परदेशी म्हणजे सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांची टूर होती. त्या छोटय़ा छोटय़ा देशांनी केलेली प्रगती बघून मन अचंबित होत होतं. नैसर्गिक साधनसामुग्री फारशी उपलब्ध नसताना पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय स्वीकारून त्या देशांनी प्रगतीचा मोठा पल्ला गाठला होता. तिथल्या रहिवाशांनी स्वीकारलेला पर्यटन व्यवसाय. तो यशस्वी व्हावा म्हणून, आलेला पाहुणा खूश होऊन जावा म्हणून तिथले ड्रायव्हर, गाइड, हॉटेल चालक घेत असलेली मेहनत बघून मन त्यांना दाद देत होतं. तिथली स्वच्छता, रस्ते, रहदारीचे नियम, गाडीचा हॉर्नचा अतिशय संयमित वापर, स्वच्छ-सुंदर समुद्रकिनारे बघून आपल्याही देशात व्हायला हवं हे पदोपदी वाटत होतं.
टूर संपली, थकलेल्या शरीरानं आणि तृप्त मनानं परतीच्या प्रवासासाठी विमानात बसलो आणि निघालो. प्रवासात टूरच्या अविस्मरणीय क्षणांचं पारायण सुरू होतं. हवाईसुंदरींनी जाहीर केलं थोडय़ाच वेळात आपलं विमान भारताच्या भूमीवर उतरणार आहे. ‘चला, आलो आपल्या देशात’ विचार मनात आला आणि जसं विमानाचं चाक जमिनीला टेकलं तसा एक मायेचा स्पर्श शरीरभर पसरून गेला. खूप दिवसांनी माहेरी आलेल्या लेकीवर जशी आई मायेची पाखर करते तसंच होतं ते. दगडमातीचा स्पर्श असा असू शकतो? हा प्रश्न बुद्धीच्या कसोटीवर उतरत असतानाच डोळ्यात पाणी तरळलं हा माझ्या मनाने कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न न करता त्या स्पर्शाला दिलेला प्रतिसाद होता. हा केवळ दगडमातीचा स्पर्श नव्हता तर तो माझ्या मातृभूमीचा स्पर्श होता.
ज्या देशात आपण जन्म घेतो त्या देशाच्या दगडमातीच्या जमिनीशी आपण जोडले जातो. त्या जमिनीशी आपली नाळ जोडली जाते. आपले पालक आपल्याला अन्न भरवून लहानाचे मोठे करतात. पण ते अन्न शिजवण्यासाठी लागणारं धान्य आपली ही माृतभूमी आपल्याला आयुष्यभर पुरवीत असते. मानवाच्या तीन अत्यावश्यक गरजा- अन्न, वस्त्र निवारा पूर्ण करण्याचं कर्तव्य आपली मातृभूमी चोख बजावत असते. आईच्या अंगाखांद्यावर बाळ जसं नि:संकोचपणे बागडत असतं तसं आपण आपल्या देशात फिरत असतो. इथे आपल्याला पासपोर्टसारखा कागदाचा चिटोरा कायम स्वत:जवळ बाळगावा लागत नाही. आईच्या मांडीवर बसायला बाळाला कुणाची परवानगी लागत नाही. हो ना?
ज्या वंशात आपण जन्म घेता त्या वंशातील लोकांशी आपण नातेसंबंधांनी जोडले जातो. तसंच आपण ज्या देशात जन्म घेतो त्या देशातील इतर लोकांशी बंधुत्वाच्या नात्यांनी जोडले जातो. आशियाई किंवा ऑलिम्पिकचे सामने आपण टी.व्हीवर बघतो. ते बघताना कित्येकदा आपल्याला त्या स्पर्धेतले आपल्या देशाचे खेळाडूही माहिती नसतात, पण ज्या खेळाडूच्या नावापुढे आपल्या देशाच्या ध्वजाचे चिन्ह असतं तो खेळाडू जिंकावा म्हणून आपण अगदी देवाला प्रार्थनासुद्धा करतो. तो खेळाडू आपण बघितलेलासुद्धा नसतो. पण केवळ त्या ध्वजामुळे तो आपल्याला आपला वाटतो. आणि आपण त्याला शुभेच्छा देतो. आपल्या देशाचा खेळाडू, संघ सामना जिंकावा असं वाटतं. खरतर त्यात आपला काहीही वैयक्तिक फायदा नसतो, पण तरी आपल्या देशाचा संघ- खेळाडू जिंकला तर आपल्याला आनंद होतो आणि हरला तर दु:ख होतं.
एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला नोबलसारखा मोठा पुरस्कार मिळाला तरी आपल्याला आनंद होतो तसेच देशाच्या अगदी दुसऱ्या टोकावर झालेल्या बॉम्बस्फोटात मृत झालेल्या व्यक्तीबद्दल आपल्याला कणव वाटते कारण ती व्यक्ती आपली कुणी जरी नसली तरी ती आपल्याशी आपल्या मातृभूमीमुळे बंधुत्वाच्या नात्यांनी जोडली गेली असते.
आपण आपल्या मातृभूमीशी आई- अपत्याच्या नात्यांनी बांधलेलं असतो. पण केवळ ‘अतिपरिचयात..’ या उक्तीप्रमाणे आपल्याला या नात्याची महती नित्य स्मरत नाही. हे नातं, त्यातला आपलेपणा नित्य आपल्याला जाणवत नाही. आपण हे नातं गृहीत धरतो. पण परदेशवारीहून आल्यानंतर झालेल्या मायेच्या स्पर्शामुळे या नात्यातलं प्रेम माझ्यासाठी अधोरेखित झालं.
डॉ. विशाखा सोनटक्के – response.lokprabha@expressindia.com