छोटय़ा नातवाने माथेरानहून एक सुरेख बेचकी आणली होती. प्रथमच पहिलेल्या त्या बेचकीचे तो खूप कौतुक करीत होता आणि मला पुन्हा पुन्हा तिच्याबद्दल बरंच काही सांगत होता. पण. पण मी मात्र ती बेचकी पाहिली आणि मनाने शालेय जगात पोहचले.

ठाकूरद्वारच्या शाळेत आम्ही नववीच्या वर्गात होतो. माझ्या वर्गात इंदू नावाची एक मुलगी आली आणि खास मैत्रीण म्हणून आमच्या ग्रुपमध्ये सामीलही झाली. इंदू स्वभावाने खूप छान होती. विशेष म्हणजे ग्रुपमध्ये ती जास्तच प्रेमळ होती. इंदू ग्रँटरोडच्या केम्स – कॉर्नरला राहत होती. वडिलांना ऑफिसचा नोकरी असेपर्यंत राहण्यासाठी छान फ्लॅट होता. एक-दोन वेळा आम्ही मैत्रिणी तिच्या घरी गेलोही होतो. इंदूच्या भावाचं लग्न होतं आणि तिने संध्याकाळी लग्नाला येण्याचं आमंत्रणही दिलं होतं. लग्नाला जाण्यासाठी आम्ही ग्रुपमधल्या सर्व जणी खूप खूश होतो.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

इंदूच्या घरी लग्नाची गडबड होती. काही विधी घरीच होणार असल्याने पाहुण्यांची वर्दळ हेती. घर हसण्या- खिदळण्यात रंगलं होतं. काही थोडी मोठी मुलं गच्चीवर जात-येत होती, दंगामस्ती करीत होती. त्यांच्या पाठोपाठ काही छोटी मुलंही गच्चीवर जाऊ लागली. त्यांना सांभाळायला पाहिजे या हेतूने इंदू सतत त्यांच्याबरोबर होती. तेवढय़ात एक लहान मुलगा खेळता खेळता पडला. त्याला उचलण्यासाठी म्हणून इंदू वाकली अणि काही समजायच्या आतच समोरच्या गच्चीतून पक्ष्याला मारलेला दगड बेचकीतून सुटला आणि पक्ष्याला न लागता इंदूच्या डोळ्याला चाटून गेला. काय झालं हे समजाच्या आतच गच्चीवर रक्ताचा पाट वाहू लागला. मोठी मुलं इंदूजवळ धावत आली आणि वाऱ्यासारखी बातमी लग्नघरात पोहोचली. हसण्या-खिदळण्याची जागा धावाधाव रडारडीने सुरू झाली. डॉक्टरांना बोलावणं गेलं आणि त्यांच्या सल्ल्याने इंदूला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सुरुवातीला गंभीर जखम नसेल असंच सर्वाना वाटत असताना कुणी तरी बातमी आणली की, इंदूच्या डोळ्याचं ताबडतोब मोठं ऑपरेशन करावं लागणार. झालं, इंदूच्या आईनं हंबरडाच फोडला. सगळ्यांच्या आनंदावर-उत्साहावर बोळा फिरला. सकाळपासून सुरू असलेलं ऑपरेशन दुपारनंतर संपलं. ऑपरेशन खूपच गंभीर स्वरूपाचं असल्याने इंदूला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं व कुणालाही तिला भेटण्याची परवानगी नाही, असं सांगण्यात आलं होतं.

संध्याकाळी आम्ही मैत्रिणी सजून-नटून हॉलवर गेलो. पण लग्नाचा हॉल वाटतच नव्हता. एका कोपऱ्यात इंदूची आई रडत होती आणि तिच्या भोवती नातेवाईकांची गर्दी व गराडा होता. आम्ही इंदूला शोधत होतो. तेवढय़ात कुणाकडून तरी समजलं की, इंदू हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्या डोळ्याला इजा झाली असून ऑपरेशन केलं गेलं आहे. बस इतकंच कळलं होतं. स्टेजवर इंदूचा भाऊ दु:खी चेहऱ्याने उभा होता आणि नाइलाजास्तव लोकांशी बोलत होता.

बरेच दिवस झाले इंदू शाळेत येत नव्हती. त्या वेळी फोनची सोय नव्हती. त्यामुळे काहीच कळत नव्हतं. तिच्या घरून कुणी तरी शाळेत येऊ गेलं होतं म्हणे, पण आम्हाला काहीच पत्ता नव्हता. काहीच खबर न मिळाल्याने आम्ही मैत्रिणींनी तिच्या घरी जाण्याचा विचार केला आणि एक दिवस आम्ही तिच्या घरी गेलो. घरी फक्ततिची वहिनी होती. रडत रडत तिने आम्हाला सर्व कहाणी सांगितली. समोरच्या गच्चीतून एक वात्रट मुलगा नेहमीच म्हणे पक्ष्यांना बेचकीने घायाळ करीत असे. आज दुर्दैवाने इंदू घायाळ झाली होती. ऐकलेली गोष्ट म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. आम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्याचं ठरवत असतानाच तिची वहिनी म्हणाली, कुणालाही तिला भेटण्याची परवानगी नाही. कारण ऑपरेशन खूप मोठ्ठं होतं. इंदूला जवळजवळ महिना-दीड महिना तरी हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. म्हणूनच इंदूला न भेटताच आम्ही परतलो. इंदूचं घर लांब असल्याने वरच्या वर तिच्या घरी जाणं त्या काळी जरा कठीणच होतं. एकदा तिचे वडील मुख्याध्यापिका मॅडमना भेटून गेले होते, पण आम्हाला खूप उशिरा कळल्याने संपर्क साधता आला नाही. फक्त मॅडमकडून एवढंच कळलं होतं की इंदूचा एक डोळा निकामी झाला होता व दुसऱ्या डोळ्यावर ताण पडू नये म्हणून ती शाळेत येऊ शकत नव्हती.

चार-पाच महिन्यांनी आम्ही पुन्हा एकदा इंदूच्या घरी गेलो, त्या वेळीही इंदू एका खोलीत शांत पडून होती. इंदूच्या आईने आम्हाला इंदूच्या डोळ्याबद्दल आणि ऑपरेशनबद्दल बरंच काही सांगितलं, आणि म्हणाली, आता तिला काचेचा डोळा बसविला आहे. फक्त शोभेसाठी! तुम्ही तिला भेटा पण तिला दु:ख होईल असं काही बोलू नका, रडू नका. जितका धीर देता येईल तितकंच बोला. आम्ही इंदूच्या खोलीत गेलो खरं, पण पक्ष्याच्या डोळ्यासारखा दिसणारा तो भयाण डोळा आम्हाला पाहवेना. डोळ्यातले आसू लपवून खोटंखोटं हसून मोठय़ा कष्टाने आम्ही घरी परतलो. ‘त्या मुलाचा’ तो खेळ इंदूचं सगळं आयुष्यच बरबाद करून गेला.

इंदू पुन्हा कधीच शाळेत आली नाही. काहीच संपर्क साधता न आलेल्या इंदूची काहाणी आमच्यासाठी तिथेच संपली. ती कुठे गेली? कशी जगली? काही पत्ता लागला नाही. अकरावी झाली. मॅट्रिकची परीक्षा झाली आणि शाळेच्या आवारात घडलेल्या बऱ्याच गोष्टी आठवणीत राहिल्या. त्यातलीच ही एक अविस्मरणीय कहाणी! बेचकी पाहिली की, अंगावर शहारे येतात, काचेचा डोळा आठवतो. एकदा माझ्या मुलाने कुठून तरी बेचकी आणली होती, पण ती मी त्याच्या नकळत लपवून ठेवली आणि आता नातवाने बेचकी आणली, दहा-अकरा वर्षांच्या त्या नातवाला या बेचकीबद्दल मी काय सांगणार होते! तंद्रीतून बाहेर पडल्यावर एवढंच म्हणाले, ‘‘बेचकी छान आहे पण घातक असते ती. म्हणून तुझी काही ठेवणीतली खेळणी जपून ठेवली आहेस ना त्यातच तिला ठेव. वापर मात्र करू नकोस.’’
हेमलता धोंडे – response.lokprabha@expressindia.com