खूप महिन्यानंतर खरं तर वर्ष भरा नंतर सकाळी फेरी मारायला गेले. एका घडय़ाळामुळे मला लवकर उठावं लागलं. तुम्हाला वाटेल घडय़ाळाचा गजर लावून ठेवल्यामुळे जाग आली, कारण सर्वसाधारणपणे सगळेच जण घडय़ाळाचा गजर लावून उठतात, पण माझ्या बाबतीत तसं घडलं नाही.
माझी झोप आणि कुठल्याही प्रकारचा आवाज यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. माझ्या रूम मेट्ने आदल्या दिवशी भिंतीवरचं घडय़ाळ आणलं; त्या घडय़ाळाचा सेकंद काटा एवढा आवाज करत होता जणू त्यांनी माझा काटा काढायचं ठरवल होतं. ते घडय़ाळ मला चिडवत होतं. सारखं मला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतं आणि सांगत होतं, ‘मी आलो आहे तुझी शांतता भंग करायला. तुला त्रास द्यायला. ते रूममध्ये आल्यापासून त्याला रूममधून बाहेर काढण्यासाठी डोक्यात वेगवेगळ्या योजना आखत होते. ते जर रूममध्ये राहिलं तर मला रूममधून बाहेर पडावं लागेल असंच मला वाटत होतं. रात्री झोपताना खूप जोराचा पंखा लावून ठेवला ज्यामुळे आवाज येणार नाही. ही मात्रा लागू पडली, मी विजयी मुद्रेने घडय़ाळाकडे बघून झोपी गेले. पण पहाट होताच रूम मेट्ने पंख्याचा वेग कमी केला आणि पुन्हा घडाळ्याचा आवाज सुरू झाला. मी घडय़ाळाकडे रागानेच बघितलं, घडय़ाळ माझ्याकडे बघून विजयी मुद्रेने हसून बघत होतं.
रागातच उठले आणि फेरफटका मारून आले. नेहमीचं आवरून वाचनाकडे वळाले तर हे आपलं दात काढून हसत होतं आणि माझं लक्षपण सारखं त्याच्याकडे जात होतं. कसा आवाज बंद करायचा कळतंच नव्हतं. पुस्तक बाजूला ठेवलं . असं वाटत होतं, सरळ घडय़ाळाला ओढतच खाली आणावं आणि तसंच्या तसं बाहेर फेकून द्यावं, पण तसं मी करू शकत नव्हते. कारण घडय़ाळ माझं नव्हतं. त्याला नीट बघितलं. आवाज बंद होण्यासाठी कुठला मार्ग दिसत नव्हता. हार मानून त्याच्या जागी ठेवलं.
डोक्यात विचार आला आवाज न करणारं घडय़ाळ आणावं किंवा सेकंद काटा नसलेलं घडय़ाळ आणावं आणि त्याच्या जागी त्याला ठेवावं. पण हे सगळं करण्यासाठी रूम मेटला तयार करायचं काम होतं. मग वाटलं कानात कापूस घालून ठेवावा, त्यानं आवाज येणार नाही. तेही करून बघितलं. तरी घडय़ाळ जोरजोरात आवाज करत होतं. एक-दोन वेळा रूम मेटला, ‘या घडय़ाळाचा आवाज किती आहे? कानाजवळ भुंगा आवाज करत आहे असं वाटतं,’ असं बोलून दाखवलं, पण तिने विशेष लक्ष दिलं नाही. थोडय़ा वेळाने लक्षात आलं कानामध्ये घालण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे हेडफोन मिळतात, ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही. संध्याकाळी जाऊन आणायचं ठरवलं. या सगळ्याच विचारात पुस्तक वाचायचं राहून गेलं. मी प्रयत्न करूनसुद्धा माझं लक्ष इतर कुठल्याही कामात लागत नव्हतं. दुपारी जेऊन थोडा वेळ झोपायचं ठरवलं, पण झोप कशी लागणार. कारण मोठं होतं घडय़ाळ! मनात विचार आला पुन्हा रूममेटला विचारावं, ‘घडय़ाळचं काही करता येईल का? मला खूप त्रास होतो. मी कुठलंच काम करू शकत नाही.’ आणि मी विचारताच या वेळेला तिनं माझं ऐकलं आणि थोडय़ा वेळात घडय़ाळ भिंतीवरून खाली उतरून कपाटात बंदिस्त झालं. मी त्याला बंदिस्त केलं. मी जिंकले.
पण मी खरंच जिंकले होते आणि घडय़ाळ हरलं होतं. घडय़ाळाचा आवाज हा त्याचा दोष होता का मला आवाज सहन होत नव्हता हा माझा दोष होता. घडय़ाळाच्या आवाजाचा मला इतका का त्रास होत होता? का मनुष्याचा स्वभाव असतो एखादी गोष्ट आपण नाही सहन करू शकत नाही. ज्या विशिष्ट गोष्टीकडे फार लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं तरी आपलं लक्ष त्या गोष्टीकडे असतं. जसं शरीराच्या कुठल्याही भागाला जरा जरी खरचटलं तरी आपलं लक्ष त्या दुखापत झालेल्या भागाकडे जातं. अगदी सांगायचं झालं तर दातामध्ये अडकलेला अन्नकणसुद्धा आपल्याला त्रास देणारा ठरतो. या सगळ्यांची कारणं काही असू दे. सवय नसते, सहन होत नाही. आपण मानसिकदृष्टय़ा त्याच गोष्टीचा विचार करत असतो इत्यादी.
सध्या तरी मी खूश आहे घडय़ाळापासून मी माझी सुटका करून घेतली आहे. घडय़ाळाचा त्रास मला होत होता हे जरी खरं असलं तरी एका घडय़ाळाने मला विचार करायला भाग पाडलं हेही तितकं खरंच. घडय़ाळ महाराज तुमचे खूप खूप आभार.
response.lokprabha@expressindia.com