काही नादमय आणि तितक्याच नाटय़मय रचना अविस्मरणीय असतात. कसलंही ‘सूक्ष्म संशोधन’ न करता, त्यांचा निव्वळ आस्वाद घेण्यात आणि आकाशवाणीवर ती काव्यरचना ध्वनिमुद्रित रूपात वाजू लागली की, कल्पनाचित्र डोळय़ांसमोर उभं करण्यात मला मनस्वी आनंद मिळतो. आजही मिळतो!
‘तू तर चाफेकळी’ या आशालता वाबगांवकरांच्या तेव्हाच्या रेशमी आवाजातलं तरल, तलम गाणं नेमकं हाच स्वप्निल अनुभव देतं. चाफेकळीचं नव्हे, आपलंही मन हरवतं!
‘ही चाफेकळी कोण असेल हो? म्हणजे बघा, बालकवींचं वय, तेव्हा किती असेल!.. आणि कळीचं.. असल्या चर्चा मी आणि माझे मित्र यांच्यात कधीच होत नाहीत. गाण्यावर फक्त डोलायचं असतं! गोविंदाग्रजांच्या बाबतीत तर एका ज्येष्ठ समीक्षकाने भलतंच ‘संशोधन’ जाहीर केलं होते. त्यांच्या कवितेत जिथं ७७७ आहेत. तिथं ज्यांची नावं असू शकतात, त्या मुली नसून स्त्री पार्टी मुल‘गे’ होते हे वाचल्यावर मी वाङ््मयीन संशोधनाचा धसकाच घेतला.
कुणी असंही म्हणेल की, कवीची निरागसता ही एक ‘पळवाट’ आहे. सौंदर्यवाद आणि सतत स्वप्नं पाहणं हा वास्तवाला नकार आहे. कुणाला अंतर्मनातील भयगंड व न्यूनगंड हे सभोवतीचं ‘गर्दरान’ च वाटेल. आम्हाला असलं काहीसुद्धा वाटत नाही. आम्ही सामान्य रसिक एके काळी कोवळय़ा वयाचे होतो आणि जिला आम्ही वनबाला मानलं. ‘भुलले तुजला हृदय साजणी’ अशी भावना बाळगली. तिला ‘ये चल माझ्या घरी’ असं आम्हीही म्हणालोच की! आमचं रंग जाऊन भंग झालेलं, पडायला आलेलं, गळणारं ते गोरेगावातलं जुनं घर पाहून ‘चाफेकळी’ पुन्हा तिथे कधी येत नसे आणि ‘बावीस रुपये भाडे’ आहे हे कळल्यावर तर माझ्याशी नंतर बोलतही नसे, पण म्हणून काय आम्ही चाफेकळीची स्वप्नं बघायचीच नाहीत! स्वप्नांवर टॅक्स नाही बा! ‘पाहत बसले मी तर येथे जललहरी सुंदर’ म्हणणारी ती चाफेकळी तिला भुलणारे रात्रीचे वनदेव एखाद्या सांगीतिकेत शोभतील असे छान आहेत. अशी कविता ‘अपूर्ण’ राहावी याचं फार दु:ख होत नाही. कारण ती अधुरी वाटत नाही. तसं परिपूर्ण, परिपक्व आयुष्य आम्हा सामान्य मराठी माणसांना लाभतच नाही. कायं चळवळी, संसार अर्धवट टाकूनच आमचे अनेक ‘सवंगडी कायमचे निघून गेले. म्हणूनच मित्रांनो रंजक, सोप्या गेय कवितांचं रंजन आम्हाला हवं आहे. गहन संशोधन करून आमचा हा दिलासा नाहीसा करू नका. तेवढा राहू दे की आमच्यासाठी!
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader