आठवणी जिवलगांसारख्या येऊन बिलगतात. ‘आपली महामुंबई’ हे लहानपणी ‘अभ्यासाचं’ म्हणून वाचलेलं पुस्तक मला चाळीस वर्षांनी सापडलं. त्याला वाळवी लागलेली नव्हती. नवल आहे. महामुंबई ‘आपली’ राहिली नाही हे शल्यसुद्धा मी विसरलो. जुन्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टी आपल्याला इतक्या का आवडतात? आपण एवढे हळवे असतो का? मग त्याच वेळी का होतो? एकदा ‘आला आला फेरीवाला’ हे शरद मुठे यांच्या आवाजातलं खूप जुनं बालगीत म्हणजे ती ‘तबकडी’ माझ्या मित्राला घरातच सापडली. तेव्हा तो असाच इमोशनल झाला होता. भावना डिलिट होत नाहीत! ताणतणावाचं आपलं आयुष्य तसं विस्कटतच गेलेलं असतं. जे हरवतं, सांडतं ते शोधायलाही सवड नसते. निरागसता आपण अशीच कधीतरी, कुठेतरी विसरून आलो. आता ती परत वापस कशी मिळणार?

‘स्टँडर्ड’ गाडी मला अनेकानेक वर्षांनी बंद स्थितीत दिसली. तेव्हा मी असाच तिच्याकडे बघत थांबलो होतो. तीही थांबूनच होती. त्या छोटय़ा कारला आता कुठेच जायचं नव्हतं. नाशकातला आमचा सुधामामा ‘स्टँडर्ड’ गाडी वापरायचा आणि मामेभाऊ भलताच लंबू असल्यामुळे त्या बुटक्या गाडीत नीट ‘मावत’ नसे. आमची गरिबी होती. त्यामुळे आईच्या माहेरी गेल्यावर मामाच्या त्या गाडीतून फिरताना, माझा आनंद गगनात मावत नसे. ‘दूरदर्शन’च्या अगदी सुरुवातीच्या ७० च्या कृष्णधवल दशकात ‘स्टँडर्ड’ नावाचा टी. व्ही. सुद्धा घरोघरी दिसू लागला होता. आता इतक्या रंगीत वाहिन्यांचा सुळसुळाट आहे. तरीसुद्धा मला ते त्यावेळचं ‘व्यत्यय फेम बँड एक चॅनेल चारचं दूरदर्शन का आठवत राहतं?

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात

‘पुन्हा प्रपंच’ त्याआधी रेडिओवर गाजत होता. त्यातले ‘टेकाडे भावोजी’ आणि ‘मीनावहिनी’ दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात ‘बघायला’ मिळणार म्हणून आम्ही पोरं आधीपासूनच टी.व्ही. संचासमोर बसून होतो. ‘अगंबाई! या होय नीलम प्रभू?’ असं घरातल्या बायका त्या दिवशी म्हणाल्याच. त्यांनी तोपर्यंत प्रभूबाईंचा फक्त आवाज आणि मनमोकळं हसणं ऐकलं होतं.. त्या काळातल्या तारकांची आजही इतक्या वर्षांनी आमच्या अंगणात आठवण निघतेच! त्यातलं कुणी हयात नाही हे कसं सहन करायचं?

मला कालचं आज आठवत नाही, पण ‘निरुपमा आणि परिराणी’ हा बालवाडीत असताना पाहिलेला बालचित्रपट मात्र आठवतो! आठवणी दाटून येतात.. आणि त्यामुळेही जगण्याचं पुन्हा बळ मिळतं का? तसंच असावं. राजू रेगेसारखा बालमित्र चार दशकांनंतर मला जर अचानक भेटला, तर डोळे ओलावणारच ना! जिंदगी आपल्याला वळणावळणाने कुठल्या कुठे घेऊन जाते आणि ‘तिथे सोबती वाट पाहती’ असं ते पटांगणही दिसेनासं होतं. जिथं आपली कौलारू शाळा व जिवलग सवंगडी होते, तिथे आता टोलेजंग इमारत उभी राहिलेली असते. खूप माया करणाऱ्या शाळेतल्या ‘प्रेमाताई’ आता हयात नाहीत हीसुद्धा एक दुखरी वेदनाच असते. भूतकाळ आता पुन्हा कधीच येणार नाही ही भावनाच आपल्याला दुरावून जाते.. पण इतका रम्य भूतकाळ आपल्याला मिळाला याचं अंमळ सुखही असतंच की भाई!
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com