काही व्यक्ती या वर्ण, रंगरूपाच्या बरोबरीने जन्मत:च एक प्रसन्नता घेऊन येतात. अशी माणसे कोठेही गेली की आसमंत प्रसन्न करतात. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना परिश्रम करावे लागत नाहीत. आणि ती व्यक्ती म्हणजे माझा मित्र सगुण. प्रत्येक वेळी मजेत. मी त्याच्याकडे सदरा मागतो. कारण प्रत्येक क्षणाचं तो चीज करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जमिनीला पाठ टेकताच त्याला गाढ झोप लागते. झोपताना तो म्हणतो, माझ्या मनावर कालच्या अपयशाचे विचार किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. वेळेवर झोपून त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवत असतो. दिवसाची रात्र करत नाही आणि रात्रीचा दिवस पण तो करत नाही. दिवसा काम आणि रात्री झोप हे निरोगी समीकरण तो मांडतो.

त्यामुळे तो सकाळी फ्रेश होऊन उठतो! वर्तमानपत्र चाळताना शेअर्सच्या चढउतारांमुळे भयभीत होत नाही. सोन्याच्या भावातील चढउतारांमुळे विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किमती किंवा बँकेच्या मुदत ठेवीचे व्याज कमी झाले म्हणून अस्वस्थ होत नाही. उगाचच आपले भविष्य वाचून मन खिन्न करून घेत नाही. राजकारणावरचे पान वाचण्यापेक्षा शेवटचे क्रीडावृत्त पान आवडीने वाचतो.

त्याच्या घरात टॉनिकच्या किंवा ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात. पोट साफ करण्यासाठी चूर्ण नसते. तेल, साबण, टूथपेस्ट पावडरचे उगाचच निरनिराळे प्रकार तो ठेवत नाही. चपला-बुटांचा खच त्याच्या स्टँडवर नसतो. सुबक देवघरात आद्यदैवत गणपतीची मूर्ती आहे. अंगारे-धुपारे, मंत्रतंत्र, पोथ्या आशा कर्मकांडात त्याला रस नाही. तो आस्तिक नाही आणि नास्तिकही नाही. वार्षिक सत्यनारायणाची पूजा वगैरे धार्मिक बंधनात तो अडकलेला नाही.

तो इमानेइतबारे नोकरी करतो. बायको, मुलींना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो, हवं नको ते बायकोला विचारून बाहेर पडतो. दोन्ही मुली असल्या तरी खूश राहून, शाळा, पुस्तके, वेळापत्रक, होमवर्क याकडे लक्ष ठेवून, वेळोवेळी वेळेवर दोघींना आठवण करून देत असतो. कधी होकार तर कधी नकार यांची योग्य सांगड घालत असल्यामुळे मुलींना त्याच्याबद्दल आदर वाटतो. कुठे अ‍ॅडमिशन नाही मिळाली किंवा मनासारखा निकाल नाही लागला तर त्याच्या घरात पॅनिक होत नाही. रोजच्या कामांची छोटी लिस्ट रोज टीव्हीच्या बाजूला ठेवतो.

कौटुंबिक हेवेदावे, सासूसुनांची भांडणे यांवर रचलेल्या टीव्ही मालिका बघून तो भावविवश होत नाही. पण टीव्हीचा उपयोग करून त्याला राज्यातील, देशातील, जगातील घडामोडी, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती/ओहटी कधी आहे. काही कारणाने कोणत्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे, मोर्चा, बंद यांची माहिती तो सतत अपडेट करत असतो. त्यामुळे मला काही माहिती हवी असल्यास मी शोधण्यापेक्षा पटकन सगुणाला फोन करतो व न त्रासता तो मला ती देतो. कुठच्याही बऱ्या-वाईट बातमीला तो स्वत:वर स्वार होऊ देत नाही. त्याचे म्हणणे असते की धोक्याला थेट सामोरे जाण्यापेक्षा तो धोका टाळण्याचा मार्ग बघावा.

सगुण नियोजनपूर्वक पैसा साठवून आहे. तो सध्या वनबीएचकेमध्ये राहतो. त्याला उगाचच मोठय़ा घराची अ‍ॅम्बिशन् नाही. वेळप्रसंगी ड्रायव्हरसह पिवळीकाळी गाडी (टॅक्सी) रस्त्यावर उभी असताना, स्वत:च्या गाडीची, तिच्या दुरुस्तीची, पार्किंगची चिंता तो करत बसत नाही. सेंटची बाटली, दारूची बाटली, यांची गरज त्याला वाटत नाही. तो म्हणतो दु:खाचा उगम तुलनेत होतो. उगाचच स्पष्ट बोलून दुसऱ्याला दुखवणे, भारी तत्त्ववादी वागून आडमुठेपणा करणे, नको तिथे सत्याची कास धरणे, असे प्रकार त्याने केले नाही.

लहान-मोठय़ा गोष्टीत आनंद घेत दिवसभर तो बिझी असतो. तुम्ही सुख विकत घेऊ शकत नाही, असे जे कोणी म्हणतात त्यांनी ते खरेदी करण्यासाठी माझा मित्र सगुण याकडे जावे. माझ्या मित्राचं जीवन माझ्या करता प्रवचन/ सत्संग आहे. जीवनात प्रत्येक क्षण मोलाचा असतो. फुलपाखराचे आयुष्य फक्त चौदा दिवसांचे असते, पण ते मजेत उडून दुसऱ्यांना आनंद देत असते.

नाका समोर तो चालत राहिला. वाकडी वाट स्वीकारली नाही. अडला, नडला, पिडला, तरी चालून निर्माण केलेली वाट सोडली नाही. प्रत्येक क्षणाचे सोने करत राहिला!

मित्रा गण्या, तुला माझा हॅटस् ऑफ, असाच मी तुझ्या सान्निध्यात राहीन.

श्रीनिवास स. डोंगरे – response.lokprabha@expressindia.com