बासरी वाजवत इथून कोण गेलं? दिशा ओलांडून अनोळखी ग्रहापर्यंत जाणाऱ्या बाहुल्या कधी कधी कापरासारखं जळून जातात.. फुलांच्या पाकळ्या गळतात तेव्हा वाटतं, हे परीचे पंख तर नव्हेत?.. हे असंच का सुचतं? हे कुठून येतं?
रोज छातीत दुखतं म्हणणाऱ्या चिमण्या मुलीवर मरणाने ‘झडप’ घातली. तिच्या अस्तित्वाचा अर्थ-अनर्थ कसा लावायचा? उन्हात बांधलेल्या माझ्या घरात तिची चिमुकली सावली तेवढी आठवणीत उरली. आठवणींची शोकेस म्हणजेच ललित लेखन ना बाप्पा!
वाऱ्यावरचं भूत कुणासाठी बासरी वाजवत असेल? पिशाच्चही कुणाच्या प्रेमात निथळत असतं का? पण उनाड कलाकार वाऱ्यासाठी आपली कोमल मुलगी कोण वाऱ्यावरच सोडेल? पंख माहेरी विसरून गेलेली एखादी फेअरी नंतर कधी भेटत नाही, की दिसत नाही. खूप वर्षांनंतर आता बघावं, तर तिची चल रे भोपळ्यावाली टुणुक् टुणुक् म्हातारी झालेली असते.
सावरीच्या कितीतरी पांढऱ्या फेक म्हाताऱ्या दापोलीतून उडत निघाल्या होत्या. होय, मी पाहिल्या. त्यांना ‘निरोप’ दिला. अगदी ‘समारंभ’ केला नाही. हातातला रुमाल हलवला. पण इतक्या साऱ्या कापूसकोंडय़ा डोकऱ्या कुठं उतरतील? त्यांना कोण थारा देईल? त्यांचा गाव तरी कुठला? माझा गाव कोणता? विद्रोही, बंडखोर माणसाला भ्रष्ट व्यवस्था कितीसं स्पेस देणार? तीन माणसं येऊन बसली, तर माझी पिटुकली खोली भरते. चौथा इसम उभाच राहतो.
रात्री मला शेंडे नक्षत्र आपल्या या प्रदूषित ग्रहाच्या अगदी जवळ येऊन गेल्याचं कळलं. त्या पिसाटासाठी मी काही पत्रकार सहकाऱ्याची मोठी दुर्बीण मागून आणली नाही. उनाड बायकोबरोबर रागावलेला नवरा नुसताच घरात डोकावून जावा, तिला स्पर्शही करू नये तसा तो तापट धूमकेतू वाटतो. ‘एका स्फोटातून या विश्वाची निर्मिती झाली’ असं सायन्सचे आमचे केतकर सर म्हणाले, तेव्हा मी पटकन म्हटलं. ‘तो कुणाचा घटस्फोट होता?..’
आता आसपास वडाचं धड झाड शिल्लकच नाही, पण मनात मात्र जुन्या पारंब्या अजून बऱ्याच आहेत. माझं बालपण खोडय़ा काढणाऱ्या गॉबलिनसारखं होतं. रसाळ फेअरीटेल कधी पिकली कळलंच नाही. घमघमाट सर्वदूर गेला हे मात्र खरं. कोकणातल्या काही खतरूड लोकांनी मला खचवण्याचे सर्व प्रयत्न केले. ‘पत्रकार’ म्हणून माझा कुठंही उल्लेख होऊ द्यायचा नाही. हा त्यातलाच एक नमुना. इतरांचं क्रौर्य, तीव्र मत्सर आणि गद्दारी मी कशी काय झेपवली? कारण प्रत्येक गोष्ट मी हसण्यावारी न्यायचो आणि पुन्हा परिकथा लिहायचो.
मी एक पंख लाभलेला मुलगा होतो. कुस्ती करणाऱ्या दर्याच्या उफाळ लाटांकडे कानाडोळा करत मी वाळूतले छोटे, रंगीत शंखशिंपले गोळा करायचो. मग घरी प्रेमाने सांभाळलेल्या स्वप्निल माशांसाठी काचेच्या मत्स्यघरात तो खजिना नीट मांडून, सजवून ठेवायचो. माशांकडे बघत बसलात, तर रक्तदाबही आटोक्यात येईल. सतत हालचाल करणारी ही मंडळी म्हणजे पाण्यातल्या यक्षपऱ्याच नाहीत का?
कधी कधी एखादा ‘डोडो’सारखा गबाळा मुलगा सांभाळून मी त्याला हळूहळू स्मार्ट बनवायचो. कालांतराने तो ओव्हरस्मार्टही बनायचा, पण त्याचं मी केलेलं मधपाणी विसरायचा नाही. मी फार स्पष्टवक्ता आहे. परखडपणे लिहितो असं इतर वृत्तपत्र लेखकांना वाटते, पण ते कोकणातल्या फणसाचं वैशिष्टय़च आहे. रसाळपणा लगेच लक्षात येत नाही. पिकत जाताना मी माझी फळं विकत गेलो. कारण रोजगार म्हणून माझ्याकडे दुसरं साधन नव्हतं. मी लेखन करून जगतो म्हटल्यावर मराठी माणसाने मला वेडय़ात काढलं. तिथेच महाराष्ट्राचं सांस्कृतिक बिंग फुटतं. तुम्ही लेखकाला जगू देत नाही. तरी माझ्या गोष्टी मी सांगत गेलो. गरिबीत श्रीमंत झालो!
माधव गवाणकर –