले. गाडी कल्याणला थांबली आणि कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा एक घोळका चिवचिवाट करीत गाडीत चढला. माझ्याच आजूबाजूची जागा रिकामी असल्यामुळे मुले माझ्याच आजूबाजूला बसली. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या.. नंतर पाहिले तर कोणत्या तरी विषयावर वाद चालू होता. म्हणून जरा बारकाईने ऐकण्यासाठी कान टवकारले, तर लक्षात आले खरा श्रीमंत कोण, यावर चर्चा चालू होती. मी जरा अधिकच कान टवकारले. कोणी म्हणे, अरे त्या अमक्याजवळ एवढा पैसा आहे की विचारूच नको. तोच खरा श्रीमंत. कोणी म्हणे, अरे त्या अमक्याजवळ तीन-चार मोठे बंगले तोच खरा श्रीमंत. कोणाच्या दृष्टीने भरपूर सोने-नाणे, गाडय़ा तो खरा श्रीमंत, तर कोणी म्हणे देवाला सोने-नाणे भरपूर अर्पण करतो तो खरा श्रीमंत. शेवटी भरपूर पैसा असलेला, बंगला, गाडय़ा, सोने-नाणे असलेला, तर देवाला सोने-नाणे अर्पण करणाराच श्रीमंत. येथेच चर्चा थांबत होती. त्यात मग सचिन तेंडुलकर, अंबानी बंधू, राजकारणी साऱ्यांची नावे चढाओढीने घेतली जात होती. थोडय़ा वेळाने नेरळ आले आणि सारी मुले उतरून गेली. बहुधा सहलीसाठी निघाली असतील. मीही कर्जतला उतरले, पण डोक्यात खरा श्रीमंत कोण, या विचाराने घर केले.
दुसऱ्या दिवशी निवांत बसले तर पुन्हा डोक्यात विचार सुरू झाला खरंच! कोणाला खरा श्रीमंत म्हणायचे? मग लक्षात आले, वर वर पाहता साधा विचार केला तरी श्रीमंतीची व्याख्या काळानुरूप बदलत असते. आता आमच्या लहानपणी खातेपिते घर म्हणजे श्रीमंत. दोन वेळचे जेवण व्यवस्थित मिळतेय, अत्यावश्यक गरजा भागल्या जाताहेत म्हणजे श्रीमंतच की.. माझे वडील तर म्हणायचे, ज्याच्या दारात चपला अधिक तो श्रीमंत. याचा अर्थ ज्याने माणसे अधिक जोडली आहेत तो श्रीमंत. पैशापेक्षा जोडलेल्या माणसांना अधिक महत्त्व होते. त्यानंतर रेडिओ, पंखे, टय़ूबलाइट आले. या वस्तू सामान्यांना घेणे अशक्य असायचे. म्हणून मग या गोष्टी ज्याच्याकडे तो श्रीमंत. मग फ्रिज, टेलिफोन, दूरदर्शन अशा एकेक सुविधा येऊ लागल्या आणि त्या ज्याच्याकडे त्याची गणना श्रीमंतांमध्ये होऊ लागली. मग महागडे मोबाइल आले. मग मोबाइलवाला श्रीमंत ठरू लागला. आता विचार केला तर मोबाइल, वॉशिंग मशीन, फ्रिज, दूरदर्शन मोलकरणीकडेसुद्धा असतो. मग काय तिला श्रीमंत म्हणायचे! मग बिचारी दुसरीकडे धुणं-भांडी कशाला करेल. या साऱ्या सुविधा अत्यावश्यक केव्हा बनल्या, जीवनाचा एक अंग केव्हा झाल्या कळलेच नाही. अशा प्रकारे श्रीमंतीची व्याख्या सतत बदलत गेली. त्यात चारचाकी वाहन, दोन-तीन बेडरूमचा आलिशान फ्लॅट अशी भर पडत गेली.
पण मला वाटते श्रीमंती काय पैशाअडक्यातच मोजायची का? ज्याच्याजवळ गडगंज पैसा आहे, पण कोणालाही काहीही द्यायची इच्छा नाही, तो कसला श्रीमंत? ताटातले अन्न कचऱ्यात टाकले जाते, पण एखादा भुकेला घास मागायला आला तर त्याला वाटेल तसे बोलून हाकलून दिले जाते, ही कसली श्रीमंती. आपल्या जवळचे काहीही, नुसता पैसाच नव्हे एखादी कला असेल, एखाद्या विषयाचे खरे सखोल ज्ञान असेल, काहीही विनामोबदला दुसऱ्याला देतो तो खरा श्रीमंत. घासातला घास दुसऱ्याला देणे ही खरी श्रीमंती; पण हल्ली दिखाऊ श्रीमंती वाढली आहे. पण श्रीमंती काय पैशातच मोजायची का? मनाची श्रीमंती तर दुर्मीळच झाली आहे.
जे काही माझ्याजवळ आहे ते नि:स्वार्थीपणे दुसऱ्याला देणे ही खरी श्रीमंती. मग ती कशाचीही असो- ज्ञानाची, सेवेची, कलेची. जो नेत्रदान करतो, रक्तदान करतो, नि:स्पृहपणे जनतेची सेवा करतो तोच खरा श्रीमंत असे मला तरी वाटते.
राजश्री खरे – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा