कधी खुळं, कधी शहाणं, कधी भाबडं, कधी कलंदर. आपल्याशी सतत बोलणारं, तरीही कधीच नीटसं न कळणारं, मन आपलं.

हे मन कधी आपल्यालाच शिकवणार केव्हा काय बोलावं आणि कधी आपल्या डोळ्यांतून जे बोलायचं नव्हतं तेही बोलून जाणार. कधी व्यक्त होणार अव्यक्तामधून, तर कधी अवजड-अवघड शब्दांतून. कधी अश्रूंतून, कधी हास्यातून, कधी स्पर्शातून, पण व्यक्त करणारंच ते आपल्या भावना, कधी आपल्या संमतीने, तर कधी आपली परवानगीही न घेता. कधी आपल्याच चेहऱ्याला खुशाल स्वत:चा आरसा करणार, तर कधी कोणा दुसऱ्याच व्यक्तीला स्वत:चा कवडा करणार, आपल्याला न विचारता. कधी हक्क सांगणार आपल्यावर, तर कधी वागणार अगदी अनोळख्यासारखं. मनच ते, त्याला काय बोलणार?

मनाचं म्हणणं आपण तरी किती वेळा ऐकतो, म्हणून ते आपलं काही ऐकणारे? मनच ते, असंच वागणार बंडखोरपणे. त्याचं ऐकलं नाही म्हणून कधी आपल्यावर रुसणार, तर कधी शिक्षा करणार आपल्याला त्याचं न ऐकल्याची. पडतं शेवटी आपणच घेणार आणि दु:खही होणार आपल्यालाच, त्याला न जुमानल्याचं. मनच ते, त्याच्याशी कोण वाद घालणार?

कधी चूक-अचूकमधला फरक अगदी विशद करून सांगणार आपल्याला, तर कधी चूक-बरोबर असं काहीच नसतं, म्हणून आपल्याला गोंधळात टाकणार. कधी चांगल्याची कास धरायला शिकवणार आणि आपला चांगुलपणावरचा विश्वास दृढ करणार, तर कधी अन्याय गोष्टींमुळे हताश होणार आणि आपल्यालाही निराश करणार. काळ्या-पांढऱ्याच्या मधल्या सर्व रंगछटा दिसत, जाणवत असतानाही आपल्याला संभ्रमात टाकणार, त्यांना ओळखताना. पण मनच ते, त्याला कोण समजावणार?

कधी दूर एखाद्या स्वप्नांच्या गावात घेऊन जाणार तर कधी एखाद्या खोल अंधाऱ्या गर्तेत. कधी त्याला शोध लागणार कोणाचा आणि मग आपल्यालाही वेडं करणार ते, त्याच्यासवे. तर कधी एखाद्याच्या मागे वाहावत जाणाऱ्या आपल्याला कान पकडून मार्गावर आणणार, हे मनच. कधी कोणासाठी उगाच झुरणार, आपल्यालाही झुरवणार. कधी एखाद्या स्वप्नावर स्वार होणार, हिंदोळणार एखाद्या कल्पनेला उरी घेऊन आणि आपल्यालाही झुलवणार. तर कधी आपण आनंदाने झोके घेत असताना कठोरपणे थांबवणार आपल्याला. आपल्या आतली सकाळ त्याच्या उगवण्याने, उल्हसित होण्याने उजाडणार आणि त्याने मावळतीचे सूर लावले तर आपल्या आतही पसरणार कातर संध्याकाळ. आपल्या भावना, त्यांची उत्कटता, आणि त्यांचं व्यक्ताव्यक्तपण ठरवणार हे मनंच. आपली इच्छा असो वा नसो, आपल्याला ओढत नेणारच ते, त्याच्या मागे मागे, त्यानेच निर्माण केलेल्या एखाद्या नव्या जगात. मनच ते, असंच वागणार.

कधी भरकटणार, हरवणार, मग शोधून आणणार स्वत:साठी, आपल्यासाठी, एखादं भन्नाट स्वप्नं, एखादी नवीन कल्पना, एखादा वेगळा विचार किंवा आणखी काही. मग नुकत्याच हाती लागलेल्या खेळण्यासारखं घट्ट धरून बसणार त्या कल्पनेला, त्याच्याशी खेळणार, त्याला अनेक रंगांनी रंगवणार, त्याला दिशा देऊ  पाहणार, त्याला शब्दांत वा चित्रात मांडू पाहणार. कधी ती कल्पना निसटलीच त्याच्या हातून, तर पुन्हा त्याच्यामागे धावणार हे मन, अस्वस्थपणे. त्याच्या मागे मग आपणही पळणार, हातचं सगळं सोडून. आपली दमछाक नाही केली तर मग मन कसलं ते.

कधी दीनवाण्या भावाने आपल्याकडे पाहणार, त्याच्या समस्या आपण सोडवाव्यात या आशेने. आता त्याच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे कोठून असायला? तरीही ते खुळ्यासारखं आपल्याचकडून करणार उत्तरांची अपेक्षा. जणू काही त्याला माहीतच नाही की आपल्याला पडलेले सगळे प्रश्न ही त्यानेच घातलेली कोडी आहेत आणि आपल्याला गवसलेलं सारंही आहे त्यालाच सुचलेलं, उमजलेलं काही.

आठवणींची ओझी वाहून थकलेल्या मनाकडे पाहून कधी आपल्यालाच वाटणार सगळ्या आठवणी पुसून टाकाव्यात आणि हलकं करावं त्याला. पण साऱ्या स्मृती त्याच्या मालकीच्या असल्यासारखं वागणार ते. काही जपलेल्या, काही न विसरता आलेल्या, पण त्या फक्त त्याच्याच. त्या आठवणींनी हळवंही होणार ते, आणि ‘त्यांना विसरणं शक्य नाही’ असंही म्हणणार हट्टीपणे. मनच ते, त्याचा हट्ट कसा मोडणार?

स्वत:ला मोकळं केल्यानंतरही ते रिकामं होईलच असं नाही, नाहीच होणार. भरणं हा तर त्याचा स्थायीभाव. ते कधी जमवणार तरल कल्पनांचे त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारे ढग, तर कधी गडद अन् जडसे, त्यालाही न पेलणारे. आभाळासारखंच या मनाचं रूप आणि स्वभावही. कधी अंगभर लख्ख प्रकाश लेवून तेजोमय होणार, कधी वेदनेतूनही चांदणं फुलवणार. कधी एकच रंगछटा माखणार अंगाला, तर कधी करणार सातही रंगांची मुक्त उधळण. त्याच्या एखाद्या तुकडय़ाला आपण त्याचं अवघं अस्तित्व मानणार आणि त्याला त्याच्या पूर्ण रूपात पाहण्यासाठी जन्मही नाही पुरणार आपल्याला.

या अबोध अशा मनाचा चेहरा धुसरच राहणार नेहमी. अन् त्याचा आवाज दर वेळी ऐकू येईलच असं नाही. त्याची खरी ओळख कायम पुसटच राहणार. त्यानंच आपल्याला ओळख दिलेली असूनही, आपण त्याला कधीच पुरतं नाही ओळखणार. ते नेहमीच राहणार अनाकलनीय. पण मनच ते, हे त्याला कसं कळणार?
मनाली ओक – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader