गणपती हे सगळ्यांचं लाडकं दैवत. त्याचं लाघवी रूप, एखाद्या नास्तिकालाही मोहवणारं असंच. गणेशोत्सव म्हणजे बाप्पाचा घरी येण्याचा सोहळा. त्याच्या येण्याने घरात मांगल्य, चतन्य, उत्साह येतो आणि त्याच्या जाण्याने घरात, मनात एक रितेपण भरून राहतं.
आपलं बाप्पाशी असलेलं नातं वयाबरोबर बदलत जातं. आधी तो चांगली बुद्धी देणारा बाप्पा असतो, मग तो मागण्या पुरवणारा देव होतो, आपण त्याच्याशी वाद घालतो, आपले प्रश्न मांडतो, त्याच्यावर नाराज होतो आणि पुन्हा त्याचाच आधार शोधतो.
कधी आपण त्याच्याशी भांडतो, कधी त्याच्या अस्तित्वावरच संशय घेतो, कधी त्याचं असणं नाकारतो, कधी त्याला वेगळ्याच कोणाच्या रूपात पाहतो, कधी स्वत:च्या चुका त्याच्यावर लादतो, कधी त्याचं श्रेय स्वत:कडे घेतो. कधी जगातल्या दु:खासाठी, अन्यायासाठी त्याला जबाबदार धरतो, तर कधी सुखासाठी त्याचे मन:पूर्वक आभार मानतो.
जे मिळालंय त्यात आनंद मानण्याचं सोडून जे मिळालं नाही त्यावर रडून अनादर करतो. कधी स्वत:ची गाऱ्हाणी त्याच्याकडे मांडत असताना, स्वत:च्या, त्यानेच दिलेल्या सामर्थ्यांकडे कानाडोळा करतो आणि अपेक्षाभंग करतो त्याचा.
‘मला चांगली बुद्धी दे’ची फेज संपली की, हक्काने मागण्यातली निरागसताही संपते आणि सुरू होतो फक्त व्यवहार. मग हा देवबाप्पा कधी नवसाच्या ओझ्याखाली दबल्यासारखा, देवळे-देव्हारे यांच्या िपजऱ्यात कोंडल्यासारखा, धूप-उदबत्तीच्या धुरात दडलेल्या अवास्तव अपेक्षांच्या वासाने गुदमरलेला, तुपादुधाच्या िलपणामध्ये लपलेल्या स्वार्थी मागण्यांमध्ये बरबटलेला, थोडा हरलेला, काहीसा थकलेला भासतो.
पण, त्याच्या येण्याची मनोभावे वाट पाहणारे, त्याला मनापासून हात जोडणारे, त्याच्यापुढे खऱ्या अर्थाने नतमस्तक होणारे सच्चे भक्त आजही आहेत. त्याच्याकडे आशेचं, शक्तीचं स्थान म्हणून पाहणारे, त्याच्याकडे सद्बुद्धी मागणारे, त्याच्याकडे सर्वाच्या भल्यासाठी प्रार्थना करणारे सज्जन आजही आहेत आणि म्हणूनच बाप्पा आजही येतो; त्याला मनापासून आपलं म्हणणाऱ्या, लहान मुलाच्या निरागसतेने त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाकडे तो येतो. हसऱ्या चेहऱ्याने त्याचे स्वागत करणाऱ्या आणि ओल्या डोळ्यांनी त्याला निरोप देणाऱ्या प्रत्येकाकडे तो येतो, चतन्याचं स्रोत बनून. तो जातो तेही पुढल्या वर्षी येण्याची खात्री देऊन. त्याचं ‘येणं’ जसं जाण्यासाठी, तसं त्याचं ‘जाणं’ही पुन्हा येण्यासाठीच असतं.
ते खळाळतं पाणी आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषात विसर्जति होणारी बाप्पांची मूर्ती – हे दृश्य कोणाच्याही डोळ्यात पाणी आणणारं असंच; पण विसर्जन होतं ते बाप्पाच्या मूर्तीचं, त्याच्या येण्याने प्राप्त झालेल्या अमूर्त अशा आनंदाचं नाही; त्यानं देऊ केलेल्या आत्मभानाचं नाही; त्याच्याकडून मिळालेल्या आंतरिक शक्तीचं नाही.
मूर्त ते क्षणभंगुर आणि अमूर्त ते चिरंतन टिकणारं! ही केवढी मोठी गोष्ट शिकवून जातो गणपती बाप्पा आपल्या काही दिवसांच्या वास्तव्यात.
मनाली ओक, पुणे
response.lokprabha@expressindia.com
ब्लॉगर कट्टा : नातं बाप्पाशी
गणपती हे सगळ्यांचं लाडकं दैवत. त्याचं लाघवी रूप, एखाद्या नास्तिकालाही मोहवणारं असंच.
Written by दीपक मराठे
First published on: 11-09-2015 at 01:14 IST
मराठीतील सर्व ब्लॉगर्स कट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh vishesh relationship with ganesha