‘मामाच्या गावाला जाऊया’ गाणं गात गात, मामाच्या गावाला न जाता मी लहानाचा मोठा झालो. माझा आवाज तेव्हा बऱ्यापैकी होता. त्यामुळे मला आता ‘व्हॉट्स अॅप’ ग्रुप करून एकमेकांना धमाल चिडवणारे वर्गमित्र ऑफ तासाला गाणं गाण्याचा आग्रह करायचे. मी लगेच ‘मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा’ सुरू करायचो. कधी ‘नाचगाणं’ व्हायचं! माझा सख्खा मामा एकच होता. तो नोकरी वगैरे करत नसे. त्यामुळे स्वत:चा प्रपंच आणि गाव नव्हतं. उलट, तो आश्रित म्हणून आमच्याकडे म्हणजे स्वत:च्या बहिणीकडे येऊन राहिला. हळूहळू त्याचे आर्थिक व्यवहारही बिघडत गेले. उसनवारी फार होऊ लागली. समाजकार्याच्या नावाखाली ही लबाडी चालायची. त्याचा अतोनात त्रास आईला व शिक्षक वडिलांना सहन करावा लागायचा. त्यामुळे मामाचा गाव किंवा मामींची माया या गोष्टी माझ्या फक्त स्वप्नात राहिल्या.
तसे आईला काही इतर श्रीमंत नातलग भाऊ होते, पण सख्खे नव्हते. शिवाय, आम्ही गरीब आणि ते सगळेच्या सगळे पैसेवाले. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यावर काही नाही म्हटले तरी न्यूनगंड यायचा. एक प्रकारचा तुच्छतावाद बायकांच्या वागण्यात अशा परिस्थितीत असतोच. हळूहळू तिकडे जाणेही थांबलं. मामा आणि त्याचा गाव गाण्यातच उरला. माडगूळकरांच्या ‘त्या’ चित्रपट गीतात आजच्या बालकांना न कळणारे काही शब्द आहेत. गाण्यातले सगळे संदर्भही आता बदलले. धुरांच्या रेषा काढणारी गाडी म्हणजे काय ते चित्र दाखवल्याशिवाय पोरांना आता कळणार नाही. ‘रोज रोज पोळी शिकरण’ आज कुणी करणारही नाही आणि शिकरणीचं आज कुणाला काही कौतुकही नाही.
‘सोन्या-चांदीच्या पेठा’ असतीलच तर आधी सी.सी. कॅमेरे नीट सुरू आहेत की नाहीत ते बघणं महत्त्वाचं ठरेल. ‘कोट-विजारी’ म्हणजे काय तेही इंग्लिश मीडियमवाल्यांना कळणं अवघड. आशाबाईंच्या आवाजात हे गीत आहे आणि त्या आवाजाची जादू मात्र काळाला पुरून उरली आहे. अर्थात् ग.दि.मांनी पुण्यातून जे चंदन उगाळलं, त्याचा सुगंध आमच्या पिढीला आज पन्नाशीतही पुरतोय. ‘गीतरामायणा’ला ‘प्रॉडक्शन’ हा आकाशवाणीचा नेहमीचा फॅक्टरीफेम शब्द लागू नाही. ते उत्पादन नव्हतं. सृजन होतं!
‘माझ्या मामाची रंगीत गाडी’ वसंतराव देसाईंनी चाल बांधून पाठय़-पुस्तकातली कविता म्हणून ‘रेकॉर्ड’वर आणलं तेव्हाही पुन्हा ‘किशोर’ वयातली आम्ही मुंबईकर मुलं ते तालासुरात म्हणू लागलो. पण ‘लेक एकुलती, नातू एकुलता’ असला तरी आजोळच नसल्यामुळे ‘किती कौतुक कौतुक होई’ हा अनुभवच नव्हता. ‘बाजरीच्या शेतात करी सळसळवात’ हा अनुभव तरी सदा घामेजलेल्या मुंबईत कुठून असणार?
कोकणात आता पर्यटकांना वेगळेपण मिळावं म्हणून ‘मामाचा गाव’ नावाची संकल्पना राबवली जाते. घरगुती आपलेपण असतं. कोकणी खाद्यपदार्थाची चंगळ असते. गार कोकम सरबत तर असतेच. झोपाळ्यावर बसायचं. जातं कसं घरघरतं ते ऐकायचं ऊन ऊन पिठलं अन् भाकर काय चव देते ते अनुभवायचं. करकरणाऱ्या झोपाळ्यावर बसायचं. कधी वनराईत भटकून पाखरांचे फोटो टिपायचे, तर कधी समुद्राच्या किनाऱ्यावरचा शंखशिंपल्यांचा खजिना वेचायचा आणि तुरुतुरु पळणाऱ्या खेकडय़ाच्या पाठी पळणारे आपलेच पप्पा किती ‘लहान’ झाले आहेत ते पाहून हसत सुटायचं, पण पप्पांना कळणार नाही अश बेतानं नाहीतर ते पुन्हा ‘मोठे’ होतील!
एका छोटय़ा मुलीला तर ‘रेडिओ’ म्हणजे काय तेच कळेना. ती कोकणात आल्यावर प्रथमच रेडिओ ऐकत होती. सी. डी. लावलेली नसताना खोक्यातून गाणं कसं येतं ते त्या चिमुकल्या बाहुलीला कळेना. मामाच्या या गावाला आज धोका आहे तो सपाटीकरणाचा आणि वाळवंटीकरणचा! नंदनवनाचं वाळवंट व्हायला फार काळ जावा लागणार नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी बुद्धिवाद व मानवकेंद्रित ‘व्यवस्था’ लागते. तिचा अभाव असला की, ‘दुष्काळ’ पडू लागतो. मामाने आत्महत्या केली तर मग गाव असून उपयोग काय हो?
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com