‘जाहिरात’ रातोरात चर्चेत आली. ‘सोशल मीडिया’ वर गाजू लागली. वादग्रस्त ठरली. ‘त्या’ बाईने, नव्हे आईने हे वादळ अंगावर का घेतलं? कारण अखेरीस ती आई आहे. तिला तिच्या बाळाची काळजी. वयाने वाढला, अगदी पस्तीस वर्षांचा झाला, तरी तिला तो लहानच. आपल्यानंतर त्याला कोण? हा प्रश्न तिला उतारवयात पडणारच. भय आणि चिंता यांनी व्याकूळ झालेली, समाजाने विनाकारण नाकारलेली माणसंही जगण्यासाठी निघालेली असतात. सावळी देणारं झाड, ऊब देणारं घरटं आणि चोचीत चोच घालणारा जोडीदार प्रत्येक व्यक्तीला हवाच असतो. खरं तर हा विषय नुसता ‘विषय’ सुखाचा नाहीच, तर मानवी अधिकारांचा! आईने तिच्या वेगळी मानसिकता जपणाऱ्या मुलासाठी ‘जोडीदार’ हवा अशी जाहिरात दिली!
लहानपणापासून त्या मुलाचं एकाकीपण, यातना, देहाने पूर्ण पुरुष असूनही पुरुषाकडे धाव घेणारं स्त्रण मन, त्यातून येणारी निराशा, धरसोड, अस्थिरता, त्याच्यावर झालेला एखादा अत्याचार या सगळ्याची ती माता मूक, हतबल साक्षीदार होती. या व्यवस्थेत चारचौघांसारख्या नसणाऱ्या व्यक्तीला जगणं इतकं असह्य का केलं जातं? त्याचाही विचार करण्यासारखा आहे. आत्महत्या करावी, तर तोही गुन्हा. पण छळ करून करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या परंपरावादी व्यवस्थेला काय शिक्षा? काही नाही. ती मोकाटच!
‘गे’ मुलासाठी ‘वर’ पाहिजे.. शाकाहारी पाहिजे की, शिकारी पाहिजे हे महत्त्वाचं नाही. त्या आईचं वात्सल्य, तिची तडफड, तिने तिच्यापुरता मार्ग शोधायचा केलेला प्रयत्न हा महत्त्वाचा आहे! मला वाटते, ती आई, तिचा ‘गे’ कार्यकर्ता असलेला तो समलैंगिक चळवळीतला मुलगा ही काळाच्या पुढे असलेली सध्या बहिष्कृत ठरू शकतील अशी मुलं माणसं आहेत, पण त्यांना ‘गुन्हेगार’ मानणं हे मात्र फारच भयाण, अमानुष ठरेल!
तुम्हाला असंच वाटतं की, वेगळं काही?