मी एक आधुनिक पालक आहे!
माझे स्वप्न आहे की माझे मूलंही आधुनिक बनावे.

माझे बालपण म्हणजे स्वर्गीय सुखच! अर्थहीन, मिश्कील आणि उपद्रवी खोडय़ांनी भरलेलं. आजी- आजोबा म्हणजे लाड आणि गोष्टींची खाणच! सिन्ड्रेला, सात बुटके, लाकूडतोडय़ा, पंचतंत्र.. भूताखेतांच्या आणि राक्षसाच्या गोष्टींची मौजच और.

भरलेले ओढे, नदीनाले, चिंचा- पेरूची झाडे, कैऱ्यांनी डवरलेलं झाडं, पडके वाडे.. कित्ती ठिकाणं फिरण्याची. लपंडाव काय आणि लगोरी काय! कोया वाळवून त्यासुद्धा खेळायचो, पत्ते, गोटय़ा, गजगे खेळून दुपारचा धुडगूस घातला म्हणून मारही खाल्लाय. घरचे कमी म्हणून शेजारचे काका-काकूही हात साफ करायचे. खोटे बोललो, भांडणं केली, मारामाऱ्याही! देवाला हात जोडून माफीही मिळायची लगेच.

खरंच प्रेमानं, लाडानं, मस्तीनं आणि संस्कारानं भरलेलं आणि भारलेलं स्वप्नच होतं ते! पण म्हणूनच आधुनिक पालक म्हणून जागा झालोय मी.

तेव्हाचं युग स्पर्धेचं, तणावाचं आणि चिंतेचं नव्हतं.

पण मित्रांनो जग बदललंय. आता मी माझ्या मुलाला या सगळ्या मूर्खपणात कसा वेळ वाया घालवू देऊ?

अहो, तोही ऐकतोच गोष्टी.. माझ्या मोबाइलमध्ये. शिवाय त्याचा स्वत:चा लॅपटॉप आहे. मी काय इतका बेजबाबदार आहे का की त्याला गल्लीबोळात खेळण्यात, फिरण्यात, खोडय़ा करण्यात वेळ वाया घालवू देईन? अरे तोपर्यंत त्याचे स्पर्धक पुढे जातील ना!

तीन कोचिंग क्लासवरून आल्यावर त्याला खेळायला शक्ती कुठून राहील? दमणार नाही का तो? तुम्हीच सांगा किती मॅनरलेस वाटेल तो जर शेजारच्या कुणाच्याही घरात गेला, खोडय़ा काढल्या तर?

मला खूप वैताग येतो जेव्हा तो हॉटेलमध्ये ओरडतो. लाज वाटते जेव्हा तो कुणाकडे बिस्कीट मागतो. मला आवडत नाही जेव्हा तो साधे, सैल कपडे घालायचा हट्ट करतो. आणि माझ्या रागाचा पाराच चढतो जेव्हा तो रिक्षावाला, कामवालीशी बोलतो. किती मिडलक्लास आहे ते!

आणि एक दिवस सगळं बदललं.. खरं तर मी बदललो.

त्याने माझ्या कुशीत येण्यासाठी परवानगी मागितली. गालावर पापी घेण्यासाठी आणि मिठी मारण्यासाठीही मी ओशाळलो.

‘‘मी तुम्हाला गोष्ट सांगू का?’’ म्हटलं ‘हो’, एकाच सिंड्रेलाच्या गोष्टीत राक्षस, छोटा भीम, हनुमान, कृष्ण, कालिया सगळे जण एंट्री घेऊ लागले. मला पहिल्यांदाच जाणवलं त्याचा आवाज किती गोड आहे, स्पर्श किती मुलायम आणि मिठी किती उबदार!

त्याने अनपेक्षित धक्का दिला. ‘‘मी तुमचे आईबाबा थोडय़ा महिन्यांसाठी उधार घेऊ शकतो का माझे आईबाबा म्हणून?’’ मी पुरता गोंधळलो. तो निरागसपणे म्हणाला, ‘‘तुम्हाला मी तुमच्यासारखा यशस्वी, श्रीमंत आणि व्यवहारी व्हावं असं वाटतं ना! तुम्हाला हे सगळं तुमच्या आईबाबांनीच शिकवले असेल ना! तुम्हाला दोघांनाही माझ्यासाठी वेळ नसतो म्हणून मी विचार केला की मी त्यांच्याकडूनच शिकेन’’

दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा ऑल इन वन गोष्टीत रमला आणि माझ्या डोळ्यांसमोरून मात्र बालपणीची सगळी मौज, धूम, भांडणं, मारामाऱ्या, शिक्षा, ओरडा, मस्ती, खेळ, सारी चित्रे झरझर फिरून गेली.

मग मी खरा जागा झालो. ज्याला मी मूर्खपणा, वेळेचा अपव्यय समजतोय त्याच बालपणाने माझा हा हवासा, यशस्वी, विश्वासू वर्तमानकाळ दिलाय.

माझ्या आईवडिलांनी कधीच माझे बालपण, वागणे हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनवून माझ्यावर मर्यादा घातल्या नाहीत. मी कायमच त्यांचा पहिला प्राधान्य होतो. याचा मला तोटा काय झाला? काहीच नाही.

उलट आयुष्यभरासाठी अनुभवाची प्रेमाची शिदोरी मिळाली आणि मुख्य म्हणजे मला कधी कुणाचे आईबाबा उधार मागावे लागले नाहीत.

कल्पना लाळे येळगावकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader