‘मना सज्जना एक जीवी धरावे।
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जगी आपुले हित तुवा करावे॥’
समर्थ रामदास स्वामींनी मनाला ‘सज्जन’ म्हणून अगदी आंजारून गोंजारून उपदेश केला आहे. अरे बाबा मना, तू सज्जनासारखा वाग. आपले हित बघ. तू चांगला वाग. कुणाचं वाईट करू नकोस. लहान मुलाला आईने शिकवावे तसे रामदास स्वामींनी मनाला नाना परीने सुसंस्कारांचा उपदेश केलेला आहे.
पण एवढा उपदेश करून मन ऐकतं का? मुळात मन हे इंद्रिय तरी आहे का? तर हो. मन आहेच. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेय, ‘वाणी, स्पर्श, रूप, रस आणि गंध’ या पंचेंद्रियाबरोबरच ‘मन’ हे सहावे इंद्रिय आहे आणि हे मन आपल्या अस्तित्वाची जाणीव क्षणाक्षणाला करून देत असतंच, नव्हे ते तर आपल्यावर सतत सत्ता गाजवीत असतं. मग, हे असं अधिराज्य गाजविणारे मन आहे तरी केवढं? तेव्हा बहिणाबाई चौधरी सांगतात,
मन केवढं केवढं।
जसा खसखसीचा दाना।
मन एवढं एवढं ।
यात आभाळ माईना॥
अशी या मनाच्या आकाराची कल्पनाच येऊ शकत नाही. पण या मनाची भरारी मात्र अमर्याद आहे. कधी ते हृदयात लपतं तर कधी ते आकाशी उंच भरारी घेतं. अशा या धावणाऱ्या मनाला कवी सौमित्र काकुळतीने विनवतात आणि म्हणतात,
माझिया मना। जरा थांबना।
तुझे धावणे। मला वेदना॥
वेदना देणे हा तर मनाचा स्थायिभाव आहे. तसंच बेफाम धावणे हाही त्याचा स्वभाव आहे. त्याचं धावणं कोणीही थांबवू शकत नाही. याची साक्ष संत तुकाराम महाराजांचा हा अभंग देतो.
‘मन माझे चंचल।
न राहे निश्चल।
घडी एक पळ।
स्थिर नाही॥’
आणि जीवन विद्या मिशनचे वामनराव पै म्हणतात,
‘मन चंचल चंचल।
त्याला कसे आवरावे।
नाम जिभेवर येता।
मन विठोबाचे व्हावे॥’
असं हे अर्निबध धावणारे मन प्रसंगी उदास होतं. दु:खात दु:खी तर सुखात सुखी होतं. पण कधी कधी अति सुख मिळालं तरी दु:खी होतं. ‘शाकुंतल’ नाटकात दु:ष्यंताची भेट झाल्यावर आनंदित झालेली शकुंतला म्हणते,
‘अरे वेडय़ा मना तळमळसी
उगीच का असा हळहळसी.
ऐन सुखाच्या समयी भीति.’
मन हे बुद्धीच्या ताब्यात कधीच नसतं. तसंच वृथा चिंता करणं हा मनाचा स्थायिभाव आहे. कुठेही, केव्हाही आणि कशाचीही काळजी केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. वास्तविक चिंता केल्याने जे होणार असतं ते चुकत नाही; पण हे मनाला समजवायचं कसं? समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
‘मनी मानसी व्यर्थ चिंता वाहते।
अकस्मात होणारे होऊनी जाते॥’
चिंता सोडून मनाने सुखाचा शोध घेतला पाहिजे. पण सुख हे नेमके कशात आहे. हे मनाला ठाऊकच नसते. मनात नेहमी सुख आणि दु:ख यांत द्वंद्व सुरू असते. जे हवं ते मिळालं की, मन सुखी होते आणि हवं ते मिळालं नाही की, मन दु:खी होतं. अशी मनाची ‘सी-सॉ’सारखी केविलवाणी अवस्था सतत होत असते. आजचं सुख हे उद्याचं दु:ख असूं शकतं हे मन समजून घेत नाही. जगात सुख हे क्षणभंगुर आहे, ते मृगजळ आहे हेही मनाला उमगत नाही. मनाचा हा अविचारी छळवाद नि हेकेखोरपणा सतत चालूच असतो. म्हणूनच मनाचे हित कशात आहे हे सांगताना समर्थ मनाला बोध करतात,
‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे॥’
तरीही मनाचे मनोव्यापार कधी थांबतच नाहीत. ते चोवीस तास अव्याहतपणे काम करीत असते. मनाच्या या ताणतणावाचे परिणाम आपल्या शरीरावर देखील होतात. अनेक आजारांचे कारण मानसिक तणाव हेच असतं. म्हणून आजकाल त्यासाठी अनेक नवनवीन उपाय योजले आहेत. हे अवखळ मन शांत राहावे यासाठी योगा, ध्यानधारणा अशा विषयाच्या अनेक कार्यशाळा निघाल्या आहेत. पाश्चिमात्य देशातही ‘द माइन्ड एम, माइन्ड वर्कशॉप’सारखे मनाच्या व्यायामाचे अनेक प्रकार निघाले आहेत. असे असले तरी आपल्या आणि पाश्चिमात्य मनासंबंधीच्या विचारप्रणालीत मात्र फरक आहे. पाश्चिमात्य मानसशास्त्र अचेतन मनाला जागृत करते तर भारतीय तत्त्वज्ञान अचेतन मनाला नियंत्रित करते,
‘मन एवं मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो:।’
मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि विशेष करून मुक्तीचेही कारण आहे. अशी मनाची थोरवी ज्यांना कळली आहे ते
‘मन मंदिरा तेजाने उजळोनि दे साधका’
असे म्हणून मनाला गौरवतात. पण ज्यांना असं वाटतं की त्यांचं मन काही केल्या त्यांचे ऐकतच नाही ते वैतागाने मनाला दूषणे देऊन म्हणतात.
‘बत्तमीज दिल बत्तमीज दिल
मानेना मानेना मानेना’
‘चंद्रमा मनसो जात:’ चंद्र हा मनाचा मुख्य कारक आहे. म्हणूनच चंद्राच्या कलेप्रमाणे मनही हेलकावे खात कधी लहान होऊन बालिशपणा करतं तर कधी मोठं होऊन पोक्तपणे सल्लाही देतं. चंद्राच्या कलेप्रमाणेच मन प्रसन्न अथवा खिन्न होत असतं. अशा वेळी चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंची चारोळी आठवते,
‘तेव्हा मी मनापेक्षा पावलांनाच आवरायला हवं होतं।
कारण मनाचं बहकणं नेहमीचं। पावलांचं नवं होतं॥’
पुढे पुढे आयुष्यात माणसाला जसजसं प्रौढत्व येतं तसतसं या मनाचे महत्त्व कळू लागतं. खरंच या मनाने किती सोसलं आहे. संकटात किती आधार दिला आहे. हे लक्षात येऊ लागतं. अनेक कठीण प्रसंगी या मनाने आपल्याला सावरलं आहे. आणि त्यामुळेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकलो याची प्रचीती येते. वास्तविक आपल्या सगळ्या यशाचे श्रेय मनालाच द्यायला हवं. कारण ‘सर्व सिद्धीचे साधन’ मनच आहे. म्हणूनच वामनराव पै म्हणतात, ‘अंतर्मन हे कल्पतरु!’ अशा या कल्पतरू खाली बसूनच आपण आपले जीवन समृद्ध करू शकलेलो असतो.
आयुष्याच्या संध्याकाळी या मनाचा मोठेपणा प्रकर्षांने जाणवतो. आणि आपले मन समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे खरंच ‘सज्जन’ आहे याची साक्ष पटते. आता आपलं शरीर जीर्णशीर्ण होऊन थकलं असलं तरी मन मात्र अजूनही कोमल, निरागस आणि टवटवीत आहे. हे लक्षात येतं. तेव्हा मन भासतं एखाद्या फुलासारखं प्रफुल्लित. कधी वाटतं मन आहे श्रीमहालक्ष्मीचं कमळ, कधी श्रीकृष्णाचा पारिजातक तर कधी महादेवाला आवडणारा शुभ्रधवल मोगरा आणि मन ईश्वरचरणी लीन होत संत तुकारामांचा हा अभंग ओठी येतो,
‘मन हा मोगरा। अर्पूनी ईश्वरा।
पुनरपि संसारा। येणे नाही॥’
सुनीता डहाके – response.lokprabha@expressindia.com