अरे काय मस्त डॅशिंग दिसतो तो, किती स्मार्ट हॅण्डसम आहे ना तो, छान दिसते ना ती, काय भारी दिसते ना यार ती.. ही रोजची.. किंबहुना नेहमीची वाक्यं कानावर पडतात. तसं बघायला गेलो तर सर्वत्र आपण प्रेम शोधत असतो. पण आपण हेच विसरलो की ज्या विधात्याने आपल्याला जन्म दिला त्यानेच आपल्याला जन्मावेळीच एक मोठी गोष्ट पटवून सांगितली ती म्हणजे प्रेम.
‘प्रेम हे आंधळं असतं’ हे त्याने आपल्याला पटवून सांगितलं, किंबहुना दाखवून दिलं ते आईच्या रूपात. आपण हे जग बघण्याआधी.. या वैभवशाली.. आपल्या धकाधकीच्या जीवनाचा ओघ सुरू होण्याआधीच त्याने आपल्या मोकळ्या हातात तो एक मायेचा हात दिला. तो म्हणजे आईचा हात.
आपल्या बाळाचा चेहरा पाहण्याआधीच तीच ते आपल्या बाळावर असलेलं निरागस नितांत प्रेम याचं उत्तम उदाहरण आहे की, ‘प्रेम हे आंधळं असतं.’
आपल्या अस्तित्वाची ओळख करून देणारी, आपल्याला आपल्या सावलीची ओळख सांगणारी ही आईच असते. लहाणपणापासून ते मोठे होईपर्यंत आपण काय आहोत.. कसे असायला पाहिजे याची काळजी नेहमी तिला असते.
या समथिंग इज मिसिंग वाक्यातील आय किती महत्त्वाचा असतो ना.. तसंच आपलं जगणं.. आपलं असणं केवळ आपल्यासाठी नव्हे तर तिच्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचं आहे हे ती नेहमी पटवून सांगते.
मला नेहमी हाच प्रश्न पडतो की देवाने आईमध्ये ऐवढी ममता, माया का दडवून ठेवली आहे. ती अशी का आहे? तिला नक्की असे का बनवले आहे? हा प्रश्न मी जेव्हा जेव्हा तिला विचारते तेव्हा तेव्हा एकच उत्तर मिळते की ‘‘तू आई होशील ना तेव्हा तुला समजेल.’’
तसं तर आतापर्यंत साऱ्यांनीच ‘आई’विषयी खूप काही लिहिलेले आहे. मी वेगळं काय लिहिणार. माझे फक्त शब्द वेगळे असतील. वाक्यांची मांडणी वेगळी असेल.
म्हणून शेवटी एकच सांगावसं वाटतं..
‘‘माझ्याविषयी सांगताना तुझा विसर होणे हे शक्य नाही आणि तुझ्या उल्लेखाशिवाय माझी ओळख होणे हेही शक्य नाही.’’
भारती ठोंबरे – response.lokprabha@expressindia.com