हिवाळ्याचे दिवस होते. डिसेंबर सुरू झाला, की अधिकच थंडी वाढते. म्हणून मी छोटी लोखंडी शेगडी विकत घेतली. सोबत लाकडी कोळसेही घेऊन आली. एक दिवस जास्तच थंडी वाटायला लागली म्हणून शेगडीत कोळसे घातले आणि ती पेटवली. माझा लहानगा बाहेरून खेळून आला होता. शेगडीतले निखारे धगधगीत पेटल्यावर मी एका छोटय़ा पातेल्यात वाटीभर तांदूळ धुऊन ते शेगडीवर ठेवले आणि आम्ही सगळे शेगडीभोवती हात शेकत बसलो. शहरातच जन्मलेला माझा मुलगा, शेगडी, निखारे कधी त्याने पाहिले नव्हते, मध्ये मध्ये प्रश्न विचारीत होता, हे काय ठेवलेस शेगडीवर? भाताला उकळी आली ते बघून त्याला फार कुतूहल वाटत होते. तो एकसारखा त्या पातेल्याकडे बघत होता. उकळी थांबली, पाणी आटायला लागले, तसे त्यावर झाकण ठेवले. म्हणाला, काय केलेस आई? म्हटले, थांब जरा वेळ, खायलाच देते तुला.
आम्ही सगळे त्याची गंमत बघत होतो. भात शिजला तसे मी पातेले खाली उतरवले आणि झाकण काढून त्याला दाखवले. म्हटले, बघ तुझ्यासाठी भात केलाय. तो ओरडलाच, हा भात आहे? शेगडीवर भातपण शिजतो? बाप रे, काय मस्त! मी मित्रांना सांगतो. त्याचे आश्चर्यमिश्रित आनंदाचे भाव बघून आम्हाला खूप मजा वाटत होती. नंतर त्याला सविस्तर समजावून सांगितले की, गॅस शेगडीचा शोध लागण्यापूर्वी असाच शेगडीवर किंवा चुलीवर लाकडांचा उपयोग करून ‘अग्नी’ निर्माण करून अन्न शिजवले जायचे वगैरे. आदिमानवापर्यंतचा इतिहास त्याच्यापुढे मांडला. तो अगदी कुतूहलाने ते सर्व ऐकत होता. त्याला गंमत वाटत होती. मला मात्र जाणवले ते असे की, प्रत्येक पिढीचे काही तरी देणे लागते. आधीची पिढी, आधी लागलेले शोध हे पुढच्या शोधाचे जनक असतात.
गरज ही शोधाची जननी आहे. तहान लागली की माणूस वाळवंटातही पाणी शोधून काढतो. मला आठवते, नवीनच गॅसच्या चुलींचा वापर करायचा टप्पा सुरू झाला होता. आमच्या कॉलनीत एका फॅमिलीकडे ते खरेदी केले होते, तेव्हा माझी आई, मी, बाकी शेजारच्या बाया असे सगळे मिळून आम्ही ती गॅसची शेगडी बघायला गेलो होतो. ती कशी सुरू करायची, त्यावर पातेले कसे ठेवायचे वगैरे सर्व त्या काकूंनी सांगितल्यावर ते आपल्या घरी घ्यायचे की नाही, धोकादायक तर नाही वगैरे चर्चा झाली होती, तसेच मग कुकरविषयी, त्यात वरणभात एकाच वेळी शिजतो याचे केवढे कौतुक, कारण त्यापूर्वी ते वेगवेगळे दोन चुलींवर शिजवायला लागायचे, वेळ लागायचा, इंधन जास्त लागायचे. हे सर्व वाचते याचा केवढा आनंद आणि शिट्टय़ांचा आवाज ऐकून रडणारे मूल थांबायचे असे खेळणेच झाले होते आणि टी.व्ही.चे तर विचारूच नका, सगळ्यांनी मिळून एकाच संचासमोर तेही शेजाऱ्यांच्या ‘रामायण’ बघण्याची मजा माझ्या पिढीने अनुभवली आहे.
आमच्या लहानपणी आम्ही शाईची दौत आणि टांक (लांब टोकाची निप असलेले लाकडी निमुळते पेन) घेऊन शाळेत जायचो, येताना शाईचे डाग पडलेले कपडे बघून आईने दिलेला मारही आठवतो, आजचे जेल पेन बघून गंमत वाटते.
विहिरीचे पाणी काढताना होणारी कसरत, दूरवर असणारे आठवडी बाजार, त्यामुळे पायी चालण्याने होणारा व्यायाम, ज्यामुळे दणकट झालेली शरीरयष्टी, डोक्यावर आठ पायल्यांचे (एक कुडव), गहू दळणाकरिता चक्कीवर (गिरणी) न्यायचे, आणायचे, त्यामुळे मानेला आलेला डौलदारपणा, मजबूत झालेला पाठीचा कणा, आजच्या पिढीला त्याच अॅक्शन करायला सांगणारे फिजिओथेरपिस्ट किंवा आथरेपेडिक सर्जन सांगतात तेव्हा लक्षात येते की, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही घरगुती कामे किती आवश्यक आहेत, त्याच्या अभावी या पिढीला होणारे त्रास, वेगवेगळे आजार बघून काळजी वाटते आणि वाटते मॉडर्न, आधुनिक म्हणजे तरी नेमके काय?
आज विमानात बसल्यावर सगळे आठवले, माझ्या लहानपणी बैलगाडीतून जाताना, बैलांच्या घुंगरांचा आवाज मंत्रमुग्ध करायचा, पण ढगातून विमान जाताना होणारा आवाजही कुतूहल जागृत करतो आहे.
वाटले माझे वडील गाव सोडून नोकरीनिमित्त शहरात आले नसते, तर मला ही झेप (विमानप्रवास) घेता आली असती का? मागच्या पिढीतील व्यक्तींनी धाडस दाखवल,े की पुढच्या पिढीला मार्ग सुकर होतो. काहींना ते जमते, लवकर निर्णय घेणे, काहींना उशिरा कळते किंवा बदल स्वीकारायला वेळ लागतो एवढेच.
बदल होताना मध्ये संधी असतो, जसा दोन ऋतूंमधला संधी म्हणजे थोडा आधीच्या ऋतूचा असर, थोडा पुढच्या ऋतूचा असर, त्यामुळे तो सुखद काळ असतो, तसेच काहीसे पिढय़ांचे आहे. पुढच्या तरुणाईला बघताना मागच्या वृद्धांना विसरून चालत नाही, प्रत्येक पिढी हेच तर करत असते, मागचा धागा पकडून पुढे जायचे.
वडील, काका, मामा पतंग उडवायचे म्हणून मी शिकलो पतंग उडवायला, आई, काकी, मामी रांगोळी काढायच्या म्हणून मी शिकली रांगोळी काढायला, पण कंप्युटर, मोबाइल आला नि सर्व जगच बदलून गेले असे वाटते. पण हा मार्ग दाखवला कोणी? तुमच्यासाठी मागच्या पीढीनेच ना? मी येतोच ना प्रत्येक युगात मार्ग दाखवायला, यालाच म्हणतात संभवामी युगे युगे.
डॉ. मंगला ठाकरे, नागपूर – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा