रखमा काकूमाझ्या वडिलांची चुलती. मोलमजुरी करणारी आणि कष्टात जगणारी. त्या दिवसांची आठवण आजसुद्धा पुन्हा परत त्या काळात घेऊन जाते. जातिवंत धंदा नसताना सुतारकामात तरबेज असणारे वडिलांचे चुलते. आम्ही त्यांना आप्पा म्हणायचो आणि चुलतीला काकू. आप्पा काकू दोघांचा संसार भांडततंडत चालू होता. मी तेव्हा लहान होतो, पण त्यांच्यात लुडबुड करत होतो. त्यांची भांडणं मजेशीर वाटायची, ती चालूच राहावी असं वाटायचं. कारण आप्पा भांडणात हसण्यासारखी वाक्ये वापरायचे. त्यांच्या अशा वाक्यांवर काकूचा खमंग शेरा असायचा अन् हसत हसवत भांडणाचा शेवट व्हायचा. बरेच दिवस आम्ही ज्यांना पाहिलंही नाही असे जगन्नाथभाऊ  हे आप्पा काकूचे सुपुत्र. फार दिवसांपासून कोणाचीही व कसलीही तमा न बाळगता बाहेरगावी अज्ञातस्थळी खपत होते. त्यांच्या कर्तृत्वाचे कारनामे अनेकांकडून ऐकायला मिळायचे.

आप्पा आणि काकू थकलेले जीव, पण जगण्याची लढाई आधाराशिवाय लढत होते. आम्ही जवळच होतो, पण त्यांच्या पोटचं मूल मात्र कुठं होतं, काय करतंय याची त्यांना काही कल्पना नव्हती. काकू दिवस दिवस शेतावर कामाला जायची, कधी याच्या तर कधी त्याच्या. सव्वा रुपया रोजगार मिळायचा दिवसभर केलेल्या कामाचा. चुलीवर हिरवी मिरची घालून केलेली डाळीची आमटी, काकू सोबत दुपारचं जेवण घेऊन गेल्यानंतर शिल्लक राहायची. मला ती आमटी कोणत्याही पक्वान्नापेक्षा जबर आवडायची. मी त्या आमटीवर दुपारी ताव मारत असे. रात्री काकू आल्यावर आमटीच्या तवलीला बघून काय प्रतिक्रिया देते याकडे माझं लक्ष असायचं. काकू कुत्र्या-मांजरांना आमटी फस्त केली म्हणून जबाबदार धरून दोन-चार गावरान शिव्या हासडायची, तेव्हा मला मजा यायची. मी थोडा वेळ गप्प राहून परत काकूला सांगायचो. त्यानंतरची काकूची प्रतिक्रिया आमटीसारखीच चवदार असायची. रात्री कामाहून येणारी काकू थकलेली असेल हा आपला समज होता हे तिच्या बोलण्यातून व रात्रीच्या स्वयंपाकातील हालचालीतून लक्षात यायचे. काथवटीत भाकरी करतानाचा आवाज आणि तव्यावर चेंडूसारखी फुगणारी भाकरी बघून चुलीच्या उबेला बसून खावीशी वाटावी यात नवल ते काय?

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत

आज माळ्यावर जुन्या सामानात काथवट दिसल्यानंतर आठवणीचे हे एक एक पदर उकलत गेले. आजच्या युगात लोप पावत चाललेले शब्द आणि लोप पावलेल्या वस्तू येणाऱ्या पिढीला कशा कळणार. माझी काकू असो वा माझी आई, काथवटीशी असणारं त्यांचं नातं नि आम्ही घेतलेला अनुभव नैसर्गिक तर होताच, पण जगणंसुद्धा जिंवतपणा टिकवून होता. चुलीतील आरावर लालसर तापलेले दूध, लसूण घालून केलेली मिरचीचा ठेचा अगर आविल्यावरल्या चिटकीत शिजणाऱ्या डाळीत लाल तिखट, कच्चे तेल टाकून रात्रीची मुद्दाम उरवून ठेवलेली भाकरी खाण्यात जो आनंद होता तो आज पंचतारांकित हॉटेलमध्ये खातानाही येत नाही. पण हा अनुभव केवळ सांगण्यापुरताच राहिला आहे. मनात उरली आहे, चूल, तवली, आवेलं, निखारा आणि काथवट..!!

हणमंत पडवळ response.lokprabha@expressindia.com